Balasaheb Thorat & Sanjay Raut Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Sanjay Raut News: शिवसेना ठाकरे गटाचा दावा, नाशिक मध्य मतदार संघात काँग्रेसची केली कोंडी?

Sanjay Raut News; Shivsena UBT claims Nashik centre, Congress in trouble-शिवसेना ठाकरे गटाकडून प्रत्येक जिल्ह्यातील मतदार संघ निहाय प्रबळ उमेदवारांचा विचार केला जात आहे.

Sampat Devgire

Nashik Centre constituency: विधानसभा निवडणूक मतदार संघाच्या जागा वाटपाचे धोरण जवळपास निश्चित आहे. महाविकास आघाडीच्या घटक पक्षांनी मतदारसंघांबाबत चर्चा सुरू केली आहे. नाशिक शहरातील मतदारसंघ कोणाला सोडणार यावरून स्थानिक इच्छुकांत स्पर्धा आहे.

दोन दिवसांपूर्वी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रवक्ते खासदार संजय राऊत नाशिकला होते. यावेळी त्यांनी जिल्ह्यातील मतदार संघाचा आढावा घेतला. शहरातील चार पैकी नाशिक मध्य आणि पश्चिम हे दोन मतदारसंघ ठाकरे गटाने निश्चित केले आहेत. कोणत्याही परिस्थितीत हे मतदारसंघ सोडण्यात येणार नसल्याचे यावेळी पदाधिकाऱ्यांना स्पष्ट करण्यात आले.

खासदार राऊत यांच्या या दौऱ्यात अन्य पक्षाच्या नेत्यांनी ही त्यांची भेट घेतली. यावेळी काँग्रेसच्या एका इच्छुक महिला उमेदवाराने खासदार राऊत यांची भेट घेतली. नाशिक मध्य मतदारसंघ काँग्रेस पक्षाला सोडण्यात यावा. या मतदारसंघात आपण प्रदीर्घ काळ निवडणुकीची तयारी करीत आहोत, असा दावा त्यांनी केला.

या चर्चेत खासदार राऊत यांनी यंदाची निवडणूक महाराष्ट्राच्या दृष्टीने अत्यंत प्रतिष्ठेची आहे. याबाबत शिवसेनेने नाशिक शहरातील नाशिक मध्य मतदार संघ आपल्याकडे असावा असा निर्णय घेतला आहे. याबाबत सहकारी पक्षांनाही कल्पना देण्यात येणार असल्याचे सांगितले.

या बैठकीनंतर काँग्रेसच्या इच्छुकांमध्ये नाराजीचे वातावरण तयार झाल्याचे कळते. या मतदार संघात महाविकास आघाडी कडून सातत्याने मतदार संघ कोणाला यावर चर्चा होत आहे. स्थानिक पातळीवर शिवसेना ठाकरे गट काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून येथे उमेदवारीचा दावा करण्यात आला आहे.

आघाडीच्या प्रत्येक घटक पक्षाकडे येथे इच्छुक उमेदवारांची संख्या लक्षणीय आहे. यामध्ये प्रामुख्याने कोणता उमेदवार प्रभावी राहू शकेल याची चाचपणी वरिष्ठ नेते करीत आहेत. निवडणुकीची केव्हाही घोषणा होऊ शकते. त्यामुळे आढावा घेतला जात आहे.

शिवसेना ठाकरे गटाने मतदारसंघाचे वाटप करताना त्या मतदारसंघात निवडून येण्याची क्षमता असलेला प्रबळ उमेदवार कोण? याला प्राधान्य दिले आहे. नाशिक शहरातून या मतदार संघासाठी माजी आमदार वसंत गीते आणि नाशिक पश्चिम मतदार संघातून शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर यांना उमेदवारी देण्यात यावी असा ठराव एक मताने करण्यात आला आहे.

शिवसेना ठाकरे गटाने हा ठराव वरिष्ठांकडे पाठविला आहे. त्या तुलनेत महाविकास आघाडीच्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात उमेदवार कोण? यावर एकमत नाही. उमेदवारीचे निकष काय? हे देखील स्पष्ट धोरण नाही. त्यामुळे एकाच वेळी अनेक उमेदवार वरिष्ठांकडे लॉबींग करताना दिसतात.

स्थानिक पातळीवर देखील या इच्छुकांचा स्वतंत्र उमेदवार आणि प्रचार मोहीम सुरू असल्याचे दिसते. त्यामुळे निवडणुकीत संघटित यंत्रणा उभी करण्याचे आव्हान महाविकास आघाडीच्या घटक पक्षांकडे आहे.

काँग्रेसचे शहराध्यक्ष आकाश छाजेड यांसह दहा ते बारा इच्छुक उमेदवार असल्याचा दावा करण्यात येत आहे. यातील बहुतांश इच्छुकांनी पक्षाकडे अर्ज केले आहेत. त्यावर एकमत करण्यासाठी पुढाकार घेऊ शकेल, एवढा प्रभावी स्थानिक नेता पक्षात नाही. त्यामुळे या मतदारसंघावरून महाविकास आघाडीत चांगलीच जुंपण्याची चिन्हे आहेत.

------

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT