Rahta illegal sex determination case : राहाता तालुक्यातील पिंपरी निर्मळ इथलं बेकायदा गर्भलिंग निदान प्रकरणाचा तपास आता पुण्यापर्यंत पोहोचलं आहे. या गुन्ह्यात वापरण्यात आलेले मशीन पुरविणाऱ्या दोघांची नावे निष्पन्न झाली असून, त्यातील एक डॉक्टर आहे.
दोघेही सध्या पुण्यातील एका अन्य गुन्ह्यात अटकेत असल्याने, या प्रकरणातही त्यांना आरोपी करण्यात आले असून लवकरच श्रीरामपूर पोलिस त्यांना ताब्यात घेणार आहेत.
या रॅकेटमध्ये आयएमएचे माजी प्रदेशाध्यक्ष डॉ. रवींद्र कुटे याचा सहभाग समोर आल्यानंतर पोलिसांनी त्यांच्यासह दोन एजंटांना जेरबंद केलं होतं. तपासादरम्यान, पुण्याच्या (Pune) दोघांनीच हे मशीन पुरविल्याचे समोर आले आहे. त्यांनी आजवर कोणाकोणाला, अशी मशीन्स पुरवल्या, याचा सखोल तपास आता केला जाणार आहे.
दरम्यान, या प्रकरणातील गर्भलिंग चाचणी केलेल्या महिलांची (Women) आणि या साखळीतील इतर एजंटांची चौकशी करण्यासाठी पोलिसांची पथके रवाना झाली असून, दोन महिलांचे जबाबही नोंदविण्यात आले आहेत. अनेक एजंटांची नावेही समोर आली असून लवकरच त्यांच्याही मुसक्या आवळल्या जाणार आहेत, अशी माहिती अपर पोलिस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांनी दिली.
श्रीरामपूर तालुक्यातील गर्भलिंग निदानाची ही काळी बाजू समोर येत असतानाच, ‘सकाळ’ने सर्वप्रथम तालुक्यातील 11 गावांमधील लिंग गुणोत्तराची भीषण आकडेवारी समोर आणून समाजाचे डोळे उघडले होते. पालिकेत आयोजित एका कार्यक्रमात आमदार हेमंत ओगले यांनी मांडलेले हे वास्तव सुशिक्षित समाजाला विचार करायला लावणारे होते.
यानंतर प्रशासकीय यंत्रणा अलर्ट मोडवर आली होती. बेलापूर खुर्द गावात झालेल्या बैठकीत वाघचौरे यांनी मुलींच्या घटत्या संख्येमागील कारणांचा शोध घेऊन दोषींवर कठोर कारवाईचे सुतोवाच केले होते. गावागावात प्रबोधनपर कार्यक्रमही सुरू करण्यात आले आहेत.
एकीकडे गर्भलिंग निदानाची रॅकेट उघड होत असताना, दुसरीकडे घसरलेला हा जन्मदर म्हणजे 'स्त्री भ्रूण हत्ये'चेच भयावह संकेत असल्याचे बोलले जात आहे. पोलिसांच्या या धडक कारवाईमुळे आता गर्भलिंग चाचणी करणाऱ्या महिलांच्या कुटुंबातील नातेवाईकांचे धाबे दणाणले आहेत. दररोज नवनवे खुलासे होत असल्याने हे रॅकेट किती खोलवर रुजले आहे, हे स्पष्ट होत आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.