Prajakt Tanpure First Reaction Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Prajakt Tanpure First Reaction : 'पवारसाहेबांना अन् जयंतरावांना भेटायचं धाडस झालं नाही'; भाजप प्रवेशाआधी प्राजक्त तनपुरे भावूक

Prajakt Tanpure reveals why joined BJP, says lacked courage inform Sharad Pawar and Jayant Patil personally : ईडीचा दबाव नव्हता, कार्यकर्त्यांच्या राजकीय अस्तित्वासाठी निर्णय घेतल्याचे भाजप प्रवेशापूर्वी प्राजक्त तनपुरे यांनी स्पष्टीकरण दिले आहे.

Pradeep Pendhare

Prajakt Tanpure BJP Membership : राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांचा आज भाजप प्रवेश निश्चित झाला असून, त्यापूर्वी त्यांनी आपल्या निर्णयामागील कारणांबाबत पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेताना पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आणि मामा जयंतराव पाटील यांना भेटण्याचे धाडस झाले नाही, अशी भावनिक कबुली तनपुरे यांनी दिली.

“मी अनेक वर्षे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये काम केलं. सध्याच्या राजकीय परिस्थितीनुसार हा निर्णय घेतला आहे. मी ज्यांच्या जीवावर राजकारण करतो त्या कार्यकर्त्यांचा मोठा आग्रह होता. गेली अनेक वर्षे, मंत्रिपदाचा अडीच वर्षांचा कालावधी वगळता, आम्ही सत्तेविरोधात संघर्ष करत होतो. कार्यकर्त्यांनी त्यांच्या राजकीय अस्तित्वाचा प्रश्न माझ्यासमोर मांडला आणि त्यामुळे हा निर्णय घ्यावा लागला,” असे तनपुरे (Prajakt Tanpure) म्हणाले.

भाजपमध्ये (BJP) प्रवेश करून सेक्युलर मतदारांशी प्रतारणा होत असल्याच्या प्रश्नावर ते म्हणाले, “माझे कार्यकर्तेच मला हा निर्णय घ्यायला सांगत होते. प्रत्येक पक्षात चांगल्या आणि वाईट गोष्टी असतात. विकासकामांसाठी आणि कार्यकर्त्यांच्या राजकीय भवितव्यासाठी सत्तेत जाणे आवश्यक असल्याची भावना कार्यकर्त्यांमध्ये होती. त्या पक्षातील चांगल्या गोष्टी घेऊन पुढे जाण्याचा आमचा प्रयत्न राहील.”

शरद पवार यांना गरज असताना पक्ष सोडत असल्याच्या टीकेवर तनपुरे यांनी उत्तर दिले. “वेळोवेळी पक्षात बंड झाले, पण मी ठामपणे पक्षासोबत उभा राहिलो. 2024च्या निवडणुकीतही भाजपकडून लढण्याची मागणी होती. त्यावेळी निर्णय घेतला असता तर निवडणूक एकतर्फी झाली असती. माझ्याविरोधात उमेदवार उभाच राहिला नसता,” असा दावा त्यांनी केला.

अजित पवारांच्या बंडावेळची आठवण

अजित पवारांच्या बंडावेळी भाजपसोबत जाण्यास नकार देणारे तनपुरे आज भाजपमध्ये का जात आहेत, असा प्रश्न विचारला असता त्यांनी पुन्हा कार्यकर्त्यांच्या आग्रहाचाच उल्लेख केला.

सुप्रिया सुळेंच्या भेटीत काय घडलं

“मी सुप्रिया सुळे यांची भेट घेतली आणि निर्णयामागची कारणे त्यांना सांगितली. पक्षामुळे मला मंत्रीपद मिळाले. त्यांच्या मनात माझ्याविषयी आदर होता आणि राहील. त्यामुळे हा निर्णय त्यांच्या कानावर घालणं मला योग्य वाटलं,” असेही त्यांनी सांगितले.

यंत्रणांचा दबाव नाही, तनपुरेंचं स्पष्टीकरण

ईडी किंवा अन्य तपास यंत्रणांच्या दबावामुळे हा निर्णय घेतल्याच्या चर्चाही तनपुरेंनी फेटाळून लावल्या. “हा निर्णय ईडीमुळे नाही. कार्यकर्त्यांच्या दबावामुळे घेतला आहे. ईडीची कारवाई केवळ माझ्यावर नव्हती, राज्यातील अनेक साखर कारखान्यांवर होती आणि त्या प्रकरणांचाही निकाल लागला आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले.

मामा जयंतरावांबद्दल प्रचंड आदर

जयंतराव पाटील यांच्या विचारांना धक्का पोहोचत असल्याची भावना आहे का, असे विचारले असता तनपुरे म्हणाले, “जयंतराव पाटील यांचा आणि माझ्या भाजप प्रवेशाचा काहीही संबंध नाही. ते माझे मामा आहेत, माझे आदर्श आहेत. त्यांचे राजकारण वैचारिक, अभ्यासू आणि संयमी आहे. त्यांच्याविषयी मला प्रचंड आदर आहे. मात्र हा निर्णय त्यांना सांगण्याचे धाडस झाले नाही.”

पवारसाहेबांना भेटण्याचं धाडस नाही झालं...

राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीच्या काळात या विषयावर पुसटशी चर्चा झाली होती. मात्र अंतिम निर्णयाबाबत ना शरद पवारांना भेटण्याचे धाडस झाले, ना जयंतराव पाटील यांच्यासमोर जाण्याचे. हे सांगताना प्राजक्त तनपुरे भावूक झाल्याचे पाहायला मिळाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT