उत्तर महाराष्ट्र

UBT Morcha Nashik : उद्धव ठाकरेंचा पठ्ठ्या गिरीश महाजनांच्या मागे हात धुवून लागला, भव्य मोर्चा निघाला.. कुंभमेळा कामांचे काढले वाभाडे

Sanjay Raut, UBT Morcha Nashik नाशिक शहरात रस्त्यांची दुरावस्था झाली असून त्याविरोधात ठाकरे सेनेने जनआक्रोश मोर्चा काढला. संजय राऊतांनी या मोर्चाचे नेतृत्व केलं. मोर्चातून त्यांनी कुंभमेळा कामांचे वाभाडे काढले.

Ganesh Sonawane

UBT Morcha Nashik : नाशिकमध्ये सिंहस्थ कुंभमेळ्याची कामे सुरु असून ही सर्व कामे अर्धवट अवस्थेत असल्याने नाशिककरांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. शहरभर रस्ते खोदून ठेवले असून या खड्ड्यांची चर्चा आता राज्यभरात सुरू झाली आहे. विशेषत: शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने हा मुद्दा लावून धरला आहे. ठाकरेंचे फायरब्रॅण्ड नेते संजय राऊत हे कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांच्या मागे हात धुवून लागल्याचे पाहायला मिळत आहे.

तीन दिवसांपूर्वी युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे नाशिक दौऱ्यावर येऊन गेले. शहरातील रस्त्यांवरील खड्ड्यांची पाहणी करत त्यांनी प्रशासनावर हल्लाबोल केला. आज पुन्हा संजय राऊत यांच्या उपस्थितीत नाशिकमध्ये जनआक्रोश महामोर्चाला सुरुवात झाली आहे. मोठ्या संख्येने शिवसैनिक व नाशिककर मोर्चात सहभागी झाले असून मोर्चा निघाला आहे. महापालिकेवर हा मोर्चा धडकणार आहे. त्यासाठी कालपासून संजय राऊत नाशिकमध्ये दाखल झाले होते.

खड्डे बुजवता येईना, कुंभमेळा करायला निघाले....

मोर्चाला सुरुवात करण्यापूर्वी राऊत यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यात त्यांनी शहरातील कुंभमेळा कामांचे वाभाडे काढले. कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांच्यासह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली. नाशिकमध्ये सिंहस्थ कुंभमेळ्याच्या नावाखाली सुरू असलेल्या कामांमुळे सात निष्पाप व्यक्तींचा बळी गेला. यांना साधे रस्त्यावरील खड्डे बुजविता आले नाहीत आणि निघाले कुंभमेळा करायला निघाल्याची टीका राऊत यांनी केली. खड्ड्यांच्या प्रश्नावरून आणि कुंभमेळ्यातील कथित भ्रष्टाचारावरून सरकारवर हल्लाबोल केला.

भाजपचे 80 नगरसेवक टाकता येतील एवढे मोठे खड्डे

नाशिक शहरात प्रशासनाने लोकांना रस्त्यावरच 'स्विमिंग पूल' निर्माण करून दिले आहेत. मी स्वत: मखमलाबाद रोडवर खड्डयांची पाहणी केली, त्यात मी असे काही खड्डे पाहिलेत, की ज्यात भाजपचे 80 नगरसेवक टाकता येतील एवढे मोठे खड्डे आहेत. दुसरा एक खड्डा बघितला ज्यात शिंदे गटाचे नगरसेवक टाकता येतील," असा शेलक्या शब्दात राऊतांनी टीका केली.

साहेब आम्ही कसं जगायचं?

राऊत म्हणाले, नाशिकचे खड्डे आता देशभरात चेष्टेचा विषय झाले आहेत. मखमलाबाद रोडवर पाहणी दरम्यान फळे विकणाऱ्या एका महिलेने डोळ्यात पाणी आणून मला तिची व्यथा सांगितली. साहेब आम्ही कसं जगायचं? ही अवस्था प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे ओढावली आहे. दहा वर्षांपूर्वी नाशिकचा लौकिक 'खड्डेमुक्त शहर' असा होता. नाशिक एक सुंदर शहर मानले जायचे. पण आजचे चित्र अत्यंत भयंकर आणि विद्रूप झाल्याचे राऊत म्हणाले.

१० लोकांचे खून केले...

काय करतंय प्रशासन, तुमचे कुंभमेळा मंत्री काय करताय? कुंभमेळा आयुक्त, महापालिका आयुक्त काय करताय? एवढा निरढावलेपणा येतो कुठून? माझ्याकेड जी माहिती आहे त्यानुसार, खड्ड्यात पडून आतापर्यंत 10 लोकांचा मृत्यू झाला आहे. पंरतु प्रशासन हा आकडा लपवत आहे. काय त्यांना नुकसान भरपाई दिली तर पाच लाख रुपये? आमच्या जीवाची किंमत पाच लाख आहे का? मृत्यूमुखी पडलेल्या कुटुंबाला एक कोटी रुपये दिले पाहीजे तर जखमींना ५० लाख दिले पाहीजे अशी मागणी राऊत यांनी केली.

आयुक्तांची बदली करा...

जे दहा लोक मरण पावले आहेत. हे मृत्यू नसून प्रशासनाने केलेले 10 खून आहेत. या ठेकेदारांवर आणि आयुक्तांवर 'सदोष मनुष्यवधाचा' गुन्हा दाखल केला पाहिजे. गरज पडल्यास आम्ही न्यायालयात जाऊन 'प्रायव्हेट गुन्हे' दाखल करू असा इशारा राऊतांनी दिला. दहा जणांचा मृत्यू झालाय. कुंभमेळा आयुक्त व महापालिका आयुक्तांच्या चेहऱ्यावर थोडी तरी संवेदना आहे का? कुणी माफी मागितली का? त्यांची तत्काळ बदली करा अशी मागणी राऊतांनी केली.

कुंभमेळ्यातून भ्रष्टाचाराचा जामनेर पॅटर्न राज्यात आला

कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांना राऊत यांनी 'चंपतराय' आणि 'कुंभकर्ण मंत्री' अशी उपमा दिली. सिंहस्थ कुंभमेळ्याचे बजेट 15 हजार कोटींवरून थेट 45 हजार कोटींवर नेले आहे. आधी 15 हजार टॉयलेट बांधणार होते, आता 55 हजार बांधणार आहेत. त्यात 10 हजार 'व्हीआयपी टॉयलेट' आहेत. VIP टॉयलेट म्हणजे काय तिथे सोन्याचे कमोड असणार आहेत का? कुंभमेळ्याच्या नावाखाली टॉयलेटमध्ये पैसे खाणारा हा भाजपचा आणि गिरीश महाजनांचा 'जामनेर पॅटर्न' आहे, जो त्यांनी राज्यात आणला आहे.

दत्तक पित्याने काय केले?

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाशिकला दत्तक घेतले आहे. मग शहराची इतकी वाईट अवस्था का झाली, असा सवाल उपस्थित करत राऊत म्हणाले, की देशातील रस्ते स्पेस टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून विकसित करत असल्याचे पंतप्रधान मोदी शनिवारी लाल किल्ल्यावरून म्हणाले. देशात काय सुरू आहे, हे त्यांनी लाल किल्ल्यावरून काल बघितले असेल, असा टोलाही त्यांनी लगावला.

पीएम मोदी आणि सीएम फडणवीस हे 2047 च्या विकासाच्या आणि स्पेस टेक्नॉलॉजीच्या गप्पा मारतात. पण इथले खड्डे बघितले की वाटते, नाशिक हे चंद्रावरचे शहर आहे का? कारण चंद्रावरही खड्डे आहेत. पण चंद्रावर गेलेला नील आर्मस्ट्राँग सुखरूप परत आला, इथे मात्र चंद्रावर (नाशिकमध्ये) रोज लोक खड्ड्यात पडून मरत आहेत अशी टीका राऊतांनी केली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT