Rahuri By-Election 1998 | BJP Kadam 23 Vote Victory Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Rahuri By-Election : राहुरीची 28 वर्षांपूर्वीची पोटनिवडणूक; भाजपच्या कदमांचा 23 मतांनी विजय, दोनदा मतमोजणी

Rahuri by-election Chandrashekhar Kadam victory : भाजपचे खासदार भीमराव बडदे यांचा पराभव करत, तनपुरे विजयी झाले. यानंतर तनपुरे यांनी राहुरी विधानसभा मतदारसंघातील आमदारकीचा राजीनामा दिला. यानंतर राहुरी विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक जाहीर झाली होती.

Pradeep Pendhare

Rahuri News, 16 Apr : राहुरी विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक होत आहे. 23 तारखेला मतदान होईल. या मतदारसंघात यापूर्वी 1998 मध्ये पोटनिवडणूक झाली होती. म्हणजेच, राहुरी विधानसभा मतदारसंघात दुसऱ्यांदा पोटनिवडणूक होत आहे.

1998 मध्ये झालेल्या पोटनिवडणुकीत दोन वेळा फेरमतमोजणी होताना, वीजपुरवठा खंडीत होण्याचा झालेला प्रकार अन् अवघ्या 23 मतांनी भाजपचे उमदेवार चंद्रशेखर कदम यांचा झालेला विजय, हा थरारक इतिहासाला यंदाच्या पोटनिवडणुकीनिमित्तानं चर्चेत आला आहे.

माजी आमदार चंद्रशेखर कदम यांचे कुटुंब राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे निष्ठावान आहे. अटलबिहारी वाजपेयी यांचे केंद्रातील सरकार अवघ्या एका मताने कोसळलं अन् लोकसभा निवडणुका जाहीर झाल्या. राहुरीचे प्रसाद तनपुरे यांना काँग्रेसने कोपरगाव मतदारसंघातून लोकसभेची उमेदवारी जाहीर केली. भाजपचे खासदार भीमराव बडदे यांचा पराभव करत, तनपुरे विजयी झाले.

यानंतर तनपुरे यांनी राहुरी विधानसभा मतदारसंघातील आमदारकीचा राजीनामा दिला. यानंतर राहुरी विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक जाहीर झाली. तत्कालीन प्रदेशाध्यक्ष सूर्यभान वहाडणे यांच्या आग्रहाखातर चंद्रशेखर कदम यांनी राहुरीतून निवडणूल लढवली.

चंद्रशेखर कदम यांचे देवळाली प्रवरा हे गाव राहुरी मतदारसंघात होते. आता ते श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघात आहे. तत्कालीन उपमुख्यमंत्री गोपीनाथ मुंडे यांनी प्रचार सभा घेत, अण्णासाहेब पाटील यांचा संदर्भ देत, मतदारांना भावनिक आवाहन करत, वातावरण फिरवलं.

पोटनिवडणुकीत सात उमेदवार रिंगणात

भाजपचे चंद्रशेखर कदम, काँग्रेसचे रामदास धुमाळ, जनता दलाचे लक्ष्मण धागुडे, प्रमुख अध्यक्ष पंढरीनाथ पवार यांच्यासह सात उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. आता होत असलेल्या पोटनिवडणुकीत देखील सात उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत.

कदम यांचा फेरमतमोजणीसाठी अर्ज

पोटनिवडणुकीत अवघे 54.3 टक्के मतदान झालं. मतमोजणीवेळी तेव्हा चंद्रशेखर कदम अवघ्या चार मतांनी पराभूत होणार होते. त्यांनी फेरमतमोजणीसाठी अर्ज केला. फेरमतमोजणीत कदम यांची 20 मते वाढली. कदम यांचा 16 मतांनी विजय झाला. त्याचवेळी रामदार धुमाळ यांनी फेरमतमोजणीचा अर्ज दिला.

धुमाळ यांचा जिल्हाधिकाऱ्यांशी वाद

यात पुन्हा कदम यांची सात मते वाढून, 23 मते झाले आणि कदम विजयी झाले. रामदास धुमाळ यांनी चार मतांनी विजय झाला म्हणून जल्लोष करत होते. पण फेरमतमोजणीत पराभव झाल्याचे समजल्यावर, धुमाळ मतमोजणीच्या ठिकाणी येत, तत्कालीन निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी विजयकुमार यांच्याशी वाद घातला.

वीजपुरवठा खंडीत अन् एकच गोंधळ

दुसऱ्यांदा फेरमतमोजणीत वीजपुरवठा खंडीत झाला होता. त्यावेळी मतमोजणी केंद्रावर चांगलाच गदारोळ झाला. पण लगेचच वीजपुरवठा सुरळीत झाला. या पोटनिवडणुकीत चार हजार मते बाद झाली होती. भाजपच्या सतर्क कार्यकर्त्यांमुळे बाद झालेल्या मतमोजणी पुन्हा मोजणीत घेण्यात आल्याने, कदम यांची सात मते वाढली.

तनपुरे अन् कर्डिलेंमधील लढती

राहुरी विधानसभा मतदारसंघात मतदारांनी आलटून पालटून आमदार दिले आहेत. 2014 मध्ये शिवाजी कर्डिले यांनी प्राजक्त तनपुरे यांचा पराभव केला. 2019च्या निवडणुकीत तनपुरेंनी कर्डिलेंचा पराभव केला. 2024मध्ये कर्डिलेंनी पुन्हा तनपुरेंचा पराभव केला.

तनपुरे अन् कदम यांच्यात रस्सीखेंच

अशीच लढत तनपुरे अन् कदम यांच्यात झाल्याचे दिसते. 1998च्या पोटनिवडणुनकीत चंद्रशेखर कदम विजय झाल्यानंतर 1999च्या निवडणुकीत प्राजक्त यांचे वडील प्रसाद तनपुरे यांनी कदम यांचा अवघ्या 600 मतांनी पराभव केला. त्यानंतकर 2004च्या निवडणुकीत कदम यांनी तनपुरे यांचा 10 हजार मतांनी पराभव केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT