eknath khadse.jpg sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Eknath Khadse: भाजपने 'वेटिंग'वर ठेवलेले खडसे पुन्हा राष्ट्रवादीच्या वाटेवर; पण बालेकिल्ल्यातूनच 'स्पीडब्रेकर'?

NCP Sharadchandra Pawar News : राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या उपस्थितीत माझा भाजपमध्ये प्रवेश झाला आहे, मात्र त्याची अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही, असे त्यांनी नुकतेच सांगितले आहे.तसेच मी अजूनही राष्ट्रवादीचा आमदार आहे. मी राजीनामाही दिलेला नाही, त्यामुळे मी परत जाऊ शकतो, असे त्यांनी काही दिवसांपूर्वी सांगितले आहे.

Deepak Kulkarni

NCP Leader Eknath Khadse Joining BJP: राष्ट्रवादी काँग्रेसमधून भाजपमध्ये घरवापसी केली आहे,असं ठामपणे सांगणारे माजी मंत्री आणि विधान परिषदेचे आमदार एकनाथ खडसे हे आता पुरते गोंधळलेले असल्याचं बोलले जात आहे. एकनाथ खडसे (Eknath Khadse) हे त्यांच्या विरोधकांच्या चक्रव्यूहात पुरते अडकल्याचे दिसून येत आहे.

एकेकाळी भाजपमध्ये वजनदार नेते म्हणून गणती असलेले 72 वर्षीय नाथाभाऊ आता आरोग्याच्या विविध समस्या आणि चौकशींच्या फेऱ्यांमुळे बेजार झाले आहेत. त्यातच राष्ट्रवादी काँग्रेस की भाजप अशा द्विधा मनस्थितीत काय निर्णय घेणार याकडे सर्वांचेच लक्ष लागलेले आहे.

भाजपने प्रवेशाबाबत प्रतिसाद दिला नसल्यानं आपण आपल्या मूळ पक्षात म्हणजेच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातच राहणार असल्याची भूमिका विधान परिषदेचे आमदार एकनाथ खडसेंनी जाहीर केली आहे.

मात्र,दोन दगडांवर पाय ठेवलेल्या खडसेंना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षामधूनच आता तीव्र विरोध होण्याची दाट शक्यता आहे.माजी मंत्री डॉ.सतीश पाटील यांनी खडसेंना थेट निष्ठा सिध्द करण्याचं चॅलेंज दिलं आहे.

भाजप (BJP) प्रवेशाला विरोध होत असल्यामुळे उद्विग्न झालेल्या नाथाभाऊंनी आपण अद्यापही ऱाष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार आहोत, असे म्हणत भाजपला इशारा दिला होता. मात्र, या इशाऱ्यालाही भाजपच्या कोणत्याच नेत्याने गांभीर्याने घेतले नाही. त्यामुळे संतापलेले खडसे आता पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसलाच पुन्हा आपला मूळ पक्ष समजण्याची भाषा बोलू लागले आहे. पण त्यांना पक्षातून विरोध होण्याची चिन्हे आहेत.

सतीश पाटील नेमकं काय म्हणाले...?

सतीश पाटील यांनी एकनाथ खडसे यांचं नाव न घेता आपली भूमिका स्पष्ट केली आहे. ते म्हणाले,ज्यांना पक्षात यायचंय त्यांना येऊ द्या, मात्र, त्यांनी आपली निष्ठा सिद्ध करावी. ते सध्या कोणत्या पक्षात आहेत हे शरद पवार आणि जयंत पाटील यांनीही स्पष्टपणे सांगायला हवे,कारण अशा कार्यकर्त्यांमुळे प्रामाणिक कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण होत आहे अशा शब्दांत पाटील पक्षाला घरचा आहेर दिला आहे. त्यांचा रोख हा खडसेंकडेच असल्याचं लपून राहिलेलं नाही.

भाजपचे काही नेते आपले राजकारण संपवण्याचा प्रयत्न करीत आहेत, असा आरोप करत त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. लोकसभा निवडणुकीवेळी त्यांनी त्यांनी थेट दिल्लीत अमित शाह, जे.पी.नड्डा यांच्यासोबतचा फोटो टाकत आपण पुन्हा घरवापसीचे संकेत दिले होते. तशी चर्चाही काही महिन्यांपासून सुरू झाली होती. नाथाभाऊंनीही त्याला दुजोरा दिला. राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या उपस्थितीत माझा भाजपमध्ये प्रवेश झाला आहे, मात्र त्याची अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही, असे त्यांनी नुकतेच सांगितले आहे.

भाजपमधील काही नेत्यांचा माझ्या प्रवेशाला विरोध आहे,असे म्हणताना नाथाभाऊंचा रोख उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे असतो. नाथाभाऊ आता चक्रव्यूहातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत आहेत. मी अजूनही राष्ट्रवादीचा आमदार आहे. मी राजीनामाही दिलेला नाही, त्यामुळे मी परत जाऊ शकतो, असे त्यांनी काही दिवसांपूर्वी सांगितले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT