Sex Determination Case Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Sex Determination Case : महाराष्ट्र हादरवणारं गर्भलिंग निदान रॅकेट! 12वी शिकलेल्याकडून चाचण्या, गोठ्यापासून धावत्या कारपर्यंत ‘सेटअप’, IMA डॉक्टरसह 12 जण अटकेत, शेकडो गर्भपात

Shrirampur police arrested 12 accused, including IMA doctor Ravindra Kute, Rahta-Pimpri Nirmal illegal sex determination racket; police revealed agent Pradeep Dhage only 12th pass : राहाता इथल्या बेकायदा गर्भलिंग प्रकरणात श्रीरामपूरमधील IMA डाॅ. रवींद्र कुटे अटक केल्यानंतर श्रीरामपूर पोलिसांनी तपासात धक्कादायक माहिती उघड केली आहे.

Pradeep Pendhare

Illegal sex determination case Maharashtra : अहिल्यानगर जिल्ह्यातील पिंपरी निर्मळ (ता. राहाता) इथं उघडकीस आलेल्या बेकायदा गर्भलिंग निदान प्रकरणात महाराष्ट्राला हादरवणारी माहिती समोर आली आहे. या रॅकेटमध्ये ‘इंडियन मेडिकल असोसिएशन’चा महाराष्ट्र राज्याचा माजी अध्यक्ष डॉ. रवींद्र कुटे याच्यासह अटकेतील संख्या 12वर पोहोचली आहे.

या प्रकरणातील मुख्य दुवा असलेला एजंट प्रदीप ढगे हा महिलांची गर्भलिंग निदान चाचणी करायची. पण तो केवळ बारावी शिकल्याची धक्कादायक माहिती पोलिस उघडकीस आली आहे. या चाचण्याचे ठिकाणी चक्रावून टाकणारे असून, हा एजंट कधी गोठ्यात, कधी कांद्याच्या चाळीत, तर कधी धावत्या चारचाकी वाहनात महिलांची चाचणी करायचा.

या प्रकरणात जशी माहिती समोर येत आहे, तसे श्रीरामपूर (Shrirampur) पोलिस देखील हादरले आहेत. गेल्या दोन ते ती महिन्यात शेकडो महिलांचे गर्भलिंग निदान झाल्याची माहिती समोर आली आहे. दिवसाला सरासरी दहा महिलांची चाचणी व्हायची. यावरून या रॅकेटची व्याप्ती एखाद्या दोन जिल्ह्यापुरती मर्यादीत नसून राज्यात असल्याचा संशय पोलिसांना बळावला आहे.

हे रॅकेट जेव्हापासून सुरू आहे, तेव्हापासूनचा हिशोब काढल्या, शेकडो नव्हे, तर हजारांच्या घरात महिलांचे गर्भलिंग निदान (Crime) झाल्याचे आकडा असेल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. डॉ. भणगे आणि एजंट प्रदीप ढगे हे दोघेही स्वतंत्रपणे ही यंत्रणा चालवत असल्याने या काळ्या धंद्याचे जाळे मोठे पसरले आहे.

​मुलीच्या गर्भाचा बळी?

ज्या कुटुंबांना पहिले अपत्य मुलगा आहे, ते कदाचित चाचणीवरच थांबले असतील; मात्र ज्यांना पहिली मुलगी आहे, अशा कुटुंबांनी लिंगनिदान केल्यानंतर मोठ्या प्रमाणात गर्भपात केल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. या प्रकरणात मोठ्या प्रमाणावर स्त्री भ्रूणहत्या झाली असण्याची शक्यता नाकारता येत नाही, त्यादृष्टीने आमचा तपास सुरू आहे, असे अपर पोलिस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांनी स्पष्ट केले.

अटकेतील आरोपींची संख्या 12वर

या गुन्ह्यात आतापर्यंत दोन डॉक्टर, चार एजंट आणि सहा पती, अशा एकूण 12 जणांना अटक करण्यात आली आहे. न्यायालयाने त्यांची पोलीस कोठडी 10 मे पर्यंत वाढवली आहे. धक्कादायक बाब म्हणजे, उच्चशिक्षित महिलाही एका 12 वी शिकलेल्या एजंटाकडे आपली आणि बाळाची सुरक्षितता धोक्यात घालून बिनदिक्कतपणे चाचणी करून घेत होत्या, हे सुशिक्षित समाजाचे भीषण वास्तव समोर आले आहे.

गर्भपाताचे केंद्र आणि ‘रेट कार्ड’

तपासातील सर्वात धक्कादायक बाब म्हणजे, केवळ लिंगनिदानच नाही तर यातील काही महिलांचे बेकायदा गर्भपात केल्याचेही निष्पन्न झाले आहे. आतापर्यंत तीन महिलांचे गर्भपात यातील अटक आरोपींच्या दवाखान्यात काही एजंटांच्या मदतीने केल्याचे समोर आले आहे. या काळ्या धंद्यासाठी 'रेट कार्ड'ही ठरलेले होते. लिंग निदानासाठी डॉक्टरला 10 हजार रुपये, तर एजंटांना प्रत्येकी तीन हजार रुपये मिळत होते.

गुन्ह्याची पद्धत

पोलिसांनी या रॅकेटची कार्यपद्धती उघड केली असून, ती अत्यंत नियोजनबद्ध होती. 8 ते 10 गर्भवती महिला गोळा झाल्यानंतर एक ठराविक दिवस आणि वेळ ठरवली जायची. महिलांच्या पतींना किंवा नातेवाईकांना एका विशिष्ट ठिकाणी बोलावून त्यांच्याकडून आधी रोख रक्कम स्वीकारली जात असे. नातेवाईकांना तिथेच थांबवून एजंट त्या 8-10 महिलांना स्वतःच्या चारचाकी वाहनातून दुसऱ्या एका अज्ञात ठिकाणी घेऊन जात असत. त्या अज्ञात स्थळी लिंगनिदान चाचणी उरकून पुन्हा महिलांना त्यांच्या नातेवाईकांपाशी आणून सोडले जात असे.

मशीन पुरवणारे रडारवर

नेवासा इथला डॉ. भणगे आणि प्रदीप ढगे यांनी ज्यांच्याकडून लिंगनिदान करण्याचे मशीन खरेदी केले होते, ते पुणे इथले दोन आरोपी निष्पन्न झाले आहेत. या दोन्ही आरोपींना लवकरच ताब्यात घेतले जाणार असून, त्यांच्याकडून मोठ्या साखळीचा उलगडा होण्याची शक्यता आहे. सदर दोघेही संशयित पुण्यात अशाप्रकारच्या गुन्ह्यात तुरुंगात आहेत. दोन ते तीन दिवसात न्यायालयाकडे त्यांच्या हस्तांतरणाची प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे.

​महिलांचे जबाब नोंदवणार

ज्या-ज्या गर्भवती महिलांची चाचणी या आरोपींनी केली होती, त्यांची ओळख पटवून जबाब नोंदवण्याचे काम वेगानं सुरू आहे. पोलिसांनी काही महिलांचे जबाब आधीच नोंदवले असून, त्यातूनच बेकायदा गर्भपाताची धक्कादायक माहिती समोर आली आहे. एकंदरीत सुशिक्षित समाजाचे हे भीषण वास्तव्य विचार करायला लावणारे आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT