Bogus Shalarth ID Scam Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Shalarth ID Scam : जळगावात संशयितांची पळापळ; शाळांमध्ये अचानक पोलिसांची एन्ट्री, 160 कोटींच्या घोटाळ्याप्रकरणी 5 पथकांकडून धाडसत्र

Nashik Police Teams Investigate Shalarth ID Scam in Jalgaon : शालार्थ आयडी घोटाळ्यात तपास पथकांनी जळगाव जिल्ह्यावर विशेष लक्ष केंद्रित केलं आहे. तब्बल पाच पथकांकडून जिल्ह्यात धाडसत्र सुरु आहे.

Ganesh Sonawane

Shalarth ID Scam : शालार्थ आयडी घोटाळ्याची व्याप्ती वाढल्याने नाशिक पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांनी उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, जळगाव, धुळे व नंदुरबार जिल्ह्यात तपास करणाऱ्यासाठी दहा तपास पथके आणि एक प्रमुख तपास पथक नियुक्त केले आहे.

या गुन्ह्यात १२०० संशयित निष्पन्न झाले असून सर्वाधिक संशयित जळगाव जिल्ह्यातील आहेत. त्यामुळे जळगाव जिल्ह्यावर पोलिस पथकांनी लक्ष्य केंद्रीत केलं असून संशयितांची पळापळ सुरु झाली आहे. नाशिकहून आलेल्या स्वतंत्र पाच पथकांनी जिल्ह्यातील विविध शाळांमध्ये धाडसत्र सुरु केलं आहे.

नाशिकहून आलेल्या तपास पथकांनी विविध शाळांवर अचानक धाडी टाकत शिक्षक व कर्मचाऱ्यांची चौकशी करण्यासह शाळांमधील महत्त्वाच्या कागदपत्रांची आणि नोंदींची तपासणी केली. साध्या वेशातील पोलिस पथके शाळांमध्ये धडकत असून शालेय मस्टर, वेतन बिले, नियुक्तीपत्रे, आवक-जावक नोंदी आदी संपूर्ण दस्तऐवजांची कसून चौकशी केली जात आहे. या कारवाईमुळे शिक्षण क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे.

नाशिकरोड पोलिस ठाण्यात याप्रकरणात दोन गुन्हे दाखल आहेत. या घोटाळ्यातून शासनाची तब्बल १६० कोटी रुपयांची फसवणूक झाली आहे. शालार्थ आयडीच्या माध्यमातून शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या, सेवाविषयक नोंदी आणि वेतनाशी संबंधित प्रक्रियेत अनियमितता झाल्याचा संशय तपास यंत्रणेकडून व्यक्त केला जात आहे. याच पार्श्वभूमीवर नाशिकच्या विशेष पथकांनी जळगाव जिल्ह्यातील संबंधित शाळांमध्ये प्रत्यक्ष जाऊन कागदपत्रांची पडताळणी सुरू केली आहे.

जळगाव जिल्ह्यातील नशिराबाद येथील न्यू इंग्लिश स्कूलमध्येही विशेष पथकाने तब्बल साडेआठ तास चौकशी केली. या कालावधीत शाळेतील विविध कागदपत्रे, सेवा नोंदी, शिक्षक-कर्मचाऱ्यांशी संबंधित कागदपत्रे तसेच शालार्थ आयडीशी निगडित नोंदींची तपासणी करण्यात आली. पथकाने २०१० पूर्वीची सर्व दस्तऐवज आणि संबंधित नोंदी ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे.

दरम्यान, चोपडा तालुक्यातील चुंचाळे, वडली, चहार्डी आणि विरवाडे येथील शाळांमध्येही विशेष पथकांनी भेटी देत कागदपत्रांची झाडाझडती घेतली. तपासणीदरम्यान काही महत्त्वाची कागदपत्रे आणि नोंदी पथकाने ताब्यात घेतल्याचे सांगण्यात येत आहे.

या कारवाईत पथकांकडून केवळ कागदपत्रांची तपासणीच करण्यात आली नाही, तर संबंधित शिक्षक आणि कर्मचाऱ्यांकडून विविध बाबींवर माहिती घेतली जात असल्याचे समोर आले आहे. नियुक्तीपासून सेवाकालातील नोंदींपर्यंत विविध कागदपत्रांची पडताळणी केली जात आहे.

विशेष म्हणजे, नाशिकच्या पाच स्वतंत्र पथकांकडून एकाचवेळी जळगाव जिल्ह्यातील वेगवेगळ्या शाळांमध्ये तपासणी सुरू असल्याने शालार्थ आयडी घोटाळ्याच्या तपासाला वेग आल्याचे चित्र आहे. या तपासातून नेमकी कोणती माहिती समोर येते आणि कोणत्या शाळांमधील अथवा कर्मचाऱ्यांच्या नोंदी संशयाच्या भोवऱ्यात येतात, याकडे आता शिक्षण क्षेत्राचे लक्ष लागले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT