Nashik Politics : नाशिक जिल्ह्यात सर्वपक्षीय 15 आमदार आहेत. नाशिकमधील आमदार शक्यतो अपवाद वगळता मतदारसंघाबाहेरचे प्रश्न विधिमंडळात मांडत नाही हा आजवरचा इतिहास आहे. त्यामुळे जिल्ह्यातील प्रश्नांची जबाबदारी घेणारं सर्वपक्षीय नेतृत्व नाशिकमध्ये दिसत नाही.
संपूर्ण जिल्ह्याच्या विकासाची भूमिका घेऊ शकेल असे सर्वसमावेशक नेतृत्व नसल्याने राजकीय अंगाने जिल्ह्याचे नुकसान झाल्याचा इतिहास आहे. नाशिक जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी हे अपवाद वगळता केवळ आपआपल्या मतदारसंघातील प्रश्न मांडत असतात. मात्र, याउलट नाशिक पदवीधर मतदारसंघाचे (ज्यात संपूर्ण नाशिक विभाग येतो) ते आमदार सत्यजीत तांबे विधिमंडळात सातत्याने नाशिकमधील पायाभूत सुविधा, रखडलेले प्रकल्प, नागरिकांच्या समस्या याबाबत प्रश्न विचारुन लक्ष्य वेधून घेत असतात. त्यामुळे नाशिकमधील नेतृत्वाची पोकळी भरुन काढण्याचा त्यांचा प्रयत्न आहे का काय? असा प्रश्न या निमित्ताने चर्चिला जात आहे.
यंदाही विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात आमदार सत्यजित तांबे यांनी नाशिकमधील अनेक विषय विधिमंडळात मांडले. त्यात कुंभमेळ्यानिमित्त सुरु असलेली रस्त्यांची व इतर कामे वेळेत पूर्ण झाली पाहिजेत, यंत्रणांच्या समन्वयाच्या अभावामुळे कामे रखडत आहेत. यासंदर्भात अनेक महत्त्वाचे मुद्दे आमदार तांबे यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले.
त्यामध्ये, त्र्यंबकेश्वर मार्गावरील विकासकामांमध्ये विविध विभागांकडून एकाच रस्त्यावर स्वतंत्रपणे कामे सुरू असल्याने दिसून येत असलेला समन्वयाचा अभाव. पावसाच्या पाण्याचा निचरा, सांडपाणी, युटिलिटी डक्ट आदींसाठी वेगवेगळ्या यंत्रणांकडून पाइपलाइन टाकल्या जात असल्याने कामांचा मंदावलेला वेग, नाशिककरांना कामांमुळे होत असलेला त्रास यासह अनेक महत्वाचे मुद्दे त्यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले.
कुंभमेळ्यातील अनेक कामांना DPR तयार होण्यापूर्वीच प्रशासकीय मान्यता, तसेच अपूर्ण भूसंपादनामुळे रखडलेली कामे याकडे त्यांनी शासनाचे लक्ष वेधले. मंजूर निधीपैकी प्रत्यक्षात संबंधित यंत्रणांकडे किती निधी वर्ग झाला? वाहतूक कोंडी आणि कामांचा आढावा घेण्यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधींसोबत बैठक घेणार का? कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर शासनाने गोदावरी पुनरुज्जीवनासाठी कोणती कार्यवाही केली आहे का? असे रोखठोक सवाल त्यांनी सरकारला विचारले.
आताही नाशिकच्या विकासाला चालना देऊ शकणाऱ्या नाशिक -पुणे रेल्वेमार्गाचा विषय त्यांनी लावून धरला आहे. या विषयावर राधाकृष्ण विखे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत विधिमंडळात पार पडलेल्या महत्त्वपूर्ण बैठकीला आमदार तांबे सर्वात पुढे दिसले. विधिमंडळातही त्यांनी हा विषय प्रखरतेने मांडला. आता तर त्यांनी जनआंदोलन करण्याची घोषणा केली आहे. ९ ऑगस्टला क्रांती दिनानिमित्त त्यांनी हे आंदोलन पुकारलं आहे. नाशिकमध्ये पत्रकारपरिषद घेत त्यांनी त्याची माहिती दिली.
यापूर्वी इंडियाबुल्स प्रकल्पाचा प्रश्न त्यांनी विधिमंडळात उपस्थिीत केला होता. त्यानंतर सातत्याने आंदोलन, भूमिका व पाठपुरावा केला होता, ज्यातून या प्रकल्पाला गती मिळाली. समृद्धी महामार्गाला जोडणारा नाशिकचा कनेक्टर कधी होणार? नाशिककरांना समृद्धी महामार्गाचा थेट आणि न्याय्य लाभ मिळण्यासाठी साकूर फाटा-समृद्धी कनेक्टरचे काम तातडीने पूर्ण होणे अत्यावश्यक असल्याचा मुद्दा त्यांनी १० जुलै २०२५ रोजी हा महत्त्वाचा विधिमंडळात मांडला होता. साकूर फाटा–समृद्धी कनेक्टरसाठी भूसंपादन पूर्ण झाले असूनही प्रत्यक्ष कामाला अद्याप सुरुवात झालेली नाही. परिणामी, आजही नाशिककरांना इगतपुरीमार्गे समृद्धी महामार्गावर जावे लागते आणि इगतपुरी तसेच समृद्धी महामार्गाचा असा दुहेरी टोल भरावा लागतो. त्यामुळे नाशिकला समृद्धीशी थेट जोडावे अशी मागणी त्यांनी केली.
सत्यजित तांबे यांनी नाशिक जिल्ह्यातील अनेक प्रश्न प्रखरतेने विधिमंडळात मांडले व शासनाला सवाल केले. याउलट ठराविक काही अपवाद वगळता मतदारसंघाच्या बाहेरचे प्रश्न नाशिकमधील आमदार मांडताना दिसले नाही. नाशिक मध्यच्या आमदार देवयानी फरांदे यांनी काही मोजके प्रश्न मतदारसंघाच्या बाहेरचे मांडले. त्याव्यतिरिक्त इतर कुणी मतदारसंघाबाहेर जाऊन, नाशिक जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीकोण डोळ्यासमोर ठेऊन प्रश्न मांडताना दिसले नाही. त्यामुळे नाशिक जिल्ह्याच्या नेतृत्वाची हीच पोकळी भरुन काढण्याचा प्रयत्न तर सत्यजित तांबेंनी केला नाही, असा प्रश्न या निमित्ताने चर्चिला जात आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.