Ahilyanagar MLC Election : अहिल्यानगर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीत मोठी राजकीय घडामोड घडण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांचे नाव महायुतीकडून संभाव्य उमेदवार म्हणून चर्चेत आल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे, त्यांच्या नावाची चर्चा केवळ भाजपमध्येच नाही तर महाविकास आघाडीतही सुरू असल्याने या निवडणुकीकडे राज्याचे लक्ष लागले आहे.
राजकीय चर्चांनुसार, राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीवेळी जसा अचानक ट्विस्ट झाला होता, तसाच फॉर्म्युला यावेळीही पाहायला मिळू शकतो. त्यावेळी प्राजक्त तनपुरे (Prajakt Tanpure) यांनी जोरदार तयारी केली होती. मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या एका फोननंतर त्यांनी माघार घेतली होती. त्यानंतर ते निवडणुकीच्या वातावरणापासून काहीसे दूर राहिले.
या निर्णयामुळे तनपुरे हे फडणवीसांच्या ‘गुड बुक’मध्ये गेल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती. आता त्याच भूमिकेची ‘परतफेड’ म्हणून भाजपकडून (BJP) त्यांना विधान परिषदेसाठी संधी मिळू शकते, अशी शक्यता वर्तवली जात आहे. अहिल्यानगरची ही जागा यापूर्वी एकत्रित राष्ट्रवादी काँग्रेसकडे होती. मात्र आता महायुतीत ही जागा भाजपकडे जाणार की अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडे, याबाबत अजूनही स्पष्टता आलेली नाही.
दरम्यान, भाजपचे मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी महायुतीतील 99 टक्के जागावाटप निश्चित झाल्याचे सांगितले आहे. त्यामुळे अहिल्यानगरच्या जागेवर अंतिम निर्णय लवकरच होण्याची शक्यता आहे. या जागेसाठी माजी आमदार चंद्रशेखर घुले, राहुल जगताप, माजी महापौर संदीप कोतकर, सचिन जगताप यांची नावे चर्चेत आहेत. मात्र महायुतीकडून उमेदवारीचा फॉर्म्युला ठरल्यानंतरच अंतिम चित्र स्पष्ट होणार आहे.
तरीही, सध्या सर्वाधिक चर्चा प्राजक्त तनपुरे यांच्या नावाचीच सुरू आहे. भाजपसोबत त्यांनी घेतलेल्या सहकार्याच्या भूमिकेमुळे त्यांच्याकडे ‘सॉफ्ट कॉर्नर’ने पाहिले जात असल्याचे बोलले जात आहे. प्राजक्त तनपुरे यांच्या पुढील राजकीय भूमिकेबाबतही उत्सुकता वाढली आहे. त्यांच्या निर्णयावर त्यांचे मामा आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे नेते जयंत पाटील यांच्या भूमिकेचा प्रभाव राहू शकतो, अशी चर्चा आहे.
विशेष म्हणजे, राहुरी पोटनिवडणुकीनंतर तनपुरे यांनी अद्याप भाजपच्या व्यासपीठावर अधिकृत हजेरी लावलेली नाही. मात्र त्यांच्या सहकार्याच्या भूमिकेचे भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि विधान परिषद सभापती प्रा. राम शिंदे यांनी खुलेआम कौतुक केले होते.
दरम्यान, उमेदवारी अर्ज विक्री आणि दाखल प्रक्रियेच्या पहिल्याच दिवशी 9 जणांनी तब्बल 16 अर्ज घेतले. मात्र एकही अर्ज दाखल झाला नाही. अर्ज घेणाऱ्यांमध्ये देवळाली प्रवरा नगरपंचायतीचे भाजप नगराध्यक्ष सत्यजीत कदम यांच्या पत्नी प्रीती कदम, भाऊसाहेब रामदास शिंदे, सुधीर वैरागर, कमलेश गांधी, आशिष शेलार, संतोष चोळके, मनीषा कदम, ॲड. शिवाजी शिंदे आणि प्रवीण दळवी यांचा समावेश आहे.
अहिल्यानगर विधान परिषद निवडणुकीत महायुतीचा उमेदवार कोण असणार, भाजप आणि अजित पवार गटात जागा कुणाकडे जाणार आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे प्राजक्त तनपुरे खरंच महायुतीच्या तिकिटावर मैदानात उतरणार का, याकडे आता संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.