

Government Recruitment Exams : राज्य शासनाच्या विविध विभागांतील भरती परीक्षा अधिक पारदर्शक, सुरक्षित, विश्वासार्ह आणि उमेदवाराभिमुख करण्याबरोबरच गैरप्रकार व अनुचित साधनांना प्रतिबंध करण्याच्या उद्देशाने विद्यमान परीक्षा पद्धतीचे संपूर्ण पुनर्विलोकन करण्यासाठी उच्चस्तरीय समिती गठित करण्यात आली आहे. या समितीने नुकताच नाशिक विभागाचा दौरा करून जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे विद्यार्थी व पालकांशी संवाद साधत त्यांच्या सूचना, अडचणी आणि अपेक्षा जाणून घेतल्या.
यावेळी, परीक्षांचे वेळापत्रक पाळणे, परीक्षेत विचारलेल्या प्रश्नांचा दर्जा, वेळेवर निकाल यासह पेपरफुटीसारखे गैरप्रकारांबाबत उमेदवारांकडून सूचना प्राप्त झाल्या. या पार्श्वभूमीवर प्रश्नपत्रिका तयार करणारे तज्ज्ञ कोण असावे, इथपासून परीक्षा केंद्रावर नियुक्त अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या काय जबाबदाऱ्या असतील, असे परीक्षेतील सर्व घटकांसाठी ‘मॉडेल कोड ऑफ कंडक्ट’ तयार करणार असल्याची माहिती उच्चस्तरीय कृती दलाच्या (टास्क फोर्स) प्रमुख व अपर मुख्य सचिव व्ही. राधा यांनी दिली.
व्ही. राधा यांनी सांगितले की, ४ सप्टेंबर २०२६ रोजीच्या शासन आदेशान्वये उच्चस्तरीय समितीची स्थापना करण्यात आली आहे. समितीने राज्यातील विविध विभागांमध्ये बैठका घेऊन विद्यार्थी, उमेदवार आणि पालकांच्या सूचना जाणून घेतल्या आहेत. या प्रक्रियेच्या अंतिम टप्प्यात नाशिक विभागाचा समावेश करण्यात आला आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोग ही घटनात्मक संस्था असून, परीक्षा प्रक्रियेशी संबंधित विद्यार्थी व उमेदवारांच्या सूचना आणि अडचणींची समितीकडून गांभीर्याने दखल घेतली जाईल.
समितीकडून तीन महिन्यात शासनाला अहवाल सादर केला जाणार आहे. यातील सूचनांची अंमलबजावणी तीन टप्यात करता येईल. काही सूचना तातडीने अवलंब करण्यासारख्या असतील. धोरणात्मक बाबींसंदर्भात महाराष्ट्र लोकसेवा आयोग व शासन त्यांच्या स्तरावरील विषयांवर निर्णय घेऊन मध्यम व दीर्घ कालावधीत काही सूचनांची अंमलबजावणी करता येईल.
अन्य देशांतील परीक्षा प्रणालींचाही अभ्यास
परीक्षार्थींचे आवश्यक प्रमाणिकरण, प्रवेश नियंत्रण, प्रश्नपत्रिकेची गोपनीयता, परीक्षा प्रक्रियेची सुरक्षितता यांसह परीक्षा केंद्रांची निवड, तेथील पायाभूत सुविधा, देखरेख व्यवस्था, सुरक्षा यंत्रणा आणि आवश्यक मनुष्यबळाची उपलब्धता याबाबतही सविस्तर माहिती संकलित केली जात आहे. अन्य राज्यांनी अवलंबिलेल्या उत्कृष्ट परीक्षा पद्धतींचा तसेच आवश्यकतेनुसार अन्य देशांतील परीक्षा प्रणालींचाही अभ्यास करण्यात येणार आहे. विद्यार्थी आणि पालकांनी मांडलेल्या सकारात्मक सूचनांचा समितीच्या अंतिम अहवालात योग्य प्रकारे विचार केला जाईल, असेही व्ही. राधा यांनी सांगितले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.