Prataprao Dhakane  Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Prataprao Dhakane : प्रताप ढाकणेंनी वडिलांच्या आठवणीत ऊसतोडणी कामगारांसोबत साजरी केली दिवाळी

राजेंद्र त्रिमुखे

माजी केंद्रीय मंत्री बबनराव ढाकणे यांचे गेल्याच महिन्यात निधन झाले. ऊसतोडणी कामगारांचे नेते आणि संघर्ष योद्धा म्हणून त्यांची ओळख कायम राहिली आहे. त्यांच्या निधनाला काही दिवंसच झालेले असताना त्यांनी आयुष्यभर कष्टकरी ऊसतोड कामगारांना जिवाभावाने जपले, तोच आदर्श घेत त्यांचे पुत्र राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस प्रतापकाका ढाकणे यंदाची दिवाळी ऊसतोड कामगारांच्या फडात जात त्यांच्या पालावर साजरी केली.

वडिलांचे निधन झाले असतानाही ते दुःख बाजूला सारत राष्ट्रवादीचे नेते प्रतापकाका ढाकणे यांनी दिवाळीचा सण ऊसतोड मजुरांच्या फडात जात मजूर व त्यांच्या कुटंबियांना मिठाई ,मुलांना फटाके देत साजरी करताना त्यांचा आनंद द्विगुणित केला. अचानक मिळालेल्या या भेटीने मजुरांची दिवाळी गोड तर झालीच, त्याचबरोबर यानिमित्ताने दिवंगत बबनराव ढाकणे यांच्या आठवणींना उजाळा मिळाला. मागील महिन्यात 27 ऑक्टोबरला माजी केंद्रीय मंत्री बबनराव ढाकणे यांचे दुःखद निधन झाले. ऐन दिवाळीत ही घटना घडल्याने सध्या प्रतापराव ढाकणे व त्यांच्या कुटुंबीयांवर शोककळा पसरली असून, स्व. बबनराव ढाकणे यांना राज्यासह परराज्यात मानणारा मोठा वर्ग सध्या प्रतापकाका ढाकणे यांचे सांत्वन करण्यासाठी पाथर्डी येथे येत आहे.

अचानक झालेल्या या घटनेमुळे प्रतापराव ढाकणे अस्वस्थ असले तरीही त्यांनी काल दिवाळीच्या दिवशी तालुक्यातील गाडेवाडी,जवळवाडी व खरवंडी कासार येथे असलेल्या ऊसतोड मजुरांच्या कोपीत जाऊन त्यांना मिठाईचे वाटप करत त्यांच्या मुलांना फटाके देत त्यांची आस्थेने चौकशी केली. ऐन दिवाळीच्या दिवशीच मिठाई व फटाके मिळाल्याने मजुरांच्या कुटुंबाचा आनंद गगनात मावेनासा झाला.

सध्या साखर कारखान्यांचा गाळप हंगाम चालू झाला असून, तालुक्यातील अनेक ठिकाणचा मजूर ऊस तोडण्यासाठी परजिल्ह्यातून मोठ्या संख्येने तालुक्यात ऊसतोडण्यासाठी आले आहेत. या सर्वांशी संवाद साधत प्रतापकाका ढाकणे यांनी त्यांची आस्थेने विचारपूस करत त्यांना दिवाळी सणाच्या शुभेच्छा दिल्या.

"उपेक्षित वंचित ऊसतोडणी कामगारांच्या बळावरच स्वर्गीय बबनराव ढाकणे यांनी काम केले. त्यांच्या निधनानंतर त्यांच्या आदर्श वाटचालीवर काम करत, आज मी या उसाच्या फडात आलो आहे. या घटकांना न्याय देण्यासाठी त्यांनी संपूर्ण जीवन वेचले आणि त्यांना न्याय मिळवून दिला. तो घटक शासकीय आणि कायदेशीरदृष्ट्या उपेक्षित होता त्यांच्यासाठी त्यांनी संपूर्ण आयुष्य खर्च केले. त्यांना कायदेशीर अधिकार मिळवून दिला याची जाणीव आज संपूर्ण महाराष्ट्राला आहे", असे ढाकणे म्हणाले.

आज मी दुःखात असलो तरी त्यांनी ज्या वर्गासाठी काम केले स्वतःचे दुःख पचवून कष्टकरी माणसं सुखात राहिले पाहिजे, अशी त्यांची धारणा होती.आज त्यांच्या पहिल्या जयंतीनिमित्ताने मी आज त्यांच्याच घालून दिलेल्या वाटचालीवर काम करत आहे. इथून पुढे असेच काम माझ्याकडून होत राहतील. मी आज ऊसतोडणी कामगारांच्या फडात आलो असलो तरी माझ्या कुटुंबात सहभागी झालो, असा अनुभव मला प्राप्त होत आहे. आणि ढाकणे साहेबांची आठवण नितांत राहील.

SCROLL FOR NEXT