Nashik Politics : राज्याच्या राजकारणात मागील काही महिन्यांपासून 'ऑपरेशन टायगर'ची चर्चा आहे. ऑपरेशन टायगर हे शिवसेनेशी संबधितीत असून यात प्रामुख्याने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार टार्गेट असतील, असे सांगितले जात आहे. शिवसेना शिंदे गटाच्या नेत्यांनी लवकच हे ऑपरेशन पार पडेल असा दावा केला आहे.
त्यामुळे ऑपरेशन टायगरच्या माध्यमातून ठाकरे गटात दुसरा मोठा राजकीय भूकंप होण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात असतानाच नाशिक लोकसभा मतदारसंघाचे उबाठाचे खासदार राजाभाऊ वाजे यांनी नाशिक येथे सोमवारी (दि. १९) शिवसेनेचे खासदार श्रीकांत शिंदे यांच्यासोबत एका कार्यक्रमाला हजेरी लावली. दोघेही एकाच व्यासपीठावर आल्याने कार्यक्रमात एकच चर्चा रंगली.
सोमवारी शिवसेनेचे खासदार श्रीकांत शिंदे हे नाशिक दौऱ्यावर होते. त्यांच्या उपस्थितीत प्रभाग ८ मधील गंगापूर गाव परिसरात विविध विकासकामांचा लोकार्पण सोहळा तसेच महापौर हिमगौरी आडके व उपमहापौर विलास शिंदे यांचा नागरी सत्कार सोहळा पार पडला.
या कार्यक्रमाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार राजाभाऊ वाजे आणि खासदार श्रीकांत शिंदे एकाच व्यासपीठावर आले होते. एकीकडे व्यासपीठावर मंत्री दादा भुसे, उदय सामंत, सुहास कांदे असे सगळे शिंदे गटाचे नेते होते आणि त्यांच्यामध्ये ठाकरे गटाचे राजाभाऊ वाजे हे व्यासपीठावर होते. या वेळी शिंदे यांच्याशेजारी बसून वाजे यांनी भाषण केले. त्यामुळे काही महिन्यांपासून नाशिकमध्ये सुरु असलेल्या मिशन टायगरच्या चर्चेशी या उपस्थितीचा संबंध जोडला जात आहे.
काही दिवसांपासून उबाठा शिवसेनेतील काही पदाधिकारी व लोकप्रतिनिधी शिंदे शिवसेनेच्या संपर्कात असल्याच्या चर्चा रंगत आहे. अशातच खासदार राजाभाऊ वाजे यांनी शिंदे सेनेच्या कार्यक्रमाला लावलेली हजेरी चर्चेचा विषय बनली. वाजेंची शिंदे सेनेच्या कार्यक्रमाला असलेली उपस्थिती निव्वळ योगायोग की ऑपरेशन टायगरचे संकेत आहेत? अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
मी माझ्या पक्षात सुखी.....
दरम्यान, या सगळ्या चर्चा सुरु होताच खासदार वाजे यांनी त्यावर स्पष्टीकरण दिलं आहे. ऑपरेशन टायगर आणि कार्यक्रमाला उपस्थितीत राहण्याचा कोणताही संबंध नसून, मी माझ्या पक्षात सुखी असल्याचे स्पष्टीकरण वाजे यांनी दिले आहे.
वाजे यांनी ऑपरेशन टायगरच्या चर्चा फेटाळून लावल्या आहेत. ते म्हणाले, उपमहापौरांनी बोलावले म्हणून मी कार्यक्रमाला आलो, यात कोणतेही राजकारण नाही. अर्थाचा अनर्थ काढण्याची आवश्यकता नाही. मी जिथे आहे तिथे आनंदात आहे. येथील विकास कामांना मी देखील निधी दिला होता म्हणून मला आमंत्रित करण्यात आले होते. तसेच, आपली आणि खासदार शिंदेंची दिल्लीतही भेट होत असते असंही त्यांनी सांगितलं.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.