Sangamner Talathi Office news : संगमनेर शहरातील चावडी इथल्या तलाठी कार्यालयात सुरू असलेल्या एजंटगिरीचा एकनाथ शिंदे शिवसेना आमदार अमोल खताळ यांनी पर्दाफाश केला. एका दिव्यांग वृद्ध महिलेने समाज माध्यमांवर संपर्क साधून, याबाबत तक्रार केली होती.
या तक्रारीची दखल घेत, आमदार खताळ यांनी स्वतः पुढाकार घेत, या एजंटगिरीचा पर्दाफाश केला. संबंधित कार्यालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना यावर पुढे कारवाईच्या सूचना त्यांनी दिल्या आहेत.
सरकारी कामकाजात गंभीर अनियमितता उघडकीस आली असून, दिव्यांग अन् वयोवृद्ध नागरिकांकडून पैसे उकळले जात असल्याचा हा धक्कादायक प्रकार आहे. चावडी इथल्या तलाठी (Talathi Office) कार्यालयात दिव्यांग व वयोवृद्ध नागरिकांना कामासाठी वारंवार हेलपाटे मारायला लावले जात होते. ठिकठिकाणी अडवणूक करून पैसे मागितले जातात, अशी एका वृद्ध महिलेने समाज माध्यमाद्वारे आमदार खताळ यांना तक्रार केली होती.
विशेष म्हणजे, या कामकाजात खासगी व्यक्तींचा सहभाग असल्याचा आरोपही करण्यात आला. या तक्रारीची दखल घेत शिवसेना (Shiv Sena) आमदार खताळ यांनी तत्काळ संबंधिताची माहिती घेतली. तलाठी कार्यालयात पोहोचल्यावर तलाठी व कोतवाल कोणीच हजर नसल्याचे दिसून आले.
त्याऐवजी मन्सूर शेख हा व्यक्ती तिथं बसून सरकारी कागदपत्रे हाताळत असल्याचे आढळले. यावेळी आतमध्ये उपस्थित असलेल्या आणखी एका व्यक्तीला विचारणा केली असता, “मी मन्सूर शेख यांचा जावई आहे,” असे उत्तर त्याने दिले. यावर आमदार खताळ यांचा संताप उफाळून आला. “तुम्हाला इथं बसण्याचा अधिकार कोणी दिला?” असा जाब त्यांनी विचारला. त्यावर “तलाठी उपस्थित नसल्याने आम्हीच काम पाहत होतो,” असे उत्तर या दोघांनी दिले.
या गंभीर प्रकारानंतर आमदार खताळ यांनी प्रांताधिकारी अरुण उंडे अन् तहसीलदार धीरज मांजरे यांना तत्काळ फोन करून संबंधित तलाठ्यावर कठोर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या. सरकारी कागदपत्रांची पडताळणी खासगी व्यक्तींमार्फत होणे हा, अत्यंत गंभीर व बेकायदेशीर प्रकार आहे, असे आमदार खताळ यांनी सांगितले.
आमदार खताळ यांच्या तक्रारीनंतर प्रशासन खडबडून जागे झालं अन् नायब तहसीलदार भांगरे हे तलाठी कार्यालयात दाखल झाले. त्यानंतर संबंधित दोघांवर कारवाई करण्यात आली असून, त्यांना पुढे त्याठिकाणी बसू न देण्याचे स्पष्ट आदेश देण्यात आले आहेत. या प्रकरणामुळे महसूल विभागाच्या कामकाजावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. आमदार अमोल खताळ यांच्या संवेदनशीलतेची या घटनेतून प्रचिती आली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.