Prof. Hari Narke Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

विद्येच्या माहेरघरी कोटींची उधळपट्टी; प्रा. हरी नरकेंना मात्र मानधनाला नकार!

किरकोळ गोष्टींवर १६ कोटींची उधळपट्टी करून वक्त्यांकडून फुकट व्याख्यानाची अपेक्षा

Sampat Devgire

पुणे : महापालिका व त्यांच्या शिक्षण मंडळाचा कारभार व उधळपट्टी याविषय अनेक सुरस कथा नेहेमीच कानावर येतात. आत्ता नुकताच नवा प्रकार समोर आला. राज्यातील क्रमांक दोनचे शिक्षण मंडळ असलेल्या संस्थेने महात्मा फुले यांचे अभ्यासक, विचारवंत प्रा. हरी नरके (Prof Hari Narke) यांना व्याख्यानासाठी निमंत्रित केले. मात्र मानधन देता येणार नाही, असे सुनावले. त्यामुळे हा चर्चेचा विषय ठरला आहे.

यासंदर्भात स्वतः प्रा. नरके यांनीच ट्विट करून ही माहिती दिली आहे. त्यांनी `राज्यातील दुसऱ्या क्रमांकाचे शिक्षण मंडळ` असा त्याचा सूचक उल्लेख केला आहे. मात्र त्याचे नाव टाकलेले नाही. ते म्हणतात, महाराष्ट्रातील दुसऱ्या क्रमांकाच्या महानगर पालिकेचे शिक्षण मंडळ हे सर्वाधिक श्रीमंत शिक्षण मंडळ आहे. या मंडळाचे वार्षिक बजेट शेकडो कोटी रुपयांचे आहे. किरकोळ गोष्टींवर या मंडळाने नुकतेच १६ कोटी रुपये खर्च केलेत. या मंडळाने संविधान दिनाच्या औचित्याने व्याख्यानासाठी मला निमंत्रित केले होते.

ते म्हणतात, मी आभार मानून निमंत्रण स्वीकारले. प्रवासव्यवस्था तसेच अल्पमानधन द्यावे, अशी अपेक्षा व्यक्त केली. आयोजक महापालिका पदाधिकारी म्हणजे संपत्तीची भांडारे किंवा पैशाची मोहोळेच. ते कोटीकोटींच्या गाडीतून फिरतात. अधिकारी दोन-दोन लाख रुपये दरमहा वेतन घेतात. व्याख्यान ऐकणारे अधिकारी, मुख्याध्यापक, शिक्षक दरमहा ऐंशी हजार ते सव्वा लाख रुपये वेतन घेतात. पण वक्त्याने मात्र फुकट बोलावे, अशी त्यांची अपेक्षा.

प्रा. नरके म्हणाले, ``हे कार्यक्रम करणारे मान्यवर, स्वागतावर, चहापानावर, हारतूऱ्यावर हजारोच नव्हे तर लाखो रुपये उधळणार. त्यासाठी तरतूद आहे. ते त्याद्वारे मिरवून घेणार. माध्यमांमध्ये समाजकार्य केल्याचा टेंभा मिरवणार. निवडणुकीत त्याचा ढोल वाजवणार. वक्ता बोलणार म्हणून तर कार्यक्रम होणार. त्या कार्यक्रमाचा केंद्रबिंदू असलेल्या वक्त्याने मात्र फुकट यावे. आमच्याकडे या कार्यक्रमासाठी पैसे आहेत, मात्र वक्त्यासाठी निधी नाही, असे थंड उत्तर मिळाले.

यासंदर्भात ते म्हणतात, ``बरोबरच आहे, कारण त्या खर्चात कमिशन काढता येते. वक्ता कुठे कट देणार आहे? म्हणून तर त्याने समाजकार्य समजून फुकट बोलावे. तुम्हाला काय वाटते? वक्त्याने अशा कोट्याधिशांसाठीही फुकटच बोलावे काय? विद्येच्या माहेरघरात तुम्ही वक्ता किंवा संयोजक असता तर अशावेळी तुम्ही काय केले असते, असा प्रश्न त्यांनी केला.

हे मंडळ कोणते, काट्यावधींची उधळपट्टी करणारी मंडळी कोण आणि कुठली हे सांगण्याची गरज आहे काय? नक्कीच नाही.

...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT