Ahilyanagar Navratri clashes : अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर आणि श्रीरामपूर तालुक्यांत नवरात्रोत्सवादरम्यान हाणामारीच्या दोन घटना घडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. संगमनेर तालुक्यातील धांदरफळ बुद्रुक येथे दांडियासाठी उभारलेल्या मंडपाची तोडफोड करण्याच्या प्रयत्नावरून दोन गटांत तुंबळ हाणामारी झाली.
तर श्रीरामपूरमध्ये नवरात्रोत्सवानिमित्त सादर करण्यात आलेल्या ‘भुताचा आखाडा’ या देखाव्यातील कलाकारांना त्रास देण्यावरून वाद निर्माण झाला. या वादाचे रूपांतर मारहाणीत झाले असून, दोन्ही घटनांमध्ये सोनसाखळ्या हिसकावून नेल्याच्या तक्रारी करण्यात आल्या आहेत. श्रीरामपूरच्या घटनेत तिघांना अटक करण्यात आली असून, पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.
संगमनेर (Sangamner) तालुक्यातील धांदरफळ बुद्रुक येथील बाजारतळावर नवरात्रोत्सवानिमित्त दांडिया खेळण्यासाठी मंडप उभारण्यात आला होता. या मंडपाचे काही युवकांनी नुकसान केल्याचा आरोप आहे. या प्रकाराचा जाब विचारण्यातून दोन गटांत वाद निर्माण झाला. त्यानंतर या वादाचे रूपांतर तुंबळ हाणामारीत झाले.
या वेळी लाकडी दांडके, लोखंडी रॉड, फायटर आणि चाकूचा वापर करण्यात आल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. दोन्ही गटांकडून एकमेकांना जीवे मारण्याच्या धमक्या देण्यात आल्याचा आरोपही करण्यात आला आहे. याशिवाय, एका व्यक्तीच्या गळ्यातील दीड तोळे वजनाची सोनसाखळी हिसकावून नेल्याचे फिर्यादीत (Crime) म्हटले आहे.
श्रीरामपूर शहरातील बेलापूर रस्त्यावर राजमुद्रा प्रतिष्ठानतर्फे शुक्रवारी रात्री नवरात्रोत्सवानिमित्त ‘भुताचा आखाडा’ हा देखावा सादर करण्यात आला होता. या वेळी सचिन धोत्रे, हर्षल शिंदे, प्रशांत शिंदे, राहुल फुलारे, शुभम धात्रे आणि त्यांच्यासोबत आलेल्या अन्य तिघांनी देखाव्यातील कलाकारांना त्रास देण्यास सुरुवात केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. मंडळाच्या सदस्यांनी संबंधितांना तेथून जाण्यास सांगितले. मात्र, रात्री दहाच्या सुमारास संबंधित व्यक्ती हातात लाकडी काठ्या घेऊन पुन्हा आल्या आणि मंडळाचे सदस्य तसेच कलाकारांना मारहाण करू लागल्या, असा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.
मारहाण सुरू असताना सौरभ कालकुंद्री हे वाद सोडविण्यासाठी पुढे गेले. त्यावेळी त्यांना शिवीगाळ करून काठ्यांनी मारहाण करण्यात आल्याचे फिर्यादीत नमूद आहे. तसेच धारदार शस्त्राने त्यांच्या कपाळावर, डाव्या भुवईजवळ आणि नाकावर वार करून जखमी करण्यात आल्याचा आरोप आहे. या घटनेत देखाव्यातील कलाकार निलेश जोंधळे हेही जखमी झाले. त्यांच्या डाव्या हाताच्या अंगठ्याजवळ धारदार शस्त्राने वार करण्यात आल्याचे तक्रारीत म्हटले आहे. मारहाणीदरम्यान सौरभ कालकुंद्री यांच्या गळ्यातील दोन तोळे वजनाची सोन्याची चैन हिसकावून नेल्याचाही आरोप करण्यात आला आहे.
मारहाणीनंतर पुन्हा विरोध केल्यास जिवंत सोडणार नाही, अशी धमकी देऊन संबंधित व्यक्ती निघून गेल्याचे फिर्यादीत नमूद आहे. या प्रकरणी श्रीरामपूर शहर पोलिस ठाण्यात संबंधित आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात तिघांना अटक करण्यात आली असून, पोलिस पुढील तपास करीत आहेत.
संगमनेर आणि श्रीरामपूरमधील या घटनांमुळे नवरात्रोत्सवाच्या उत्सवी वातावरणाला गालबोट लागले आहे. मंडपाच्या नुकसानीवरून झालेला वाद असो किंवा धार्मिक-सांस्कृतिक देखाव्यादरम्यान कलाकारांना त्रास देण्याचा प्रकार, किरकोळ वादांचे रूपांतर हिंसक संघर्षात झाल्याचे या घटनांवरून दिसून येते. उत्सवांच्या काळात शांतता राखणे, सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये शिस्त पाळणे आणि वादांचे कायदेशीर मार्गाने निराकरण करणे, यांचे महत्त्व या घटनांमुळे पुन्हा अधोरेखित झाले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.