Nashik Politics : मुंबई आणि नाशिकसाठी युती केलेल्या उद्धव आणि राज या दोन्ही ठाकरे बंधूंची काल नाशिकमध्ये पहिली संयुक्त सभा झाली. यावेळी राज ठाकरेंनी आपल्या भाषणातून नाशिकचा कारभार चालवणाऱ्या भाजपच्या दोन दिग्गज नेत्यांवर ठाकरी बाण सोडले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन या दोघांवर त्यांनी घाव घातला.
राज ठाकरेंनी पहिलं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निशाण्यावर घेतलं. २०१७ मध्ये फडणवीस यांनी नाशिक दत्तक घेतल्याची घोषणा केली होती. त्याची आठवण करुन दिली. दत्तक घेतल्याच्या घोषणेनंतर ते नाशिकमध्ये फिरकलेच नाही असा दावा राज ठाकरेंनी केला.
नाशिक दत्तक घेणाऱ्यांनी नाशिकमध्ये कोणती कामे केली? नाशिककरांनी त्यावेळी दिलेल्या आश्वासनांचे काय झाले असा प्रश्न उपस्थितीत करत राज ठाकरे यांनी फडणवीस यांनी दिलेल्या पण पूर्ण न झालेल्या आश्वासनांची यादीच वाचून दाखवली. नाशिक नियो मेट्रो प्रकल्प, लॉजिस्टिक पार्क, बाह्य रिंग रोड. इगतपुरी तालुक्यात आदिवासी क्रीडा प्रबोधिनी असे अनेक प्रकल्प फडणवीसांनी जाहीर केले. पण एकही काम त्यांनी केले नाही. याउलट मनसेच्या सत्ताकाळात केलेल्या कामांची वाट लावल्याचा घणाघात राज ठाकरे यांनी केला.
मनसेच्या सत्ताकाळात( २०१२ ) एवढे काम करूनही मला पराभव पाहायला लागल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. फडणवीस यांनी नाशिक दत्तक घेतो या केलेल्या घोषणेला नाशिककर भुलले, आणि आम्ही केलेली कामे विसरले. 'मात्र दत्तक घेतो म्हणणारा हा बाप पुन्हा फिरकलाच नाही' या भाषेत राज ठाकरे यांनी फडणवीस यांच्यावर तोफ डागली.
त्यानंतर राज ठाकरे यांनी आपल्या भाषणात कुंभमेळा मंत्री असलेल्या मंत्री गिरीश महाजन यांना तपोवनातील वृक्षतोडीच्या मुद्द्यावरुन निशाण्यावर घेतलं. मनसेच्या हातात सत्ता होती त्यावेळी आम्ही एकही झाड न तोडता कुंभमेळा यशस्वी करुन दाखवला.
राज ठाकरे म्हणाले, महाजन यांच्यापेक्षा गोष्टीतला तो लाकुडतोड्या बरा होता. तुझी चांदीची कुऱ्हाड आहे की सोन्याची, असे देवीने त्याला विचारले मात्र तो प्रामाणिकपणे नाही म्हणाला. त्याने आपली साधी लाकडाचीच कुऱ्हाड घेतली. मात्र या लाकुडतोड्याने झाडे छाटण्याआधी पक्षातील कार्यकर्ते छाटले. बाहेरुन मागवेलेली झाडे पक्षात लावली जात असल्याची टीका केली.
आमच्या सत्ताकाळात झाडे न तोडता कुंभमेळा झाला मग आता झाडे का तोडायची आहेत. कुंभमेळा झाल्यानंतर ही जागा मोकळी करुन उद्योगपतींच्या घशात घालायची असल्याचा आरोप यावेळी राज ठाकरे यांनी केला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.