MLA Rahul Dhikle
MLA Rahul Dhikle Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

श्रीराम रथोत्सवात राहुल ढिकलेंनी टाळली `शहादा` प्रकरणाची पुनरावृत्ती!

Sampat Devgire

नाशिक : नाशिकमधील (Nashik) श्रीराम रथाची मिरवणूक (Shreeram Rath) हा ग्रामोत्सव असतो. त्याला मोठी प्रतिष्ठा आहे. मात्र पोलिसांच्या (Police) नव्या नियमांमुळे वाद्यांच्या परावनगीवरून त्यात वादाची ठिणगी पडली. आमदार राहुल ढिकले (Rahul Dhikle) यांनी त्यात वेळीच कणखर मात्र समजुतदारपणाची भूमिका घेतली. त्यामुळे वाद टळला व कार्यक्रम सुरळीत पार पडला.

यामध्ये दोन दिवसांपूर्वी शहादा येथे काही संघटनांनी असा समजुतदारपणा दाखवत प्रशासकीय पूर्तता केली असती अन् पोलिसांनी देखील योग्य प्रकारे प्रकरण हाताळले असते तर तणाव निर्माण झाला नसता. त्याबाबत नाशिक शहराच्या मिरवणुकीचे उदाहरण मार्गदर्शक ठरणार आहे.

रथोत्सवाच्या पार्श्‍वभूमीवर सोमवारी रात्री परंपरेप्रमाणे श्रीराम रथ मालवीय चौकातून काळाराम मंदिराच्या पूर्व दरवाजाला पोचला खरा. परंतु तत्पूर्वी रथोत्सव समिती व पोलिसांत वाद्याच्या परवानगीवरून नाट्य चांगलेच रंगले. पोलिसांनी वाद्यासाठी रीतसर परवानगीचा आग्रह धरला, तर आमदार ॲड. राहुल ढिकले यांनी या ग्रामोत्सवात पारंपारिक वाद्य वाजविण्यासाठी परवानगीची अट नको, असा पवित्रा घेतला.

सायंकाळी रथोत्सवाची लगबग सुरू असतानाच पंचवटी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरिक्षक डॉ. सीताराम कोल्हे यांनी ढोल पथकाबाबत रीतसर परवानगी न घेतल्याबद्दल रथोत्सव आमदार ॲड. राहुल ढिकले यांच्याकडे नाराजी व्यक्त केली. तेव्हा केवळ हिंदूंच्या सणांबाबत तेही ग्रामदैवत श्रीराम रथोत्सवात पारंपारिक वाद्ये वाजविण्यास परवानगीची अट नको, असा आग्रह आमदार ढिकले यांनी धरला. मात्र त्यानंतर परवानगीचा अर्ज देण्यात आल्यावर पोलिसांनीही परवानगी दिली. मालवीय चौकात रथोत्सवासाठी सहकार्य करणाऱ्यांसह समितीचे पदाधिकारी व लोकप्रतिनिधींचा सत्कार करण्यात आला.

ग्रामोत्सवासाठी परवानगी नको

या वेळी आमदार ढिकले यांनी श्रीरामाचा रथोत्सव हा नाशिककरांचा ग्रामोत्सव असून त्यासाठी परवानगीची अट नको, असा पवित्रा घेतला. याशिवाय वाजविण्यात येणारी वाद्येही पारंपारिक असल्याने पोलिसांनी आडकाठी आणू नये, असे सांगितले. केवळ हिंदूंच्या सणांबाबतच परवानगी का लागते, अशी नाराजी व्यक्त केली. त्यानंतर अर्ज देण्यात आल्यावर ढोल पथकासह मिरवणुकीला परवानगी देण्यात आली. त्यानंतर रात्री उशिरा श्रीराम रथ काळाराम मंदिराच्या पूर्व दरवाजाजवळ पोचला.

---

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT