MLA Nilesh Lanke Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Nilesh Lanke : राणी लंकेंच्या 'शिवस्वराज्य' यात्रेच्या सांगतेतून आमदार लंकेंचा दूरचं गणित जुळवण्याचा प्रयत्न!

Rani Lanke Shivswarajya Yatra : 'लोकसभा कोणत्याही परिस्थितीत लढणार,' असा पुनरुच्चार राणी लंके यांनी केलेला आहे.

Pradeep Pendhare

Ahmednagar Political News : राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्षाचे राष्ट्रीय नेते अजित पवार गटाचे आमदार नीलेश लंके यांच्या पत्नी जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या राणी लंके यांनी नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघामध्ये सुरू केलेल्या शिवस्वराज्य यात्रेची मंगळवारी नगर शहरात सांगता झाली.

आमदार लंके यावेळी नगर शहरात होते. परंतु ते यात्रेत सहभागी झाले नाहीत. नगर शहरातून यात्रा नेण्याऐवजी भाजप महायुतीचे समन्वयक राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांच्या दोन्ही कार्यालयासमोरून ही यात्रा गेली. या यात्रेत फक्त लंकेसमर्थक सहभागी झाले होते. 'लोकसभा कोणत्याही परिस्थितीत लढणार,' असा पुनरुच्चार राणी लंके यांनी यावेळी केला.

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नगर दक्षिण मतदारसंघात राजकीय वारे वाहू लागले आहेत. राष्ट्रवादी एकसंघ असताना त्यावेळी आमदार नीलेश लंके यांच्या नावाची नगर दक्षिणमधून जोरदार चर्चा होती. राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर आमदार लंके हे उपमुख्यमंत्री अजित पवार गटात सामील झाले आहेत, तर अजित पवार (Ajit Pawar) गट हा भाजप महायुतीबरोबर राज्याच्या सत्तेत सहभागी झाला आहे. यानंतरदेखील आमदार लंके 'नगर दक्षिण' जागेवर लक्ष ठेवून आहेत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

पत्नी जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या राणी लंके यांच्या माध्यमातून त्यांनी चाचपणीसाठी 'शिवस्वराज्य' यात्रा सुरू केली. ही यात्रा पाथर्डीतील श्रीक्षेत्र मोहटादेवी येथून सुरू करण्यात आली. राणी लंके यांनी तिथेच लंके कुटुंबीयांमधील एक जण तरी लोकसभा निवडणूक कोणत्याही परिस्थितीमध्ये लढणार, अशी घोषणा केली. ही यात्रा तीन तालुक्यांत पोहोचली होती. यात्रेला प्रतिसाददेखील मिळत होता. तोच यात्रेची आज नगर शहरात शक्तिप्रदर्शन करीत सांगता करण्यात आल्याने राजकीय चर्चा रंगली आहे.

नगर शहरातील सक्कर चौकातून ही यात्रा निघाली. पुणे स्थानकासमोरून टिळक रोडने आयुर्वेद रुग्णालय चौक, माळीवाडी येथे आली. माळीवाडी येथे नगर शहराचे ग्रामदैवत श्री विशाल गणपती येथे महाआरती करण्यात आली. तेथून ही यात्रा पुढे माळीवाडी बसस्थानकासमोरील छत्रपती शिवाजीमहाराज यांच्या पुतळ्यासमोर आली. यावेळी जोरदार शक्तिप्रदर्शन करण्यात आले. रस्त्याच्या कडेला 13 जेसीबीतून यात्रेवर फुलांची उधळण करण्यात आली. राणी लंके आणि त्यांच्यासमवेत यात्रेत सहभागी झालेल्यांनी छत्रपतींना अभिवादन केले आणि यात्रेची सांगता झाली.

आमदार जगताप यांच्या कार्यालयासमोरून गेली यात्रा

राणी लंके यांची ही शिवस्वराज्य यात्रा भाजप महायुतीचे नगर जिल्ह्याचे समन्वयक आमदार संग्राम जगताप (Sangram Jagtap) यांच्या दोन्ही कार्यालयासमोरून गेली. आमदार जगताप यांचे पुणे बसस्थानक परिसरात आणि आयुर्वेद रुग्णालय परिसरात कार्यालय आहे. या दोन्ही कार्यालयासमोरून ही यात्रा शक्तिप्रदर्शन करत गेली. ही यात्रा नगर शहराबाहेरून थोडक्यात आटोपती घेण्यात आली. नगर शहराबाहेरून घाईघाईने ही यात्रा का काढण्यात आली, याचीदेखील चर्चा होती.

दरम्यान, ही यात्रा पुणे रोडवरून निघाली होती. कोतवाली पोलिसांनी यावेळी वाहतुकीच्या नियोजनाकडे पूर्णपणे दर्लक्ष केल्याचे दिसत होते. जशी यात्रा पुढे सरकत होती, तशी वाहतूककोंडी होत होती. माळीवाडी बसस्थानकासमोर यात्रा आल्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडी झाली. वाहतुकीतच फटाके फोडण्यात आले.

यात्रा आटोपली, मोठी राजकीय गणिते दडलीत

भाजप (BJP) महायुतीचा मेळावा नगर शहरात नुकताच झाला. या मेळाव्यात महायुतीमधील सर्व घटकपक्ष सहभागी झाले होते. राष्ट्रवादीचे समन्वयक आमदार संग्राम जगताप यांच्याकडूनदेखील आमदार नीलेश लंके यांना निमंत्रण देण्यात आले होते. परंतु आमदार लंके यांच्यासह राष्ट्रवादी अजित पवार गटाचे विद्यामान दोन आमदार या मेळाव्यात सहभागी झाले नाहीत. यातच राणी लंके यांच्या शिवस्वराज्य यात्रेची मंगळवारी सांगता झाली. त्यावेळी आमदार लंके हे नगर शहरातच होते, अशी चर्चा रंगली होती.

ही शिवस्वराज्य यात्रा तीन तालुक्यांतून आटोपती घेण्यात आली. यावरदेखील राणी लंके यांनी मौन बाळगले. मात्र ही यात्रा लगेचच सांगता करण्यामागे मोठे राजकीय गणिते दडलेली असल्याचे सांगितले जात आहे.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

R...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT