Maharashtra Politics : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी शिवसेनेचे(शिंदे गट) शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्यावर गिरणा सहकारी साखर कारखान्याशी संबधित १७८ कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप काही दिवसांपूर्वी केला होता. त्यावरुन राऊत यांच्याविरोधात आपली बदनामी केली असा फौजदारी खटला भुसे यांनी मालेगाव न्यायालयात दाखल केला होता. या खटल्याच्या सुनावणीसाठी संजय राऊत व दादा भुसे हे दोघेही शनिवार (दि. २१) मालेगाव न्यायालयात हजर होते. यावेळी याप्रकरणात मोठा ट्विस्ट पाहायला मिळाला. .
पत्रकार कधीही त्यांचा सोर्स सांगत नाहीत. पण संजय राऊत यांनी त्यांची सूत्र पहिल्यांदाच ओपन केली आहेत. आपल्याला याप्रकरणाची माहिती अद्वय हिरे यांनी दिली होती असा खुलासा राऊत यांनी केला. भाजपच्या कमळावर स्वार झालेल्या अद्वय हिरे यांना त्यांनी तोंडावर पाडलं. राऊत म्हणाले या प्रकरणाची खातरजमा केल्यानंतर हिरे यांनी दिलेली माहिती खोटी असल्याचे समजले. संजय राऊत यांनी आपल्याला चुकीची माहिती मिळाली आणि आपण दादा भुसे यांच्यावर आरोप केल्याचे मान्य केले. राऊत यांनी यावेळी दादा भुसे यांची माफी मागितली.
न्यायालयात भुसे-राऊत दोघेही हसत-हसत व विनोद करत एकत्र कोर्टात गेले होते आणि आतमध्येही एकमेकांच्या शेजारी बसल्याचे पाहायला मिळाले. मालेगाव येथील अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी यांच्या न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी होती. यासाठी संजय राऊत आणि दादा भुसे दोघेही न्यायालयात हजर झाले होते.
या प्रकरणातील मागील सुनावणीसाठी संजय राऊत न्यायालयात हजर राहिले नव्हते. त्यामुळे न्यायालयाने त्यांना 12 हजार रुपयांचा दंड ठोठावला होता. मात्र आजच्या सुनावणीसाठी संजय राऊत हे काल शुक्रवार रात्रीच मालेगावात दाखल झाले होते. दरम्यान संजय राऊतांना मोठा दिलासा मिळाला आहे. कारण, दादा भुसे यांनी आज हा खटलाच मागे घेतला आहे. राऊत यांनी माफी मागितल्याने दादा भुसेंनी हा खटला मागे घेतला आहे. संजय राऊत यांनी दिलगिरी व्यक्त केल्याने हा खटला मागे घेत असल्याचं दादा भुसे यांनी सांगतिलं.
यासंदर्भात दादा भुसे यांनी माध्यमांना माहिती दिली. यावेळी संजय राऊतही दादा भुसे यांच्या शेजारीच उभे होते. दादा भुसे म्हणाले, जो काही आरोप आपल्या मालेगावकरांवर संजय राऊत यांच्याकडून केला गेला. त्या आरोपांमुळे मालेगावच्या शेतकऱ्यांचा अवमान झाला. या भावनेतून आम्ही सर्वांनी एकत्र येऊन मग राऊतांनी आपले शब्द मागे घ्यावेत अशा प्रकारची भावना माननीय राऊत साहेबांकडे व्यक्त केली. तशी नोटीस त्यांना दिली होती. मात्र त्यांनी आरोप मागे न घेतल्याने त्यांच्यावर खटला दाखल केला होता.
दादा भुसे यांनी सांगितले की, गिरणा साखर कारखान्यात 178 कोटी रुपयांचा घोटाळा झाला, अशी बातमी राऊत यांनी सामनातून दिली होती. परंतु प्रत्यक्षात गिरणा सहकारी साखर कारखाना उभा राहण्यासाठी आम्ही प्रयत्न केले होते. केवळ एक कोटी सत्तर लाख रुपये जमा केले होते. ते पैसे आम्ही आर्म स्ट्राँगला जमा केले होते.
दादा भुसे पुढे म्हणाले, नंतरच्या काळात संजय राऊत यांनी यासंदर्भात पडताळणी केल्यानंतर त्यांना हे आढळून आले आहे की, त्यांनी केलेला आरोप चुकीचा आहे. निराधार आहे. ज्यांनी त्यांना माहिती दिली होती त्यांच्या माहितीच्या आधारावर त्यांनी हे आरोप केले होते. आत्ताच्या घडीला संजय राऊत यांनी मालेगावच्या शेतकऱ्यांची, नागरिकांची, सभासदांची दिलगिरी व्यक्त केली आहे. राऊत साहेबांना हा आरोप खोटा असल्याचे निदर्शनास आले. अद्वय हिरे यांनी ही खोटी माहिती दिली होती. शिवाय त्यांच्या तब्येतीचाही विषय आहे. यासर्व गोष्टींचा विचार करुन आज हा खटला मागे घेण्यात आल्याची माहिती दादा भुसे यांनी दिली.
दरम्यान या प्रकरणाची माहिती आपल्याला अद्वय हिरे यांनी दिली होती. त्या आधारावर आपण भुसे यांच्यावर आरोप केले होते असा खुलासा संजय राऊत यांनी देखील माध्यमाशी बोलताना केला. दरम्यान आज कोर्टात तुम्ही दोघे एकत्र दिसलात पुढेही हे संबंध कायम राहतील का असा प्रश्न राऊत यांना पत्रकारांनी केला असता 'आमचे राहतील' असे हसत हसत राऊत म्हणाले.
तर भुसे म्हणाले, माननीय राऊत साहेबांनी चुकीच्या आधारावर १ कोटी ७८ लाखाला डायरेक्ट १७८ कोटी करुन टाकले होते. आणि म्हणूनच मालेगावच्या शेतकऱ्यांची माफी मागून त्यांनी दिलगीरी व्यक्त केली आहे. त्यांच्या तब्येतीचेही कारण आहे. यासर्व गोष्टी पाहाता मालेगावच्या शेतकऱ्यांनी सांगितलं की आपण राऊत यांच्या विनंतीला मान देऊ, हा खटला मागे घेऊ त्यानुसार आपण हा खटला मागे घेतल्याचे दादा भुसे म्हणाले. तर, ज्यांच्यामुळे हा विषय आला तेही दुसऱ्या पक्षात गेले आहेत. दादा भुसे आणि माझे चांगले संबंध आहेत, असे संजय राऊत यांनी म्हटले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.