Satyajeet Tambe has directly warned the Railway Ministry over the Pune-Nashik semi high-speed railway project amid delay concerns Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Satyajeet Tambe Pune Nashik Railway : पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे ‘डब्यात’? सत्यजीत तांबेंचा रेल्वे मंत्रालयाला थेट इशारा

Satyajeet Tambe on Pune Nashik railway: अहमदाबाद प्रकल्पाला पहिल्या सेमी हाय-स्पीड रेल्वेचा दर्जा मिळताच महाराष्ट्रातील पुणे-नाशिक रेल्वे प्रकल्प गुंडाळला जाणारच्या वृताने आमदार सत्यजीत तांबेंनी घेतला मोठा निर्णय.

Pradeep Pendhare

Pune Nashik Semi High Speed Rail Project : केंद्रीय आर्थिक व्यवहार विषयक मंत्रिमंडळ समितीने अहमदाबाद (सारखेज)-धोलेरा सेमी हाय-स्पीड दुहेरी रेल्वेमार्ग प्रकल्पाला मंजुरी दिल्यानंतर महाराष्ट्रातील पुणे-नाशिक सेमी हाय-स्पीड रेल्वे प्रकल्पाबाबत नव्या चर्चांना उधाण आले आहे.

अहमदाबाद प्रकल्पाला देशातील “पहिला सेमी हाय-स्पीड रेल्वे प्रकल्प” म्हटले गेल्याने, पुणे-नाशिक प्रकल्प गुंडाळला गेला का? असा सवाल उपस्थित होत आहे. या पार्श्वभूमीवर नाशिक पदवीधर मतदारसंघाचे अपक्ष आमदार सत्यजीत तांबे यांनी पहिली तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. “महाराष्ट्राला वारंवार डावललं जात असेल, तर हा अन्याय सहन केला जाणार नाही,” असा इशारा त्यांनी दिला आहे.

आमदार सत्यजीत तांबे (Satyajeet Tambe) यांनी ‘एक्स’वरील पोस्टमध्ये पुणे-नाशिक सेमी हाय-स्पीड रेल्वे प्रकल्प रद्द झाल्याच्या चर्चांबद्दल चिंता व्यक्त केली. “केंद्रीय रेल्वेमंत्र्यांनी सरळ मार्गाने प्रकल्प पुढे नेण्यासाठी सकारात्मक भूमिका दर्शवली होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही अधिवेशनात समिती नेमण्याची घोषणा केली होती. अशा परिस्थितीत प्रकल्पाबाबत नकारात्मक चर्चा समोर येणं चिंताजनक आहे,” असे त्यांनी म्हटले.

तसेच, “पुणे-नाशिक सेमी हाय-स्पीड रेल्वे (Railway) प्रकल्पाचे नेमके काय झाले? याबाबत वस्तुस्थिती जाणून घेण्यासाठी मी लवकरच केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेणार आहे. प्रकल्प खरोखरच रद्द झाला असेल, तर रेल्वे मंत्रालयाचा जाहीर निषेध करणार,” असा इशाराही त्यांनी दिला.

सत्यजीत तांबे यांनी पुणे-नाशिक-अहिल्यानगर विकास पट्ट्याचा मुद्दाही अधोरेखित केला. “हा भाग उद्योग, शिक्षण, कृषी आणि रोजगाराच्या दृष्टीने झपाट्याने विकसित होत आहे. त्यामुळे या विभागाला जलद रेल्वे संपर्काची नितांत गरज आहे,” असे त्यांनी नमूद केले.

दरम्यान, देशातील इतर राज्यांमध्ये हाय-स्पीड आणि सेमी हाय-स्पीड रेल्वे प्रकल्पांना वेग दिला जात असताना महाराष्ट्रातील महत्त्वाकांक्षी प्रकल्प रखडत असल्याची भावना स्थानिक पातळीवर व्यक्त होत आहे. “इतर राज्यांतील प्रकल्पांचे आम्ही स्वागत करतो; मात्र महाराष्ट्राला सातत्याने डावलले जात असेल, तर ते सहन केले जाणार नाही,” असा स्पष्ट इशारा तांबे यांनी दिला.

पुणे-नाशिक रेल्वे प्रकल्प किती महत्त्वाचा?

सुमारे 235 किलोमीटर लांबीचा हा प्रस्तावित रेल्वेमार्ग पुणे, अहिल्यानगर आणि नाशिक या तीन जिल्ह्यांतून जाणार आहे. चाकण, मंचर, नारायणगाव, संगमनेर आणि सिन्नर ही महत्त्वाची स्थानके प्रस्तावित असून, या मार्गामुळे पुणे-नाशिक प्रवास अवघ्या दोन तासांत पूर्ण होण्याची शक्यता आहे. प्रकल्पाचा अंदाजे खर्च सुमारे 16 हजार कोटी रुपये मानला जात आहे.

मार्ग बदलामुळे वाद

मुळात हा प्रकल्प संगमनेरमार्गे थेट नेण्याचा प्रस्ताव होता. मात्र नारायणगाव येथील ‘GMRT’ वेधशाळेला अडथळा निर्माण होईल, या कारणावरून रेल्वे मंत्रालयाने मार्ग बदलून तो शिर्डीमार्गे नेण्याचा पर्याय पुढे आणला.

स्थानिक नागरिक आणि लोकप्रतिनिधींचा दावा आहे की, शिर्डीमार्गे रेल्वेमार्ग नेल्यास अंतर आणि प्रवासाचा कालावधी वाढेल. तसेच जुन्या मार्गावरील औद्योगिकदृष्ट्या महत्त्वाची शहरं या प्रकल्पापासून वंचित राहतील. त्यामुळे या बदलाला तीव्र विरोध सुरू आहे.

थोरात-तांबे आक्रमक

या मार्गबदलाच्या विरोधात काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात आणि आमदार सत्यजीत तांबे यांनी आक्रमक भूमिका घेतली. जनआंदोलन उभारून त्यांनी स्थानिक आमदार, खासदार आणि माजी लोकप्रतिनिधींना एकत्र आणत आंदोलनाची धार वाढवली. वाढत्या विरोधानंतर राज्य सरकारने पुन्हा मूळ मार्गावर प्रकल्प राबवण्याची शक्यता तपासण्यास सुरुवात केली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT