Nashik Pune Railway : नाशिक–पुणे रेल्वेमार्गाचा विषय गेल्या काही महिन्यांपासून चर्चेत असून राजकीय वादाचा विषय बनला आहे. काही दिवसांपूर्वी रेल्वेमंत्र्यांनी हा मार्ग रद्द केल्याचे जाहीर केले होते. मात्र, हा मार्ग नाशिकच्या विकासासाठी महत्वाचा असल्याने आता नाशिकचे लोकप्रतिनिधी पक्षभेद बाजूला ठेऊन त्यासाठी एकजूटीने एकत्र येत प्रयत्न करताना दिसत आहे.
हा मार्ग सरळमार्गी करण्याच्या महत्त्वाच्या मागणीसाठी नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघाच्या भाजप आमदार सीमा हिरे यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची नवी दिल्ली येथे भेट घेतली.
या भेटीदरम्यान शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नाशिकचे खासदार राजाभाऊ वाजे यांनीही उपस्थित राहून या मागणीला ठाम पाठिंबा दिला. भिन्न राजकीय पक्षांचे प्रतिनिधित्व करणारे हे दोन्ही लोकप्रतिनिधी नाशिकच्या विकासाच्या प्रश्नावर एकत्र आल्याने या भेटीची राजकीय वर्तुळात विशेष चर्चा रंगली.
बैठकीत खासदार राजाभाऊ वाजे यांनी नाशिक–पुणे रेल्वेमार्ग सरळमार्गी करण्याची मागणी पुन्हा एकदा रेल्वेमंत्र्यांसमोर ठामपणे मांडली. या मार्गामुळे नाशिक, सिन्नर, संगमनेर, नारायणगाव, मंचर आणि पुणे या भागातील उद्योग, व्यापार, शिक्षण, पर्यटन आणि प्रवासी वाहतुकीला मोठी चालना मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले.
याचबरोबर आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिकमधील रेल्वे विकासकामांना तातडीने गती देण्याची मागणीही करण्यात आली. नाशिक रोड रेल्वे स्थानकाचा विकास, प्रवासी सुविधांचा विस्तार, आवश्यक पायाभूत सुविधा आणि कुंभमेळ्याशी संबंधित सर्व रेल्वे कामे वेळेत पूर्ण करण्याची आवश्यकता खासदार वाजे यांनी अधोरेखित केली.
बैठकीत पंचवटी एक्स्प्रेसला शताब्दी एक्स्प्रेसच्या रेक शेअरिंग व्यवस्थेतून मुक्त करून स्वतंत्र रेक उपलब्ध करून देण्याची मागणीही खासदार वाजे यांनी केली. याशिवाय नाशिकहून पंढरपूर, अयोध्या, अजमेर तसेच कटरा (वैष्णोदेवी) या धार्मिक स्थळांसाठी नवीन रेल्वे सेवा सुरू करण्याची मागणीही रेल्वेमंत्र्यांकडे करण्यात आली. नाशिक जिल्ह्याशी संबंधित इतर विविध रेल्वे विकास प्रकल्प आणि प्रवासी सुविधांबाबतही सविस्तर चर्चा झाली.
विशेष म्हणजे, भाजपच्या आमदार सीमा हिरे आणि ठाकरे शिवसेनेचे खासदार राजाभाऊ वाजे यांनी पक्षीय राजकारण बाजूला ठेवत नाशिकच्या विकासाच्या मुद्द्यावर एकत्रित भूमिका घेतल्याने या भेटीची राजकीय व सामाजिक स्तरावर चर्चा सुरू झाली आहे. विकासाच्या प्रश्नांवर पक्षभेद विसरून सर्व लोकप्रतिनिधींनी एकत्र येण्याची गरज असल्याचे मतही या निमित्ताने व्यक्त होत आहे. या प्रसंगी भाजप शहर सरचिटणीस रश्मी हिरे-बेंडाळे या देखील उपस्थित होत्या.
नाशिक–पुणे रेल्वेमार्ग, कुंभमेळ्याची रेल्वे कामे आणि नवीन रेल्वे सेवा, पंचवटी एक्सप्रेसच्या समस्या या केवळ मागण्या नाहीत, तर नाशिकच्या भविष्यासाठी अत्यावश्यक गरजा आहेत. नाशिककरांच्या हिताचा कोणताही विषय असेल, तर पक्षभेद बाजूला ठेवून सर्व लोकप्रतिनिधींनी एकत्र येणे ही नाशिकची उज्वल राजकीय परंपरा असल्याचं मत खासदार वाजे यांनी व्यक्त केलं.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.