Ahilyanagar News: अहिल्यानगर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीत महाव्होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला. या निवडणुकीतून उमेदवारी अर्ज माघारी घेण्यासाठीची अखेरची मुदत गुरुवारी (ता.4 जून) दुपारी 3 पर्यंत होती. यावेळी अपक्ष उमेदवार करण ससाणे यांनी आपला अर्ज मागे घेतला होता. यानंतर दत्तात्रय पानसरे यांचा उमेदवारी अर्ज बाद होण्यावरुन हायव्होल्टेज ड्रामा झाला. अखेर भाजप व महायुतीचे उमेदवार प्राजक्त तनपुरे यांची विधानपरिषद निवडणुकीच्या अहिल्यानगर मतदारसंघातून बिनविरोध निवड झाली आहे.
विधानपरिषदेच्या अहिल्यानगर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीत भाजपचे उमेदवार प्राजक्त तनपुरे यांच्यासह श्रीरामपूरचे काँग्रेसचे नगराध्यक्ष करण ससाणे, राज्य पणन महासंघाचे अध्यक्ष दत्तात्रय पानसरे, शेवगावचे कमलेश गांधी व अकोल्याचे मच्छिंद्र धुमाळ यांनी अर्ज दाखल केले होते.
अहिल्यानगर निवडणुकीच्या रिंगणातून अर्ज माघारीच्या दिवशी कोण व कधी अर्ज मागे घेतो, याची उत्सुकता होती. सर्वात आधी दुपारी 1च्या सुमारास मच्छिंद्र धुमाळ यांनी माघार घेतली. त्यानंतर पावणे दोनच्या सुमारास करण ससाणे व कमलेश गांधी यांनी माघार घेतली. गांधी यांना शेवगाव-पाथर्डीच्या भाजप आमदार मोनिकाताई राजळे घेऊन आल्या होत्या. त्यानंतर पानसरेंच्या आगमनाची प्रतीक्षा होती.
विधान परिषदेच्या अहिल्यानगर स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघाच्या निवडणुकीत अर्ज माघारीच्या अखेरच्या क्षणी ट्विस्ट आला. या निवडणुकीच्या रिंगणातील अपक्ष उमेदवार दत्तात्रय पानसरे यांनी आपल्यावतीने आपल्या अनुमोदकाने दाखल केलेल्या माघारीच्या अर्जाला आक्षेप घेतला. पानसरे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातच यावरुन मोठा गोंधळ घातला. पण अखेर माजी खासदार सुजय विखे आणि अहिल्यानगर शहराचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप यांनी पानसरेंची समजूत काढल्यानं त्यांनी माघार घेतली. या माघारीनंतर अखेर प्राजक्त तनपुरेंची बिनविरोध निवड झाली.
मी कोणालाही प्राधिकृत केलेले नाही व कोणत्याही अर्जावर सही केलेली नाही. त्यामुळे माझा उमेदवारी अर्ज वैध (पात्र) गृहित धरला जावा, असे त्यांचे म्हणणे आहे. माझा अर्ज वैध मानला गेला नाही तर मी आत्मदहन करेन व माझे धड येथून जाईल, असा निर्वाणीचा इशारा त्यांनी दिला. याचवेळी त्यांनी राज्य पणन महासंघाच्या अध्यक्षपदाचा राजीनामाही माध्यमांसमोर जाहीर केला.
दरम्यान, पानसरेंनी ऐनवेळी घेतलेल्या भूमिकेने खळबळ उडाली असून, प्राजक्त तनपुरेंची निवड बिनविरोध होईल असा दावा करणारे शहराचे आमदार संग्राम जगताप यांचीही काहीकाळासाठी धडधड वाढल्याचं दिसून आलं होतं.
प्राजक्त तनपुरे सध्या भाजपकडून अहिल्यानगर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीचे उमेदवार आहेत. त्यांच्या पक्षांतरानंतर राष्ट्रवादी शरद पवार गटात आणि जिल्ह्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली होती.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.