Rohit Pawar Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Rohit Pawar News : महाराष्ट्रात गुंतवणूक कुणाच्या काळात जास्त ? रोहित पवारांनी थेट आकडेवारीच समोर ठेवली

राजेंद्र त्रिमुखे

Ahmednagar News : शिंदे-फडणवीस-पवार ट्रिपल इंजिनच्या महायुती सरकारने गत तीन महिन्यात देशात सर्वात जास्त एफडीआय (थेट विदेशी गुंतवणूक) आणल्याबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे. यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कौतुक करतानाच उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या महाविकास आघाडी सरकारच्या काळातील आकडेवारी समोर ठेवली आहे.

सत्तापालट झाल्यावर डबल आणि नुकतेच ट्रिपल इंजिनचे सरकार असा उल्लेख करत, "डबल–ट्रिपल इंजिन सरकारची कामगिरी म्हणून आता रोज जाहिराती आणि भाषणामध्ये या गोष्टी बडवल्या जातीलही. मात्र, ज्या विकासासाठी सिंगलचे डबल, डबलचे ट्रिपल इंजिन झाले त्याप्रकारचा विकास महाराष्ट्रात होत आहे का ?" असा खोचक सवाल पवार यांनी फडणवीसांना (Devendra Fadnavis) केला आहे.

याबाबत ट्वीट करत रोहित पवार (Rohit Pawar) यांनी मविआ सरकारच्या काळातील आणि विद्यमान महायुती सरकारच्या काळातील वार्षिक, सहामाही आणि तिमाहीचा थेट विदेशी गुंतवणूक (एफडीआय) ची तुलनात्मक डीपीआयायटी (DPIIT) आधारित आकडेवारी समोर ठेवली आहे. गेल्या वर्षी एप्रिल ते जून याच कालावधीत महाविकास आघाडी सरकारने 40386 कोटी रुपयांची गुंतवणूक आणली होती. मविआ सरकारने आणलेली गुंतवणूक यंदाच्या डबल-ट्रिपल इंजिन सरकारपेक्षा 3752 कोटींनी अधिक आहे. असे पवार यांनी आकडेवारीनुसार दाखवत मविआ सरकारची कामगिरी सरस असल्याचे सांगितले आहे.

या वर्षी डबल-ट्रिपल इंजिन सरकारच्या जानेवारी ते जून या सहा महिन्यात राज्यात 69870 कोटी रुपयांची FDI आली, गेल्या वर्षी मविआ सरकार काळात याच सहा महिन्यात 83692 कोटीची FDI आली होती. ऑक्टोबर 2019 ते जून 2022 या 33 महिन्यांच्या मविआ सरकारच्या कालावधीत महाराष्ट्र 3. 29 लाख कोटीच्या गुंतवणुकीसह देशात पहिल्या क्रमांकावर होता, असेही पवार यांनी म्हटले आहे.

याचा अर्थ आमचे सिंगल इंजिन सरकार या ट्रिपल इंजिन सरकारला भारी होते, असा घ्यायचा कि ट्रिपल इंजिनचा राज्याला काही फायदा झाला नाही असा घ्यायचा ? या आकडेवारीवरून ट्रिपल इंजिन आणि तथाकथित विकास या दोन्ही केवळ भ्रामक संकल्पना असून यामुळे राज्याच्या जनतेला कुठलाही फायदा झालेला नाही, हेच सिद्ध होते, असा टोला त्यांनी सरकारला लगावला आहे.

Edited by : Amol Jaybhaye

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT