Ganesh Sugar Factory Election  Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Ganesh Sugar Factory : 'गणेश'वरुन विखे पाटलांचा थोरातांसह स्वपक्षीय कोल्हेंनाही इशारा; ''आम्हालाही पाहुणचाराला...''

Radhakrishna Vikhe Patil News : '' ...हा सत्‍तेचा गैरवापर नव्‍हता का? ''

सरकारनामा ब्यूरो

Ahmednagar : प्रवरा आणि गणेश सहकारी साखर कारखान्‍याच्‍या कराराला अडीच वर्षे मंजुरी मिळू न देणे हा सत्‍तेचा गैरवापर नव्‍हता का? असा थेट सवाल महसूल मंत्री ना.राधाकृष्‍ण विखे पाटील उपस्थित केला आहे. कारखान्‍याच्‍या निवडणूकीच्‍या निमित्‍ताने आलेल्‍या पाहुण्‍यांचा डोळा फक्त या भागातील ऊसावर आहे, गणेश कारखाना संजीवनी चालविणार की संगमनेर याची उत्‍तर सभासदांना अजूनही मिळत नाही. यांच्‍यापुढे कारखान्‍याच्‍या विकासाचा आणि सभासदांच्‍या उत्‍कर्षाचा कोणताही अजेंडा नसल्‍याचा थेट आरोप त्‍यांनी केला.

गणेश सहकारी साखर कारखान्‍याच्‍या संचालक मंडळाच्‍या निवडणूकीत जनसेवा पॅनलच्‍या उमेदवारांच्‍या प्रचाराचा शुभारंभ मंत्री राधाकृष्‍ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांच्‍या प्रमुख उपस्थितीत करण्‍यात आला. माजी मंत्री आण्‍णासाहेब म्‍हस्‍के पाटील यांच्‍या अध्‍यक्षतेखालील या सभेस खासदार डॉ.सुजय विखे पाटील, मुकूंदराव सदाफळ, मोहनराव सदाफळ, कमलाकर कोते, ज्ञानेश्‍वर गोंदकर, कैलासबापू कोते, साहेबराव निधाने, नितीन कापसे, कैलास सदाफळ, डॉ.के.वाय गाडेकर, दिपक रोहोम, सोपानराव सदाफळ, बाळासाहेब जपे आदि याप्रसंगी उपस्थित होते.

आपल्‍या भाषणात मंत्री विखे पाटील म्‍हणाले की, गणेश कारखान्‍याच्‍या कराराबाबतची चर्चा निवडणूक सुरु झाल्‍यापासून होत आहे. मात्र या कराराचा झालेला पत्र व्‍यवहार पाहीला तर, केवळ महाविकास आघाडीचे सरकार सत्‍तेवर असताना हा करार होवू दिला नाही. त्‍यांच्‍यातील काही लोकांनी न्‍यायालयात धाव घेतली. परंतू न्‍यायालयानेही त्‍यांची याचिका फेटाळून लावली. आता फक्‍त सभासदांची दिशाभूल करण्‍याचे काम सुरु आहे.

प्रवरा कारखान्‍याच्‍या सर्वसाधारण सभेत येवून गणेश कारखाना म्‍हणजे सहकाराला झालेला कॅन्‍सर आहे असे म्‍हणणा-यांचे मेव्‍हणेच आता मते मागायला येत असल्‍याचा टोला लगावून मंत्री विखे पाटील म्‍हणाले की, आज पॅनल करुन, जे समोर उभे आहेत त्‍यांच्‍यापैकी कोणीही गणेश कारखाना संजीवनी चालविणार की संगमनेर याचे उत्‍तर देत नाहीत. प्रवरेने हा कारखाना चालविण्‍याची जबाबदारी कालही घेतली आणि उद्याही घेणार असल्‍याची ग्‍वाही त्‍यांनी दिली.

काय काय भानगडी झाल्‍या...

गणेश कारखाना(Ganesh Sugar Factory) चालविण्‍यास घेतला त्‍यावेळी संपूर्णपणे अंधार होता. परंतू गुंतवणूक करुन, १८०० टनी कारखाना आता ३ हजार टनी केला. कामगारांची देणी दिली. सभासदांचे हित जोपासले, हे केवळ सहकार चळवळ जिवंत ठेवण्‍यासाठीचे प्रयत्‍न होते. परंतू हा कारखाना बंद राहिला असता तर, कोणत्‍याही खासगी व्‍यक्तीने याचे नटबोल्‍ट खोलून नेले असते. परंतू, आम्‍ही शेतकरी सभासदांची मालकी कायम ठेवली असल्‍याचे मंत्री विखे पाटील यांनी नमुद केले.

या कारखान्‍यात काय काय भानगडी झाल्‍या हे सर्वांना माहीत आहे. अजुनही तुमच्‍यावरची कारवाई टळलेली नाही असा सूचक इशारा देवून या भागनगडींबाबत तुम्‍हाला कोणी वाचवले हे विरभद्र मंदिरासमोर येवून कबूल करावे असे थेट आवाहनही त्‍यांनी विरोधकांना केले.

कारखान्‍याला कर्जाची उपलब्‍धता...

निवडणुकी(Election)च्‍या निमित्‍ताने विरोधकांकडून कारखान्‍याला तोटा झाल्‍याचा आरोप केला जात आहे. कारखान्‍यावर असलेल्‍या कर्जाचे आकडे स्‍वत:च्‍या मनानेच वाढवून सांगितले जात आहेत. पण एक गोष्‍ट लक्षात ठेवा जिल्‍हा बॅंकेचा चेअरमन असताना या कारखान्‍याला कर्जाची उपलब्‍धता मीच करुन दिली होती. हे कर्ज देण्‍यास विरोध कोणाचा होता हे सभासदांनी ओळखावे असे आव्‍हान मंत्री विखे पाटील यांनी दिले.

थोरातांसोबतच कोल्हेंनाही इशारा...

निवडणुकीच्‍या निमित्‍ताने अनेक पाहुणे आता आपल्‍याकडे येत आहेत. या पाहुण्‍याचा पाहुणचार सभासद १७ तारखेला करतीलच. परंतू, आता अनेक तालुक्‍यांमध्‍ये आम्‍हालाही पाहुणचाराला जावेच लागेल असा इशाराही त्‍यांनी शेवटी दिला. हा इशारा बाळासाहेब थोरातां(Balasaheb Thorat )बरोबरच भाजपात असलेल्या पण निवडणुकीच्या निमित्ताने थोरातांसोबत असलेल्या कोपरगावच्या माजी आमदार स्नेहलता कोल्हे गटाला असल्याचं बोलले जात आहे.

(Edited By Deepak Kulkarni)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT