Sangamner Nagar Parishad Election Result : संगमनेर नगरपालिका निवडणुकीत संगमनेर सेवा समितीने मतमोजणीच्या पहिल्या फेरीपासून मत आघाडीची घोडदौड घेतली. नगराध्यक्षपदाच्या उमेदवार डाॅ. मैथिली तांबे यांनी देखील पहिल्या फेरीपासून मतांची निर्णायक आघाडी घेतली होती.
थोरात-तांबे मामा-भाचे यांनी नगरपालिका निवडणुकीत यश मिळवत, संगमनेरमधील 'सिंह' आपणच असल्याचं सांगून दिलं. एकनाथ शिंदे शिवसेनेचे आमदार अमोल खताळ यांच्यासह त्यांचे मार्गदर्शक भाजप मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि त्यांचे पुत्र सुजय विखे पाटील यांच्या महायुती पराभवाची गडद छायेत राहिले.
बाळासाहेब थोरात यांनी नगरपालिका निवडणुकीला समोरे जाताना, आमदार सत्यजीत तांबे (Satyajeet Tambe) यांच्याकडे सर्व सूत्र दिली. सत्यजीत तांबे यांनी संगमनेर सेवा समिती स्थापन करत, निवडणुकीला समोरे जाताना, काँग्रेस चिन्ह बाजूला सारत, नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या ऑल इंडिया फॉरवर्ड ब्लॉक या राष्ट्रीय पक्षाचा सिंह चिन्हं घेतलं. त्यांची ही रणनीती यशस्वी ठरली.
संगमनेर (Sangamner) नगरपालिका निवडणुकीच्या मतमोजणीच्या पहिल्या कलामध्ये 30 जागांपैकी संगमनेर सेवा समितीचे 22 उमेदवार विजयी झाले होते. नगराध्यक्षपदाच्या उमेदवार डाॅ. मैथिली तांबे या 10 हजार मतांनी आघाडीवर होत्या. भाजप मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि शिवसेनेचे आमदार अमोल खताळ यांच्या महायुतीचे उमेदवार संगमनेर सेवा समितीच्या विजयी उमेदवारांच्या अवतीभोवती देखील नव्हते. त्यामुळे ही निवडणूक संगमनेर सेवा समिती एकतर्फी मारेल, असे चित्र दिसत होते.
मतमोजणी शेवटच्या टप्प्याकडे येत असताना, महायुतीमधील एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा एक उमेदवार विजय झाला. तोपर्यंत संगमनेर सेवा समितीचे 27 उमेदवार विजयी झाले होते. दोन अपक्ष उमेदवार निवडून आले. हे दोन्ही अपक्ष उमेदवार देखील थोरात-तांबे यांना मानणारे आहेत. नगराध्यक्षपदाच्या उमेदवार डाॅ. मैथिली तांबे यांनी 16 हजार मतांनी विजयी झाल्या आहे. काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांचे भाचे नाशिक पदवीधरचे अपक्ष आमदार सत्यजित तांबे यांच्या पत्नी डाॅ. मैथिली तांबे आणि एकनाथ शिंदे शिवसेना आमदार अमोल खताळ यांच्या भावजयी सुवर्णा खताळ-राहणे यांच्यात नगराध्यक्षपदासाठी थेट लढत झाली. मतमोजणीच्या पहिल्या फेरीपासून मैथिली तांबे यांनी सुवर्णा खताळ-राहणे यांना पहिल्या फेरीपासून आसपास देखील ठेवलं नाही. जी आघाडी घेतली ते शेवटच्या फेरीपर्यंत कायम ठेवली.
संगमनेर नगरपालिकेसाठी सुमारे 75 टक्के मतदान झालं होतं.नगराध्यक्ष पदासाठी आठ आणि नगरसेवक पदांच्या 111 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. विधानसभा निवडणुकीत बाळासाहेब थोरात यांना पराभवाचा धक्का बसला होता. त्यामुळे नगरपालिका निवडणुकीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले होते. परंतु नगरपालिका निवडणुकीत थोरात-तांबे यांनी आखलेल्या रणनीतीमध्ये महायुती पुरती अडकली अन् पराभवला समोरं जावं लागलं.
महायुतीकडून संगमनेर नगरपालिकेच्या निवडणुकीच्या प्रचारासाठी चांगलाच जोर लावला होता. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील प्रचार सभा घेतली होती. भाजप मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, त्यांचे पुत्र माजी खासदार सुजय विखे पाटील हे देखील निवडणुकीच्या प्रचारात सक्रिय होते. सुजय विखे पाटील अन् सत्यजीत तांबे यांच्यात वाक् युद्ध रंगले होते.
सुजय विखे म्हणाले होते की, 'आपण टेस्ट खेळत नाही. ट्वेंटी ट्वेंटी खेळतो. मला संगमनेरात एक बोर्ड दिसला त्यावर सिंह होता. संगमनेरमध्ये बिबटे, डुकरं, मोकाट कुत्रे पाहिले. आता सिंह पण पाहिला. टायगरला रोखण्यासाठी सिंह आणला. पण वाघ आणि सिंहाच्या लढाईत वाघच जिंकतो. सुजय विखेला मॅनेज करणारा या धर्तीवर जन्माला यायचा आहे.' सत्यजीत तांबे यांनी त्याच ताकदीचं प्रत्युत्तर सुजय विखे पाटील यांना दिलं होतं. 'सिंह हा जंगलाचा राजा असतो, तो कधीच एकटा चालत नाही. सर्वांना बरोबर घेऊन चाललो. या नगरपालिका निवडणुकीत देखील तसंच होईल,' असे प्रत्युत्तर सत्यजीत तांबेंनी दिलं होतं.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.