Radhakrishna Vikhe  Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Radhakrishna Vikhe Patil : '..त्यामुळे लोकसभा निवडणुकीत आपला पराभव झाला' ; विखे पाटलांनी सांगितलं नेमकं कारण!

Sampat Devgire

Vikhe Patil on Vidha Sabaha Election News: लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचा पराभव झाला. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये मरगळ आली आहे. ही मरगळ दूर करण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात बैठका घेतल्या जात आहेत.

आगामी विधानसभा निवडणुकीच्या तयारीसाठी राज्याचे महसूल मंत्री डॉ राधाकृष्ण विखे पाटील(Radhakrishna Vikhe Patil) यांनी शनिवारी (आज) पदाधिकाऱ्यांना चार्ज केले. ते म्हणाले, 'विरोधी पक्षाच्या नेत्यांनी नकारात्मक वातावरण निर्माण केले. ते मतदारांवर बिंबवले आणि आपण फक्त पाहत राहिलो. त्यांच्या जाळ्यात अडकलो. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत आपला पराभव झाला आहे.'

'आता तरी याची जाणीव झाली पाहिजे. अन्यथा आगामी विधानसभा निवडणुकीत खूप मेहनत करावी लागेल. त्यामुळे जिद्दीने कामाला लागा. राज्यात पुन्हा एकदा आपले सरकार येणार आहे यात मला तरी कुठेही शंका वाटत नाही.'

भारतीय जनता पक्षाचे(BJP) कार्यकर्ते केंद्र आणि राज्य शासनाने केलेल्या कामाचा प्रचार करण्यात कमी पडले, हे मान्य करावे लागेल. विरोधक जेव्हा प्रचार करीत होते. नकारात्मक वातावरण तयार करीत होते. तेव्हा आपल्यापैकी किती पदाधिकाऱ्यांनी आपल्या गावात राज्य आणि केंद्र शासनाच्या योजनांचे फलक लावले. त्या योजना मतदारांना जाऊन सांगितल्या होत्या?, असा प्रश्नही त्यांनी केला.

महसूल मंत्र्यांनी पदाधिकाऱ्यांना सक्रिय होण्याचे आणि सावध राहण्याचे आवाहन केले. ते म्हणाले, 'जर पुन्हा महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत आले, तर आपण सुरू केलेल्या सगळ्या कल्याणकारी योजना ते बंद करून टाकतील. हे तुम्ही मतदार संघात जाऊन सांगा. गावोगावच्या लोकांना भेटा त्यांचं काय म्हणणं आहे, ते ऐकून घ्या. प्रत्येक विरोधकाला जशास तसे उत्तर द्या. आता आपण आपला नॅरेटिव्ह सेट करू.'

यावेळी त्यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे(Uddhav Thakreay) आणि काँग्रेस पक्षाचे नेत्यांवर सडकून टीका केली. चार वेळा मुख्यमंत्री राहिलेले शरद पवार यांनी आरक्षणासाठी काय केले? असा प्रश्न त्यांनी केला. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना आरक्षण रद्द झाले. याचा जाब त्यांना विचारावा लागेल.

विजेची बिले माफ करावीत याला शरद पवार(Sharad Pawar) यांचा विरोध आहे. वीज बिल माफ करणे योग्य नाही ही त्यांची भूमिका आहे आपण हे सर्व मतदारांना जाऊन सांगितले पाहिजे. येत्या निवडणुकीत युवकांना साद घालावी लागेल तरच आपण विधानसभा निवडणुकीत चांगली कामगिरी करू शकू असे असे सांगत महसूल मंत्र्यांनी भाजपच्या पदाधिकाऱ्यांचा उत्साह वाढविण्याचा प्रयत्न केला.

यावेळी भारतीय जनता पक्षाचे आमदार राहुल ढिकले, देवयानी फरांदे, सीमा हिरे, डॉ राहुल आहेर, जिल्हाप्रमुख जाधव, शहर प्रमुख प्रशांत जाधव, लक्ष्मण सावजी, माजी केंद्रीय राज्यमंत्री डॉ भारती पवार, आर्कि. अमृता पवार यांसह विविध पदाधिकारी आणि विविध मतदार संघाचे प्रमुख उपस्थित होते.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT