Rajabhau Waje on Operation Tiger controversy Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Nashik: एकनाथ शिंदेंकडून दीड वर्षांपूर्वीच झाली होती विचारणा; पठ्ठ्याने वडिलांचा आदेश शिरसावंद्य मानून धुडकावली ऑफर

Rajabhau Waje, Uddhav Thackeray, Shiv Sena: खासदार राजाभाऊ वाजे यांनी विकास निधीच्या आमिषाला नकार देत उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेशी निष्ठा कायम ठेवली. वडील प्रकाश वाजे यांनी या निर्णयामागील कारणांचा खुलासा करून राजकीय आदर्श मांडला.

Sampat Devgire

Shivsena UBT: नाशिकचे खासदार राजाभाऊ वाजे यांना ठाणे येथून दीड वर्षांपूर्वीच उद्धव ठाकरेंचा पक्ष सोडण्याची ऑफर होती. मात्र त्यांनी त्याला ठाम नकार दिला. या निर्णया मागचे एक मोठे कारण पुढे आले आहे. शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाच्या सहा खासदारांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पक्षात जाण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी गेले दीड वर्ष शिंदे यांच्याकडून विविध प्रकारे अमिष दाखविण्याचा प्रयत्न सुरू होता. त्यासाठी विकास निधी देण्याची मोठी ऑफर असल्याचे आता उघड झाले आहे.

या संदर्भात खासदार राजाभाऊ वाजे यांचे वडील प्रकाश वाजे यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. दीड वर्षांपूर्वी ठाणे येथून खासदार वाजे यांना बोलावणे आले होते. यावेळी खासदार वारजे यांनी मी माझ्या वडिलांना विचारूनच प्रत्येक निर्णय येतो, असे संबंधितांना सांगितले होते.

खासदार वाजे यांनी याबाबत मला, ठाणे येथील ऑफर बाबत मला माहिती देऊन विचारणा केली होती. आपल्याला असा काही निर्णय घ्यायचा नाही ना? असे विचारले. त्यावर मी ठामपणे नाही असे सांगितले होते.

ठाण्याची काही मंडळी त्यानंतर माझ्याकडे आली होती. मी त्यांना ओळखत नाही. त्यांनाही आम्ही व्यावसायिक राजकारणी नाही सामाजिक आहोत. आमच्या दैवाने आम्हाला भरपूर काही मिळाले आहे. अन्य कोणती अपेक्षा नाही. त्यामुळे पक्ष सोडण्याचा विषय येत नाही, असे स्पष्ट केले.

त्यांनी आम्हाला विकास निधीचे आमिष दाखवले. विकासकामे ही सरकारी निधीतून होतात. ते कोणाचे वैयक्तिक काम नसते. त्यामुळे जेव्हा व्हायचे, जेवढी होणार असतील तेवढे कामे करू त्यासाठी पक्ष बदलण्याची काहीच गरज नाही, असे स्पष्ट सांगितले.

त्यानंतर नार्वेकर यांना त्याबाबत कळविले. नार्वेकर यांनी उद्धव ठाकरे यांना कळविले. उद्धव ठाकरे यांनी मला फोन केला. मी त्यांना आम्ही कुठेही जाणार नाही. कोणीही सोडून गेले तरीही आम्ही तुमच्या सोबतच राहू, असे स्पष्ट केले.

मी आज ८४ वर्षांचा आहे. १९५७ मध्ये माझे मामा आमदार झाले. १९६२ मध्ये वडील आमदार होते. १९६७ मध्ये काकू आमदार होत्या. राजाभाऊ यांना २०१४ मध्ये शिवसेनेने आमदार केले. २०२४ मध्ये खासदार केले. यापेक्षा अधिक काय मिळणार होते? परमेश्वराकडून आम्हाला आणखी काय मिळायचे राहून गेले आहे? असा प्रश्न प्रकाश वाजे यांनी यावेळी केला.

आज विकास या नावाखाली मोठ्या प्रमाणावर पक्षांतर करण्याचे वारे वाहत आहेत. प्रत्येक पक्ष फोडण्याचा डाव सत्तेतील मंडळी करीत आहे. अशा स्थितीत आजही वडिलांना विचारून निर्णय घेणारे खासदार राजाभाऊ वाजे आणि पक्षाने दिले त्यात समाधानी असलेले त्यांचे वडील प्रकाश वाजे अशी राजकारणातील पिता पुत्रांची जोडी अपवादानेच आढळते. आजच्या राजकारणात देखील अशी निष्ठावंत मंडळी निश्चितच आदर्श म्हणून गणले जातील.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT