Banana Grower Rambhau Patil Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

केळीच्या प्रतिष्ठेसाठी ५० वर्षे लढणारा शंभरीतील योद्धा!

केळीला फळाच्या दर्जासाठी ५० वर्षांचा लढा देणारा असाही एक शेतकरी.

Sampat Devgire

दिलीप वैद्य

रावेर : केळीला (Banana) फळ पिकाचा दर्जा (Fruit) मिळाला, मनस्वी समाधान वाटले, गेल्या ५० वर्षांपासूनचा सुरू असलेला लढा पूर्णत्वाला आला. मागणी पूर्ण झाली, अशी प्रतिक्रिया ९८ वर्षीय रामभाऊ पाटील (पुनखेडा, ता. रावेर) (Rambhau Patil) यांनी ‘सकाळ’शी बोलताना व्यक्त केली. सुमारे ५० वर्षांपूर्वी केळीचे महत्त्व या विषयावर पुस्तिका लिहून ती भारताच्या तत्कालीन तीन पंतप्रधानांपर्यंत पोचविणारे रामभाऊ पाटील यांनी आपले मराठी आणि हिंदीतील केळी विषयक पुस्तिका दाखवत जुन्या आठवणींना उजाळा दिला.

अन्य फळांना केंद्र आणि राज्य शासनाकडून फळाचा दर्जा दिला जात असताना आणि अनेक सुविधा उपलब्ध करून दिल्या जात असताना केळी मात्र त्यापासून वंचित होती. नुकताच केळीलाही फळ पिकाचा दर्जा मिळाल्याची बातमी वाचून त्यांनी आनंद व्यक्त केला.

१९८० च्या दशकात रामभाऊ पाटील यांनी केळी या विषयावर अभ्यास करून एक पुस्तिका प्रसिद्ध केली. त्यात केळीचे प्रकार, केळी खाण्याचे फायदे, केळी केव्हा खावी, केळीत कोणते औषधी गुणधर्म आहेत, केळीपासून कोणकोणते उपपदार्थ तयार केले जाऊ शकतात? याबाबतची विस्तृत माहिती आहे. आपली पुस्तिका राष्ट्रीय स्तरावरील ज्येष्ठ नेत्यांना देण्याच्या निमित्ताने त्यांनी लालबहादूर शास्त्री, मोरारजी देसाई आणि इंदिरा गांधी या तत्कालिन पंतप्रधानांची भेट घेतली. मात्र त्यांना मराठीतील पुस्तिका समजून घेण्यात अडचणी आल्याने नंतर या पुस्तिकेचा त्यांनी येथील सरदार जी. जी. हायस्कूलमधील शिक्षक नंदकुमार बालाजीवाले यांच्या सहकार्याने हिंदी अनुवाद केला आणि नेत्यांना हिंदीतील पुस्तक पाठवले.

विधान परिषदेचे तत्कालीन आमदार आणि पंचायत समितीचे पहिले सभापती बाजीराव नाना पाटील यांच्या शिष्टमंडळात यांनी दिल्ली येथे जाऊन केळीच्या रेल्वे वाहतुकीबाबत येणाऱ्या समस्या तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी सांगितल्या होत्या.

वयाच्या ९८ व्या वर्षी देखील रामभाऊ पाटील केळीचा प्रचार आणि प्रसार करतात. 'दररोज दोन केळी खा, कुठलाही आजार होणार नाही आणि दीर्घायुषी व्हाल' असे ते स्वानुभवावरून सांगतात. वर्तमानपत्र वाचताना त्यांना चष्मा लागत नाही. आयुष्याच्या शतकाजवळ येऊन देखील त्यांचा आवाज आजही खणखणीत आहे. शे दोनशे श्रोत्यांसमोर बोलताना त्यांना ध्वनिवर्धकाची आवश्यकता पडणार नाही. इतका त्यांचा आवाज स्पष्ट आहे. बऱ्याचदा ते पुनखेडा ते रावेर हे सुमारे ४ किलोमीटर अंतर पायी ये-जा करतात.

श्री संत मुक्ताईच्या पालखी सोहळ्यात ते मुक्ताईनगर ते पंढरपूर हे ७०० किलोमीटर अंतर पायी चालत जातात. पाण्यावर योगासने करण्याची त्यांची हातोटी भल्याभल्यांना आश्‍चर्यात टाकणारी आहे. आजही रोज त्यांचा दिवस योगासनांनी सुरू होतो आणि केळीचा प्रचार प्रसार करण्यात मावळतो. येथील ज्येष्ठ नागरिक संघाचे संस्थापक अध्यक्ष आणि सामाजिक कार्यकर्ते डॉ. एस. आर. पाटील यांचे ते वडील असून, प्रसिद्ध स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. संदीप पाटील यांचे ते आजोबा आहेत.

आनंद अन् समाधान...

केळीला फळाचा दर्जा मिळाल्याची बातमी त्यांनी ‘सकाळ’मधून वाचली आणि तारिक नुरी यांच्याजवळ त्यांनी ‘सकाळ’ प्रतिनिधींशीच संवाद साधण्याची आणि प्रतिक्रिया देण्याची इच्छा व्यक्त केली. या वेळी झालेल्या भेटीत केळीबाबतच्या सर्वाधिक बातम्या ‘सकाळ’मध्ये प्रसिद्ध होत असल्याबद्दल त्यांनी आनंद आणि समाधान व्यक्त केले.

----

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT