Prajakt Tanpure Vs Shivaji Kardile  Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Prajakt Tanpure Vs Shivaji Kardile : 'साडेचार वर्षे झोपून होते, आता दरबार घेऊ लागलेत'; आमदार तनपुरेंचा कर्डिलेंना टोला

Prajakt Tanpur informed Shivaji Kardile about the development works : महाविकास आघाडी सरकारच्या काळातील मंजूर कामांना दिलेली स्थगिती उच्च न्यायालयाने उठवल्याचे सांगत साडेचार वर्षे घरात झोपून राहिलेले, आता निवडणुकांमुळे जागे झालेत, अशी टोलेबाजी प्राजक्त तनपुरे यांनी केली.

Pradeep Pendhare

Ahmednagar News : महाविकास आघाडी सरकारच्या काळातील कामांना महायुती सरकारने दिलेली स्थगिती उच्च न्यायालयाने उठवली आहे. यातही काहीजण आडवे येत आहेत. आडवे येणारे कोण आहेत, हे सर्वश्रुत आहे, असे सांगून उच्च न्यायालयाने स्थगिती उठवल्यानंतर काम ज्या विभागाशी निगडीत आहेत, त्या विभागातील अधिकाऱ्यांच्या भेटी घेतली. वस्तुस्थिती समजून सांगितली आणि न्यायालयाचा अवमान होईल, असे लक्षात आणून दिल्यानंतर कामांना पुन्हा मंजुरी मिळवली, असे आमदार प्राजक्त तनपुरे यांनी सांगितले.

याचवेळी शिवाजी कर्डिले यांचे नाव न घेता आमदार तनपुरे यांनी जोरदार टोलेबाजी केली. "विधानसभा निवडणुका जवळ आल्याने गेली साडेचार वर्षे घरात झोपून राहिलेले आता जनता दरबार घेऊ लागले आहेत", असा खोचक टोला शिवाजी कर्डिले यांनी तनपुरे यांनी लगावला.

विधानसभा निवडणुका समोर आहेत. त्यामुळे इच्छुकांनी कामांचा झपाटा लावला आहे. आजी-माजी आमदारांमध्ये स्पर्धा लागली आहे. मतदारांपर्यंत सर्वात अगोदर कोण पोचतो, यासाठी वेगवेगळ्या माध्यमांतून एकमेकांवर कुरघोड्या केल्या जात आहेत. राहुरी विधानसभा मतदारसंघात देखील तसेच राजकारण रंगले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार (Sharad Pawar) पक्षाचे आमदार प्राजक्त तनपुरे आणि भाजपचे माजी आमदार जिल्हा सहकारी बँकेचे अध्यक्ष शिवाजी कर्डिले यांच्यात देखील विकास कामांवरून कुरघोड्यांचे राजकारण रंगले आहे. आमदार तनपुरे लोकप्रतिनिधी म्हणून मतरारसंघ पिंजून काढत आहेत. विकास कामांचा वेग देताना दिसत आहेत.

भाजपचे (BJP) शिवाजी कर्डिले यांनी याच मतदारसंघातून प्रतिनिधीत्व केलेले आहे. गेल्या पंचवार्षिकला तनपुरे यांच्याकडून त्यांचा पराभव झाला. यावेळी त्यांनी जोरदार तयारी केली आहे. कोणत्याही परिस्थितीत यश मिळवायचेच, असा चंग त्यांनी बांधला आहे. त्यामुळे जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदाच्या माध्यमातून ते राहुरी विधानसभा मतदारसंघात मतपेरणी करत आहेत. यातून या दोघांमध्ये कुरघोड्यांचे राजकारण रंगले आहे.

यातून विकास कामांना देखील 'खो' घातला जात आहे. महाविकास आघाडी सरकारच्या काळात मंजूर कामांना महायुती सरकारने स्थगिती दिली होती. या स्थगितीला महाविकास आघाडीतील आमदारांनी न्यायालयात आव्हान दिली. राहुरी-पाथर्डी-नगर विधानसभा मतदारसंघातील 30 कोटी रुपयांच्या कामांची स्थगिती उच्च न्यायालयाने उठवली आहे. ज्या लोकांनी कामांवर स्थगिती आणली होती, तेच आता श्रेय घेण्यासाठी धडपडत असल्याचा टोला आमदार प्राजक्त तनपुरे यांनी लगावला.

राहुरीमधील सोनगाव, धानोरे, तुळापूरमधील सुमारे 3 कोटी रुपये खर्चाच्या शाळा खोल्या, रस्ते कामांचे भूमिपूजन आमदार तनपुरे यांच्या हस्ते झाले. यावेळी आमदार तनपुरे यांनी माजी आमदार कर्डिले यांचे नाव न घेता जोरदार टीकास्त्र सोडले. "विधानसभा निवडणुका जवळ आल्याने गेली साडेचार वर्षे घरात झोपून राहिलेले आता जनता दरबार घेऊ लागले आहेत. आपण राज्यमंत्री असताना मतदारसंघात 400 रोहित्रे बसवली. आपल्याच काळात 46 कोटी रुपये खर्चाच्या नवीन प्रशासकीय इमारतीचा प्रस्ताव दाखल होता. गेल्या दहा वर्षात राहुरी बसस्थानकाला एकही विट ज्यांनी लावली नाही, आता नव्याने इमारतीचे बांधकाम सुरू झाल्यावर काहींचा पोटसुळ उठला आहे", असा टोला तनपुरे यांनी कर्डिलेंना लगावला.

शेतकऱ्यांसाठी तीन ते चार हजार कोटी खर्च करा

राज्यात लाडकी बहीण योजनेचा महायुती सरकारकडून खूप गाजावाजा होत आहे. यावर ही योजनेचे सरकारचे प्रयोजन काय, हे सर्वांना माहिती आहे. महाराष्ट्र सुशिक्षित आहे. पुरोगामी विचार काय असतो, हे महाराष्ट्रातून देश शिकत असतो. लाडकी बहीण योजनेवर सरकार 46 हजार कोटी रुपये खर्च करत आहेत. तसेच शेतकऱ्यांना दिवसा वीज देण्यासाठी तीन ते चार हजार कोटी रुपये खर्च आला, तर काय बिघडेल, असे प्रश्न आमदार प्राजक्त तनपुरे यांनी केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT