Rahuri Bypoll Result 2026 Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Rahuri Bypoll Result 2026 : प्राजक्त तनपुरेंची माघार कोणाच्या पथ्यावर? 'राहुरी'च्या मतमोजणीला थोड्याच वेळात सुरवात

All eyes on Rahuri bypoll results as Prajakt Tanpure stance, BJP Akshay Kardile, NCP Govind Mokate, and Vanchit Santosh Cholke shape the final outcome : राहुरी पोटनिवडणुकीची मतमोजणीला थोड्याच वेळात सुरवात होत असून, प्राजक्त तनपुरे यांच्या माघारीमुळे निकालाची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

Pradeep Pendhare

Rahuri election 2026 : राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीची मतमोजणी थोड्याच वेळात सुरू होईल. निकालाचा पहिला कल कोणाच्या बाजूने राहिल हे स्पष्ट होईल. राहुरी पोटनिवडणुकीत चर्चेच्या केंद्रस्थानी राहिले ते प्राजक्त तनपुरे! तनपुरे यांची माघार आता कोणाच्या पथ्यावर पडते, हे आज निकालावरून स्पष्ट होईल.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मध्यस्थीनंतर, तनपुरे यांनी निवडणूक न लढवण्याचा निर्णय जाहीर केला. पण मतदानाच्या आदल्या दिवशी, भाजपमध्ये जाणार असल्याच्या चर्चा पूर्णपणे निराधार असून त्याचा कोणताही संबंध नाही. आपण पक्ष सोडलेला नाही. आपण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचा कार्यकर्ता असल्याचे ठामपणे सांगितले. त्यामुळे निकालाची उत्सुकता आहे.

भाजप (BJP) दिवंगत आमदार शिवाजी कर्डिले यांच्या निधनानं, राहुरी पोटनिडवणूक होत आहे. या निवडणुकीत भाजपने त्यांचे पुत्र अक्षय कर्डिले यांना उमेदवारी दिली. कर्डिले यांचे पारंपारिक राजकीय प्रतिस्पर्धी प्राजक्त तनपुरे निवडणूक लढवतील, अशी सुरवातीला चर्चा होती.

प्राजक्त तनपुरे (Prajakt Tanpure) यांनी निवडणुकीच्या अनुषंगाने तयारी देखील केली होती. भाजपला प्रत्युत्तर देण्यासाठी त्यांनी हिंदुत्वाची भूमिका घेतली. भगवी टोपी, भगवा पंचा खांद्यावर घेत, मतदारसंघात सक्रिय झाले. कार्यकर्त्यांनी देखील आपला हिंदुत्ववादी आमदार येतोय, अशी समाज माध्यमांवर पोस्टरबाजी सुरू केली.

तनपुरे यांच्या झंझावाती हिंदुत्वासमोर आपला उमेदवार नवखा ठरत असल्याचे भाजपने हेरलं होतं. हिंदुत्वाच्या भूमिकेमुळे तनपुरे हे भाजपमध्ये जाणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं. तनपुरे यांनी देखील भाजप प्रवेशाबाबत शेवटपर्यंत मौन बाळगून आपलं ईप्सित साध्य केलं.

उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी थेट प्राजक्त तनपुरे यांचे राहुरीतील कार्यालय गाठले. तिथं बंद दाराआड या नेत्यांमध्ये चर्चा झाली. या चर्चेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तनपुरेंशी फोनवर चर्चा केली. पुढे राहुरी सभेत मुख्यमंत्री यांनी तनपुरे यांनी घेतलेल्या भूमिकेचे स्वागत देखील केले.

मुख्यमंत्री फडणवीस यांच्या चर्चेनंतर, पुढे राजकीय सहकार्य करण्याच्या ग्वाहीनंतर तनपुरे यांनी उमेदवारी न करण्याचा निर्णय घेतला. पण पेच आणखीच पुढे निर्माण झाला. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाने दोन एबी फाॅर्म तयार ठेवले होते. तनपुरे यांची भूमिका लक्षात घेत, वरिष्ठांशी तुटलेला संपर्क लक्षात घेऊन शरद पवार राष्ट्रवादीने ही सावध भूमिका घेतली आणि शेवटीच्या क्षणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना पक्षाचे गोविंद मोकाटे यांना उमेदवारी दिली.

याच दरम्यान, तनपुरे यांचे कार्यकर्ते निवडणुकीत कोणाचं काम करणार याकडे सर्वांचे लक्ष लागलं होतं. कार्यकर्ते संभ्रमामध्ये होते. मतदानाच्या दिवशी काही तास अगोदर, तनपुरे यांनी कार्यकर्त्यांना मोकळीक दिली होती. ही मोकळीक कोणाच्या फायद्याची ठरली, हे आज निकालातून स्पष्ट कळणार आहे.

भाजप उमेदवार अक्षय कर्डिले यांच्या विजयाचे फलक अहिल्यानगरपासून ते पुण्यापर्यंत लागले आहेत. शरद पवार राष्ट्रवादीचे उमेदवार गोविंद मोकाटे यांनी देखील विजयाचे दावा कायम ठेवला आहे. वंचितचे संतोष चोळके यांनी देखील निवडणुकीत कोणतीच कसूर ठेवलेली नाही. शिवसेना ठाकरे सेना पक्षाचे बंडखोर नेते रावसाहेब खेवरे यांच्याकडून देखील विजयाची शड्डू ठोकला जात आहे. त्यामुळे निकालाची उत्सुकता अधिकच शिगेला पोहोचली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT