Nagar News : पवार कुटुंबीयांमध्ये सध्या एकमेकांचे वयोमान काढण्यावरून 'वॉर' चांगलेच रंगला आहे. अजित पवार यांच्याकडून शरद पवार यांच्या वयाचा नेहमी उल्लेख होतो. त्यांनी निवृत्ती घेतली पाहिजे, असे ते वारंवार म्हणतात. अजित पवारांना याचे खणखणीत उत्तर शरद पवार गटाकडून देण्यास सुरुवात झाली आहे. खासदार सुप्रिया सुळे यांच्याकडून अजित पवारांचा 'ज्येष्ठ नागरिक' म्हणून उल्लेख करण्यास सुरुवात केली आहे, तर 'पंतप्रधान नरेंद्र मोदी आता काही वर्षांत 80 वर्षांचे होतील. मग त्यांनी राजकारणातून बाहेर गेले पाहिजे, अशी म्हणण्याची हिंमत अजितदादा करतील का?' असा प्रश्न आमदार रोहित पवार यांनी केला आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आमदार रोहित पवार करीत असलेल्या प्रश्नांकडे प्रसारमाध्यमांनी लक्ष वेधले होते. त्यावर अजितदादा यांनी, तो 'बच्चा' आहे, मी प्रत्येकाला उत्तर देऊ शकत नाही. माझ्या पक्षाचे प्रवक्ते त्यांना उत्तर देण्यास समर्थ आहेत, असे म्हटले आहे. रोहित पवार यांना 'बच्चा' बोलावण्यावरून अजितदादा यांना सुप्रिया सुळे यांनी सुनावले आहे, तर रोहित पवार यांनी ते काका आहेत, असे सांगून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वयाचा मुद्दा उपस्थित करून अजितदादांची कोंडी केली आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
रोहित पवार (Rohit Pawar) म्हणाले, "अजितदादा हे मोठे नेते आहेत. त्यांना आम्ही (मी) 'बच्चा' वाटणार आहे. मी 'बच्चा' आहे. शेवटी ते माझे काका आहेत. लहान मुले मनाने स्वच्छ असतात. मी 'बच्चा' आहे, म्हणजे मनाने फार स्वच्छ आहे, असे म्हणावे लागेल. लोकांचे प्रश्न मांडतो आहे. आपण आमच्याबद्दल, युवा आमदारांबरोबर बोलता तेव्हा ते म्हणतात, 'बच्चा' आहेत आणि शरद पवार (Sharad Pawar) साहेबांबद्दल बोलता तेव्हा त्यांचे वय झालेले आहे, असे बोलता." तीन-चार वर्षांनंतर मोदीसाहेबांना तुम्ही प्रश्न करणार आहात का? आता तुम्ही ८० वर्षांचे झाला आहात. तुम्ही राजकारणातून बाहेर निघा. एवढी हिंमत आहे का आपली? तुम्ही एका बाजूला आपल्या नेत्याबद्दल बोलता आणि दुसऱ्या बाजूला दुसऱ्या नेत्याबद्दल तुम्ही काहीच बोलणार नाही का? त्यामुळे वय हा विषय नसतो. उद्या, कधी ना कधी मोदीसाहेबांना वयाचा प्रश्न करावा लागेल. विषय एवढाच आहे, हिंमत आहे का? आणि तुम्ही बोलणार आहात का?, असे प्रश्न आमदार रोहित पवार यांनी उपस्थित केले.
शरद पवार यांच्या उपस्थितीत मुंबई येथे मेळावा आणि लोकसभा निवडणुकीची आढावा बैठक झाली. यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत शरद पवार यांच्या वयाचा अजित पवारांकडून वारंवार होत असलेल्या उल्लेखाचा आणि आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांना 'बच्चा' म्हटल्याचा खासदार सुप्रिया सुळे यांनी समाचार घेतला. खासदार सुळे यांनी यावरून अजित पवार यांच्यावर टीका केली. अजित पवार हे ज्येष्ठ नागरिक झाले आहेत. वयाच्या ८४ व्या वर्षी शरद पवार जिद्दीने लढत आहेत. तसेच काकाच्या नात्याने अजित पवार हे रोहित पवार यांना बच्चा म्हटले असावेत. रोहितच्या वयात शरद पवार हे राज्याचे मुख्यमंत्री झाले होते, याची आठवण खासदार सुळे यांनी यावेळी करून दिली.
Edited By : Rashmi Mane
R...