Ambegaon News : आम्ही शिवसेना-भाजपमध्ये प्रवेश केलेला नाही, आम्ही राष्ट्रवादीतच आहोत. ज्येष्ठ नेते शरद पवार माझ्या हृदयात आहेत. त्यांना सोडणार नाही. तसेच, यापुढे त्यांच्याबद्दल वाकडा शब्दही बोलणार नाही, असे सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी सांगितले. (I Will not speak a single word against Sharad Pawar: Dilip Walse Patil)
आंबेगाव तालुक्यातील लाखणगाव येथील विविध विकास कामांच्या कार्यक्रमात सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील बोलत होते. त्यावेळी त्यांच्या बोलण्याला मागील आठवड्यातील भाषणाचा संदर्भ होता. शरद पवार यांच्या उंचीइतका नेता देशात नाही, असे आपण म्हणतो. पण, दुसऱ्या बाजूला पवारसाहेबांच्या ताकदीवर किंवा नेतृत्वाखाली महाराष्ट्रातील जनतेने त्यांना एकदाही बहुमत दिलं नाही. एकदाही त्यांना स्वतःच्या ताकदीवर मुख्यमंत्री केलं नाही, असे विधान वळसे यांनी केलं होतं. त्यानंतर त्यांच्यावर टीका झाली होती. त्यामुळे या वेळी बोलताना त्यांनी पवारांविषयी एक शब्दही वाकडा बोलणार नसल्याचे स्पष्ट केले.
वळसे पाटील म्हणाले की, तुम्ही सर्वांनी मला आशीर्वाद देऊन ३३ वर्षे विधानसभेत पाठविले. अनेक खात्यांचा मंत्री, विधानसभेचा अध्यक्ष म्हणून काम करण्याची संधी मिळाली. हे केवळ तुम्हा जनतेचे आशीर्वाद आणि शरद पवार यांच्यामुळे मला मिळाले. मंत्रिपद माझ्यासाठी महत्वाचे नाही. पवारांच्या मदतीमुळे आंबेगाव तालुक्यात अनेक प्रकल्प आले, हे मी कधीही विसरू शकत नाही.
विधानसभेच्या २०१९ च्या निवडणुकीनंतर आपण (राष्ट्रवादी) शिवसेना-काँग्रेसला सोबत घेऊन महाविकास आघाडीचे सरकार बनविले. पण, शिवसेनेत फूट पडल्याने उद्धव ठाकरेंचे ते सरकार पडले. त्यानंतर राज्यात एकनाथ शिंदे-देवेंद्र फडणवीस यांचे युती सरकार सत्तेवर आलो. राज्याच्या विकासाच्या मुद्यावर आपण त्या सरकारमध्ये सामील झालो. पण आपण आजही राष्ट्रवादीतच आहोत, असेही वळसे पाटील यांनी नमूद केले.
वळसे पाटील म्हणाले की, डिंभे धरणात बोगदा करून त्यातील पाणी माणिकडोह धरणात नेले जाणार आहे. तसं झालं डिंभे धरण अवघ्या तीन महिन्यांत कोरडे पडणार आहे. याशिवाय कुकडी नदीवरील आंबेगाव, जुन्नर, शिरूरमधील ६५ बंधाऱ्यात वर्षभर पाणी असायचे. परंतु आगामी काळात धरणातून बंधाऱ्यात पाणी सोडायचे नाही, असा चुकीचा निर्णय सरकार घेऊ पाहते होते. हे होऊ न देण्यासाठी आपल्याला सरकारमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घ्यावा लागला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार पोपटराव गावडे होते. भीमाशंकर कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब बेंडे, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील, बाजार समितीचे उपसभापती सचिन पानसरे, शिवाजीराव ढोबळे, दौलत लोखंडे, सरपंच प्राजक्ता रोडे पाटील, उपसरपंच दीपाली वाघमारे उपस्थित होते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.