Ahilyanagar Crime News : स्वस्त दरात सोने देण्याचे आमिष दाखवून रायगड जिल्ह्यातील एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या जिल्हा परिषद सदस्यास तब्बल 52 लाख 80 हजार रुपयांचा गंडा घालण्यात आल्याची धक्कादायक घटना अहिल्यानगर जिल्ह्यात उघडकीस आली आहे.
या प्रकरणात जिल्हा परिषद सदस्य अविनाश नलावडे यांच्यासह तिघांना बेदम मारहाण करून रोकड आणि दागिने लुटण्यात आले. नगर तालुका पोलिसांनी 14 जणांविरोधात दरोड्याचा गुन्हा (Crime) दाखल केला असून तपासाला वेग दिला आहे.
रायगड (Raigad) जिल्ह्यातील अविनाश नलावडे (वय 45) हे बिल्डिंग मटेरियल सप्लायचा व्यवसाय करतात. या व्यवसायाच्या निमित्ताने त्यांची नांदेड येथील राजू मोहिते आणि त्याचा भाऊ अक्षय मोहिते यांच्याशी गेल्या चार वर्षांपासून ओळख होती. 25 मे रोजी पुणे जिल्ह्यातील मुळशी येथे राजू मोहितेने नलावडे यांची ओळख आपल्या मित्र बापू पवार याच्याशी करून दिली. त्यावेळी बापू पवार याने अर्धा किलो सोने दाखवत ते विक्रीसाठी असल्याचे सांगितले.
सोन्याबाबत खात्री करण्यासाठी नलावडे यांनी मानगाव येथील एका सराफाकडे त्याची तपासणी केली. तपासणीत सोने खरे असल्याचे दिसून आल्याने नलावडे यांचा विश्वास बसला. त्यानंतर बापू पवार याने आपल्याकडे चार किलो सोने असून ते बाजारभावापेक्षा अत्यंत कमी दराने, म्हणजे प्रति किलो 25 लाख रुपयांना देण्याची तयारी दर्शवली.
28 मे रोजी राजू मोहितेने हिंगोलीहून सोने आणण्यासाठी खर्च म्हणून नलावडे यांच्याकडून पाच हजार रुपये घेतले. मात्र त्यानंतर सतत ठिकाणे बदलत नलावडे यांना वेगवेगळ्या ठिकाणी बोलावले जात होते. अखेर 4 जून रोजी व्यवहारासाठी बोलावण्यात आल्यानंतर नलावडे हे प्रकाश जंगम, सराफ सोनाराम माळी, मनीष कोकाटे आणि वैभव बलकवडे यांच्यासह दोन वाहनांतून निघाले.
सुरवातीला त्यांना पारनेर तालुक्यातील सुपा परिसरात बोलावण्यात आले. त्यानंतर रायतळे गावाजवळ राजू मोहितेने दोन गाड्या पाहून संशय व्यक्त केला आणि नलावडे व सराफ यांनीच पुढे यावे, अशी अट घातली. त्यामुळे नलावडे यांना संशय आला आणि ते तेथून परत सुपा येथे आले.
मात्र काही वेळानंतर दुसऱ्या मोबाईल क्रमांकावरून संपर्क साधत राजू मोहितेने आपला फोन बंद पडल्याचे सांगितले आणि नगर तालुक्यातील सारोळा परिसरात येण्यास सांगितले. तेथे राजू मोहिते, बापू पवार आणि इतर काही जण उपस्थित होते. राजू पुढे निघून गेला, तर बापू पवार कथित सोने घेऊन नलावडे यांच्या वाहनात बसला. सायंकाळी सात ते साडेसातच्या सुमारास बापू पवार याने सोने दाखवले. सराफ सोनाराम माळी सोन्याची तपासणी करत असताना त्याने पैशांची चौकशी केली. रक्कम वाहनाच्या मागील सीटवर असल्याचे सांगताच पुढे उभ्या असलेल्या राजू मोहितेने अचानक शिटी वाजवली.
शिटीचा आवाज होताच शेजारच्या उसाच्या शेतातून अक्षय मोहितेसह 10 ते 12 जणांची टोळी बाहेर आली आणि वाहनावर हल्ला चढवला. आरोपींनी अविनाश नलावडे यांना गाडीतून खेचून बाहेर काढत लोखंडी रॉडने डोक्यावर आणि पायावर वार केले. चालक प्रकाश जंगम याला लाकडी दांडक्याने मारहाण करण्यात आली, तर सराफ सोनाराम माळी यांनाही बेदम मारहाण करण्यात आली.
या टोळीने नलावडे यांच्याकडील 46 लाख रुपयांची रोकड, 3 लाख 30 हजार रुपयांचे साडेतीन तोळे सोने, एक लाख रुपयांचे सोन्याचे लॉकेट आणि 2 लाख 50 हजार रुपयांच्या सोन्याच्या अंगठ्या असा एकूण 52 लाख 80 हजार रुपयांचा ऐवज लुटून पोबारा केला.
या प्रकरणामुळे रायगड आणि अहिल्यानगर जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे. अविनाश नलावडे यांच्या फिर्यादीवरून नगर तालुका पोलिसांनी 14 जणांविरोधात दरोड्याचा गुन्हा दाखल केला असून आरोपींचा शोध सुरू आहे. राज्याचे गृहखाते सांभाळणाऱ्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अखत्यारीतील पोलिस यंत्रणेने या प्रकरणाचा तपास वेगाने सुरू केला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.