Pune Graduate Constituency election 2026; Sunetra Pawar And Sunil Tatkare  Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Pune Graduate Seat Dispute : पुणे पदवीधरची जागा भाजपला जाणं हे आमचं सामूहिक अपयश : राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष पहिल्यांदाच बोलले

Sunil Tatkare On Pune Graduate Constituency Seat : विधान परिषदेच्या पुणे पदवीधर विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत महायुतीतच जोरदार रस्सीखेच पाहायला मिळाली होती. पण भाजपने धक्कातंत्राचा वापर करत ‘राष्ट्रवादी’कडून हा मतदारसंघ काढून घेतला आहे.

Aslam Shanedivan

Mumbai News : सध्या राज्यात विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीचे वारे पाहायला मिळत आहेत. अनेक ठिकाणी महायुतीत आणि महाविकास आघाडीत बंडखोरी पाहायला मिळाली आहे. पुणे पदवीधर विधानसभा मतदारसंघासाठीदेखील महायुतीत मतभेद समोर आले आहेत. तर भाजपच्या धक्कातंत्रामुळे ‘राष्ट्रवादी’चा हक्काचा मतदारसंघ गेला आहे. यावर आता राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी पहिल्यांदाच भाष्य केलं आहे.

विधान परिषदेच्या पुणे पदवीधर मतदारसंघात भाजपने ऐनवेळी धक्कातंत्राचा अवलंब करत स्मिता जाधव यांना उमेदवारी दिली. त्यांनी सोमवारी (ता. ५) पुण्यात विभागीय आयुक्त कार्यालयात जाऊन अर्ज दाखल केला. मात्र, याचवेळी पदवीधर मतदारसंघासाठी भाजपकडून आग्रही असणारे आमदार अरुण लाड यांचे चिरंजीव शरद लाड यांनीदेखील अर्ज भरला आहे. यामुळे चर्चांना उधाण आले असतानाच आता हा हक्काचा मतदारसंघ राष्ट्रवादीकडून गेल्याची चर्चा अधिक होताना दिसत आहे.

सर्वांचे सामूहिक अपयश

तटकरे यांनी, ही जागा आमच्या हक्काची होती. ती मिळाली नाही, ही वस्तुस्थिती खरी आहे. चर्चेत आम्ही नक्कीच कमी पडलो. हे आमच्या सर्वांचे सामूहिक अपयश आहे. ही जागा मिळणे गरजेचेच होते. कारण ही जागा पाच वर्षांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसची होती. विद्यमान आमदार लाड हे त्या ठिकाणी निवडून आले होते. पण अखेरच्या टप्प्यात लाड हे इकडे-तिकडे गेले. पण मतदान हे पक्षाचं होतं. यामुळेच ती जागा आम्हाला मिळायला हवी, असा आमचा आग्रह होता. मात्र, याबाबतचा निर्णय शेवटी पक्षाच्या वरिष्ठ पातळीवरती झाला. राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांनी चर्चा केल्यानंतरच हा निर्णय झाल्याचे तटकरे म्हणाले.

सुनेत्रा पवार आमच्या अध्यक्षा

सुनेत्रा पवार या एकट्याच जागा वाटपांच्या चर्चेत होत्या, या मुद्द्यावर तटकरे म्हणाले की, सुनेत्रा पवार या आमच्या पक्षाच्या अध्यक्षा आहेत. त्यांना पक्षाचे सर्व निर्णय घेण्याचे पूर्ण अधिकार आहेत. ते आम्ही सर्वांनीच मिळून दिलेले आहेत. सुनेत्रा पवार यांनी एकट्याने चर्चा केली म्हणून काही वेगळा अर्थ काढण्याचे कारण नाही. शेवटी पक्ष नेतृत्वाच्या अखत्यारीतल्या काही चर्चा या होत असतात.

जसं भाजपचं नेतृत्व देवेंद्र फडणवीस करत आहेत. मुख्यमंत्री म्हणून ते करत आहेत. तसंच शिवसेनेचं नेतृत्व शिंदे साहेब उपमुख्यमंत्री म्हणून करत आहेत. त्याचप्रमाणे सुनेत्रा पवार या पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून त्या ठिकाणी होत्या. यामुळे यात वेगळं काही आहे, असे म्हणण्याचे काहीच कारण नाही, असं आपल्याला वाटतं, असल्याचेही तटकरे यांनी म्हटलं आहे.

...तसं का केलं नाही?

यावेळी शिक्षक मतदारसंघावर शिवसेनेकडून दावा सांगत मंगेश चिवटे यांना उमेदवारी दिली, त्याप्रमाणे राष्ट्रवादीने का केलं नाही, असा सवाल विचारला जात आहे. यावरदेखील तटकरे यांनी भाष्य केलं आहे. त्यांनी, आज अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस होता. त्याप्रमाणे अर्ज दाखल झाले आहेत. पण ते अर्ज शेवटपर्यंत राहतीलच असे नाही. यामुळे कोणाचे काढण्यात काही कारणं नाही.

शेवटी देशामध्ये एनडीएमध्ये आम्ही पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वात आम्ही एकत्र आलो आहोत. तर राज्यात जेव्हा महायुती म्हणून एकत्र आलो आहोत. यामुळे यावेळी देखील महायुतीच म्हणून ही निवडणूक लढवली गेली पाहिजे. जागा मिळणं न मिळणं हा भाग वेगळा आहे. आता या पुणे पदवीधरबाबत मी माझं व्यक्तिगत मत मांडलं आहे. पण जेव्हा पक्षांतर्गत बैठक होईल, त्यावेळी देखील याबाबत चर्चा केली जाईल.

महायुती म्हणूनच लढणार

गरज पडल्यास मुख्यमंत्री आणि केंद्रीय नेतृत्वाची देखील सामूहिक भेट घेऊ. पण आता मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांनी मैत्रीपूर्ण लढतीपेक्षा महायुती म्हणूनच निवडणुकीला सामोरं जावं, असा निर्णय येईल. कारण अद्याप अर्ज मागे घेण्याचा दिवस शिल्लक आहे. यामुळे राजकारणात अनेकदा चर्चा हाच महत्त्वाचा भाग असतो. आणि चर्चा करतच यातून मार्ग काढायचे असतात. तर चर्चा ही तिन्ही नेतेच करणार असून ते नक्कीच याचा विचार करतील.

पक्षाची बार्गेनिंग पॉवर कमी झाली?

दादा असताना पक्षाची बार्गेनिंग पॉवर होती, ती कमी झाल्याच्या आरोपावरदेखील तटकरे यांनी उत्तर दिलं आहे. दादा हे दादा होते. त्यामुळे तो भाग वेगळा आहे. बार्गेनिंग पॉवर म्हणजे पक्ष, पक्षाची स्थिती, ताकद आणि हक्काने मिळायच्या ज्या जागा असतील. त्या कमी जरी झाल्या असतील, तरी आमच्या वहिनी सक्षम आहेत. आमच्या नेत्या आहेत. प्रभावीपणाने त्या पक्षाची भूमिका मांडत असतात. यातूनच पक्षाची बार्गेनिंग पॉवर कमी झाली, असा अर्थ काढणे चुकीचे ठरेल, असेही तटकरे यांनी म्हटलं आहे.

बंडखोर आणि अपक्षांना इशारा

बंडखोर आणि अपक्षांनादेखील तटकरे यांनी इशारा दिला असून तिन्ही नेतृत्वाच्या माध्यमातून त्यांचा पाडाव करण्याची ताकद आहे. या बंडखोरी आणि अपक्षांचा निकालावर कोणताही परिणाम होणार नाही, असाही विश्वास तटकरे यांनी व्यक्त केला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT