Revenue Officer Sketch
Revenue Officer Sketch Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Revenue : महसूल अधिकाऱ्यांच्या बदल्या रखडलेल्याच

Sampat Devgire

जळगाव : जिल्ह्यातील (Jalgaon) महसूल अधिकाऱ्यांच्या (Revenue Officers) बदल्या जूनपासून रखडल्या आहेत. महाविकास आघाडी शासनाने (Mahavikas Aghadi) बदल्यांची प्रक्रिया एक महिन्यासाठी थांबविली होती. त्यानंतर तब्बल चार महिने उलटले तरी राज्यातील राजकीय घडामोडींत (Political Movements) अद्यापही बदल्यांचा मार्ग मोकळा झालेला नाही. जे बदलीला पात्र आहेत अन् जे इच्छुक आहेत त्यांनी आता भाजप (BJP)- एकनाथ शिंदे (Eknath Shinde) सरकारच्या मंत्र्यांच्या भेटीगाठी सुरू केल्या आहेत. (In the political process of new Government transfers awaited)

महाविकास आघाडी सरकारने मेअखेर होणाऱ्या बदल्यांची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली असताना अचानक एक महिन्यापर्यंत कोणत्याही बदल्या न करण्याचे आदेश काढले होते. यामुळे आपल्या सोयीच्या व ‘क्रीम’ ठिकाणी बदल्यांच्या फिल्डिंग लावणाऱ्या अधिकाऱ्यांची गोची झाली होती.

एक महिन्यानंतर बदल्यांची वेळ असतानाच विधान परिषद सदस्यांच्या निवडीची प्रक्रिया सुरू झाली. त्यानंतर महाविकास आघाडीतील शिवसेनेचे ४० आमदार, खासदार आघाडीतून बाहेर पडून ‘भाजप’ गोटात सामील झाले. यामुळे महाविकास आघाडीतील सरकार कोसळले. काही दिवसांनंतर मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांचा शपथविधी झाला. नंतर मंत्रिमंडळ विस्ताराला तब्बल एक महिन्याने मुहूर्त मिळाला. या प्रक्रियेत महसूल अधिकाऱ्यांच्या बदल्या रखडल्या, त्या आतापर्यंत रखडलेल्याच आहेत.

मंत्रिमंडळात मंत्र्यांची निवड झाली असली, तरी मंत्रिमंडळाचा विस्तार अद्याप बाकी आहे. असे असले तरी बदल्यांसाठी इच्छुक असलेल्यांनी महाविकास आघाडीच्या काळात लावलेली ‘अर्थ’पूर्ण फिल्डिंग आता नव्याने सुरू केली आहे. महसूलच्या अधिकाऱ्यांनी थेट महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या भेटी घेऊन बदल्यांसाठी विनंती केली आहे. काहींनी मंत्रालय गाठून इच्छित जिल्ह्यातील मंत्र्यांशी संपर्क साधला आहे.

अन्य जिल्ह्यातून जळगाव जिल्ह्यात येण्यासाठी मंत्री गिरीश महाजन, मंत्री गुलाबराव पाटील यांच्याशी संपर्क साधण्यास सुरवात केली आहे. भाजप-शिंदे सरकारच्या काळात बदल्या होतील या आशेने मंत्र्यांशी गाठीभेटी सुरू करून बदलीप्रक्रियेत आपल्याला इच्छुक जिल्हा मिळावा यासाठी फिल्डिंग सुरू केली असली, तरी अद्याप संबंधित मंत्र्यांनी मंत्रिमंडळाचा विस्तार होईपर्यंत थांबण्याचा सल्ला दिला आहे.

काहींना जिल्ह्यातच क्रीम पदावर बदली हवी आहे, काहींना नगर, नाशिकला बदली हवी आहे. त्याअनुषंगाने त्यांनी फिल्डिंग सुरू केली आहे. मात्र बदल्यांचे आदेश शासन केव्हा काढते याकडे अधिकाऱ्यांचे लक्ष लागून आहे.

पाल्यांच्या शिक्षणावर परिणाम

जिल्ह्यातील काही अधिकाऱ्यांच्या बदल्या दीड वर्षापूर्वीच झाल्या. दोन वर्षांनंतर त्यांच्या पाल्यांची दहावी, बारावीची परीक्षा आहे आणि दोन वर्षांनंतर लोकसभा, विधानसभेच्या निवडणुका होतील. त्या वेळी या अधिकाऱ्यांच्या बदल्या होतील. तेव्हा बदल्या झाल्या तर पाल्यांना परीक्षा देताना अडचणी येतील. यामुळे आताच बदली करून घेतली तर दोन वर्षांनंतर बदल्या होणार नाहीत, तोपर्यंत पाल्याची दहावी, बारावीची परीक्षा होईल. या आशेने काहींनी बदल्यांची फिल्डिंग लावली आहे.

----

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT