Shrirampur Crime News : श्रीरामपूर तालुक्यातील गोंधवणी येथे एकनाथ शिंदे शिवसेनेचे पदाधिकारी प्रशांत कहाणे यांच्यावरील कथित गोळीबार हल्ल्याच्या प्रकरणाला आता नवे आणि धक्कादायक वळण मिळाले आहे.
स्वतःवर जीवघेणा हल्ला झाल्याची तक्रार करणारे प्रशांत कहाणे याच्यासह अन्य सहाजणांविरोधात श्रीरामपूर शहर पोलिस ठाण्यात अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यासह विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुष्पा राजू बोरकर (रा. गोंधवणी, ता. श्रीरामपूर) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, 8 जूनच्या रात्री त्या घरासमोर नातवंडांना खेळवत असताना श्रीरामपूरहून (Shrirampur) गोंधवणीकडे जाणारी पांढऱ्या रंगाची चारचाकी भरधाव वेगाने गेली. त्यामुळे रस्त्यालगत खेळणारी मुले घाबरली. यानंतर त्यांचा मुलगा साई बोरकर याने संबंधित वाहनचालकाला वाहनाचा वेग कमी करण्यासाठी थांबविण्याचा प्रयत्न केल्याचे फिर्यादीत नमूद आहे.
फिर्यादीनुसार, (Crime) संबंधित वाहन काही अंतर पुढे गेल्यानंतर पुन्हा मागे फिरून बोरकर यांच्या घरासमोर थांबले. त्यातून प्रशांत कहाणे, विजू कहाणे, संतोष कहाणे, दिगंबर कहाणे, देविदास कहाणे आणि अन्य दोन अनोळखी व्यक्ती खाली उतरल्या. वाहनाला दगड मारल्याच्या कारणावरून दोन्ही बाजूंमध्ये वाद निर्माण झाला.
यावेळी वाहन भरधाव चालवू नये, अशी सूचना केल्याने संतप्त झालेल्या संशयितांनी फिर्यादी व त्यांच्या मुलाला जातीवाचक शिवीगाळ करून अपमानित केले. तसेच जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. या तक्रारीच्या आधारे श्रीरामपूर शहर पोलिसांनी प्रशांत कहाणे आणि त्यांच्या सहकाऱ्यांविरोधात ॲट्रॉसिटी कायद्यासह विविध कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे.
या प्रकरणातील सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे, याच दिवशी रात्री उशिरा प्रशांत कहाणे यांनी स्वतःवर जीवघेणा हल्ला झाल्याची तक्रार पोलिसांकडे नोंदवली होती. या तक्रार गोळीबार झाल्याचा दावा केला होता. गोंधवणी परिसरात काही जणांनी त्यांचे वाहन अडवून दांडके व लोखंडी रॉडच्या साहाय्याने हल्ला केल्याचा आरोप त्यांनी केला होता.
दरम्यान, त्या घटनेचा तपास सुरू असतानाच आता बोरकर यांच्या फिर्यादीवरून कहाणे व त्यांच्या सहकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल झाल्याने या दोन घटनांमधील नेमका संबंध काय, याचा शोध घेण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर उभे राहिले आहे. त्यामुळे या प्रकरणाकडे आता संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले असून तपासातून नेमके सत्य काय समोर येते, याकडे राजकीय आणि सामाजिक वर्तुळाचेही लक्ष केंद्रित झाले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.