Ahilyanagar Lok Sabha constituency delimitation : लोकसभा मतदारसंघांच्या आगामी पुनर्रचनेच्या (परिसीमन) चर्चेला आता अहिल्यानगर जिल्ह्यातील राजकीय समीकरणांची किनार मिळाली आहे.
केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी हसत-हसत केलेल्या एका दाव्यामुळे शिर्डी आणि अहिल्यानगर लोकसभा मतदारसंघांच्या भवितव्याबाबत राजकीय चर्चेला उधाण आले आहे. परिसीमनानंतर शिर्डी मतदारसंघ खुला, तर अहिल्यानगर मतदारसंघ राखीव होऊ शकतो, असा अंदाज आठवले यांनी व्यक्त केला.
रामदास आठवले (Ramdas Athawale) यांच्या या वक्तव्यामुळे आगामी परिसीमनात अहिल्यानगर जिल्ह्यातील लोकसभा मतदारसंघांच्या रचनेत मोठे बदल होण्याची शक्यता आहे का, यावर चर्चा सुरू झाली आहे. मात्र, परिसीमनाची अंतिम रचना अधिकृत प्रक्रियेनंतरच स्पष्ट होणार आहे.
अहिल्यानगर (Ahilyanagar) येथील आंबेडकरी चळवळीचे नेते अशोक गायकवाड यांच्या निधनानंतर त्यांच्या कुटुंबीयांची आठवले यांनी सांत्वनपर भेट घेतली. त्यानंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी महिला आरक्षण, लोकसभा मतदारसंघांचे परिसीमन आणि आरक्षण उपवर्गीकरणावर भूमिका मांडली.
महिला आरक्षण लागू करायचे असल्यास लोकसभा मतदारसंघांची पुनर्रचना करावी लागेल. परिसीमनाला आमचा विरोध नाही, असे आठवले यांनी स्पष्ट केले. या प्रक्रियेत सर्वच राज्यांमध्ये लोकसभेच्या जागा वाढण्याची शक्यता असल्याने उत्तर भारत विरुद्ध दक्षिण भारत असा वाद न करता सर्व राजकीय पक्षांनी परिसीमनाला पाठिंबा द्यावा, असे आवाहन त्यांनी केले.
महिला आरक्षणाचे विधेयक आणि परिसीमनाचा मुद्दा संसदेत कधी व कोणत्या स्वरूपात मांडला जातो, याकडे आता राजकीय पक्षांचे लक्ष लागले आहे. या पार्श्वभूमीवर आठवले यांच्या अहिल्यानगर जिल्ह्यातील संभाव्य मतदारसंघ रचनेबाबतच्या वक्तव्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
दरम्यान, आरक्षणाच्या उपवर्गीकरणामुळे मातंग आणि बौद्ध समाजामध्ये काही प्रमाणात तेढ निर्माण झाल्याचे आठवले यांनी नमूद केले. बौद्ध समाजामध्ये शिक्षणाचे प्रमाण अधिक असल्याने आरक्षणाचा लाभ तुलनेने मोठ्या प्रमाणात मिळाला, असे त्यांनी सांगितले. मातंग समाजानेही शिक्षणाला प्राधान्य द्यावे आणि सरकारने मातंग समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी स्वतंत्र आराखडा तयार करावा, अशी मागणी आठवले यांनी केली.
मातंग आणि इतर वंचित समाजांमध्ये शिक्षणाचे प्रमाण कमी असल्याने आरक्षणाचा अपेक्षित लाभ मिळत नसल्याचे आठवले यांनी सांगितले. भविष्यात उपवर्गीकरण करून एखाद्या समाजासाठी स्वतंत्र जागा निश्चित केल्या, पण त्या जागांसाठी आवश्यक पात्र उमेदवारच उपलब्ध झाले नाहीत, तर त्या जागा रिक्त राहण्याची शक्यता आहे.
त्यामुळे आरक्षणासोबतच शिक्षणाचा विस्तार आणि सामाजिक विकासावर भर देणे गरजेचे आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. आरक्षणाचे उपवर्गीकरण करताना मातंग समाजावर अन्याय होऊ नये आणि त्याचवेळी बौद्ध समाजाचेही नुकसान होऊ नये, याची काळजी घेतली पाहिजे, अशी भूमिका आठवले यांनी मांडली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.