

Shivaji Maharaj Remarks Backlash: एकनाथ शिंदे शिवसेनेचे बुलढाणा इथले आमदार संजय गायकवाड यांनी शिवाजी कोण होता? या पुस्तकावरून प्रकाशक प्रशांत अंबी यांना दिलेल्या धमक्यांची आॅडिओ क्लिप मोठ्याप्रमाणात व्हायरल झाली आहे. प्रशांत अंबी यांना अजूनही धमक्यांचे फोन येत आहेत. यासंदर्भात त्यांनी वकील असीम सरोदे यांच्यामार्फत कोल्हापूर पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे.
या तक्रारीवरून आमदार गायकवाड यांनी पुस्तकाच्या निमित्ताने छत्रपती शिवाजी महाराजांविषयी काही विधानं केली आहेत. आता प्रश्न येतो की, शिवद्रोही श्रीपाद छिंदम याच्यावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी, त्यावेळी नगर विकास मंत्री असताना, नगरसेवक पद रद्दची कारवाई केली होती. ती कारवाई आता पुन्हा चर्चेत आली आहे. छिंदमवर कारवाई होत असेल, तर आमदार गायकवाड यांना अभय का? असा प्रश्न आता चर्चेत आला आहे.
शिवद्रोही श्रीपाद छिंदम याने 17 फेब्रुवारी 2018 रोजी छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) यांच्याविषयी अवमानकारक विधान केलं होतं. त्याची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली. छिंदम याच्या या प्रकाराचे राज्यभर पडसाद उमटले होते. त्यावेळी युतीचे सरकार राज्यात होते. यानंतर छिंदम याच्यावर शिवद्रोहीचा शिक्का बसला.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) त्यावेळी नगर विकास मंत्री होते. आजही हे खातं त्यांच्याकडेच आहे. श्रीपाद छिंदमविरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल होऊन, नगरसेवक पद रद्दची कारवाई झाली होती. नगर विकास मंत्री असल्याने एकनाथ शिंदे यांच्यासमोर छिंदमच्या प्रकरणाची सुनावणी झाली.
त्यावेळी श्रीपाद छिंदम हा एकनाथ शिंदे यांना एवढा टरकला होता की, तो सुनावणीला हजर राहायचा नाही. आजारपणाचे कारण देत, त्याने सुनावणी टाळली होती. एकनाथ शिंदे यांनी पुढे त्याचे नगरसेवक पद रद्दचा आदेश काढला.
आता विषय येतो, बुलढाणा इथले आमदार संजय गायकवाड यांचा! शिवाजी कोण होता? या पुस्तकाच्या शीर्षकावरून, त्यांनी प्रकाशक प्रशांत अंबी यांना फोन करत जिवे मारण्याची धमकी दिली. अर्वाच्य भाषा वापरली. प्रशांत अंबी यांना अजूनही धमकीचे फोन सुरू आहेत.
आमदार गायकवाड यांनी दिलेल्या धमकीप्रकरणाची तक्रार प्रशांत अंबी यांनी वकील असीम सरोदे यांच्यामार्फत कोल्हापूर पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीचे स्वरूप वकील असीम सरोदे यांनी समाज माध्यमांवर शेअर केलं आहे. या तक्रारीनुसार आमदार गायकवाड यांनी बोलण्यातून कुठेतरी छत्रपतींचा अवमान झाल्याचे दिसते. तसे निरीक्षण कायदे तज्ज्ञांनी, वकील असीम सरोदे यांच्या समाज माध्यमांवरील तक्रारीवरून व्यक्त केले आहे.
आता प्रश्न असा येतो की, शिवद्रोही श्रीपाद छिंदम याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा नोंद होऊन, कारवाई होते. तर आमदार गायकवाड यांना अभय का? आता या प्रकरणात आमदार गायकवाड यांनी दिलगिरी देखील व्यक्त केली आहे. तसे खुलासे देखील आले आहेत. एकनाथ शिंदे यांनी देखील गायकवाड यांनी माफी मागितल्याचे म्हटलं आहे. त्यावेळी श्रीपाद छिंदम याने देखील खुलासे केले होते. माफी मागितली होती. पण आजही तो या प्रकरणाला समोरे जात आहे.
श्रीपाद छिंदम हा आता महापालिकेच्या निवडणुकीत जिंकून आला आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्ताने, छिंदम याने अहिल्यानगरमध्ये यंदा मोठा कार्यक्रम घेतला. या कार्यक्रमाला देखील हिंदुत्ववादी संघटनांनी विरोध केला होता. पुढे याचे पडसाद असे उमटले की, छिंदम हा निवडणूक आला असला तरी, त्याला सत्ताधाऱ्यांनी पहिल्याच महासभेवेळी सभागृहातून हकलावून लावले. याबाबत त्याने तक्रार देखील केली आहे.
बागेश्वर धाम सरकारचे धीरेंद्र शास्त्री महाराज यांनी देखील नागपूर इथं कार्यक्रमात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या गुरू-शिष्यावरून वाद ओढावून घेतला आहे. यातून सत्ताधाऱ्यांची विरोधकांनी कोंडी केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.