Shani Shingnapur Temple App : अहिल्यानगरमधील श्री क्षेत्र शनिशिंगणापूर हे गेल्या काही दिवसांपासून प्रचंड चर्चेत आलं आहे. शनैश्चर देवस्थानातील बनावट ऑनलाइन ॲपद्वारे झालेल्या लाखो रुपयांच्या घोटाळ्यामुळे भाविकांच्या श्रध्देला मोठा हादरा बसल्याचंही समोर आलं आहे. या घोटाळ्यावरुन आमदार विठ्ठल लंघे यांनी नागपूर हिवाळी अधिवेशनात आक्रमक भूमिका घेतानाच त्याचा तपास सीबीआयकडे देण्यात यावा, अशी मागणी केली होती. आता पुन्हा एकदा शनैश्वर देवस्थानच्या ऑनलाईन दर्शन अॅप संदर्भातील घोटाळ्याप्रकऱणी धक्कादायक अपडेट समोर आली आहे.
श्री क्षेत्र शनिशिंगणापूर येथील शनैश्वर देवस्थानच्या ऑनलाईन दर्शन अॅप संदर्भात सुमारे 500 कोटींचा अपहार झाल्याचा आरोप करण्यात आला होता. हा मुद्दा थेट अधिवेशनातही चांगलाच गाजला होता. आता याप्रकरणी प्रत्यक्षात पोलिसांनी दाखल केलेल्या दोषारोपपत्रामध्ये मात्र, याप्रकरणी पोलिसांनी नेवासा न्यायालयात नऊ संशयित आरोपींविरूध्द सुमारे अडीच हजार पानांच्या दोषारोपपत्रात 77 लाखांचा अपहार झाल्याचे उल्लेख केल्याची माहिती समोर आली आहे
श्री शनैश्वर प्रसन्न शनैश्वर देवस्थानच्या ऑनलाईन दर्शन अॅपमध्ये गैरव्यवहार झाल्याच्या तक्रारी दाखल झाल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणात मोठं पाऊल उचललं आहे. तब्बल अडीच हजार पानांच्या दोषारोपपत्रात पोलिसांनी नऊ संशयित आरोपींविरोधातला कारवाईचा फास आवळतानाच 77 लाखांचाच अपहार झाल्याचे नमूद केलं आहे. मात्र,आत्तापर्यंत या प्रकरणी तब्बल 500 कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप करण्यात आला आहे.
पोलिसांनी दाखल केलेल्या दोषारोपपत्रात संजय तुळशीराम पवार (रा. सोनई), सचिन अशोक शेटे (रा. शनिशिंगणापूर) यांच्यासह नितीन सुर्यभान शेटे (मयत), उज्वल निरंज भट्टाचार्य (पश्चिम बंगाल), वरूण दत्तात्रय पाठक (रा. बनपिंप्री, ता. श्रीगोंदा), विभू जयप्रकाश अग्रवाल (रा. लखनऊ), शालिनी भारत जैयस्वाल (रा. मुंबई), सचिन रावसाहेब बनकर (रा. शनिशिंगणापूर), गोरक्ष केरूजी दरंदले (रा. शनिशिंगणापूर) या संशयित नऊ आरोपींचा समावेश आहे.
नागपूर हिवाळी अधिवेशनात अहिल्यानगरमधील श्री क्षेत्र शनैश्वर देवस्थानातील बनावट ऑनलाइन ॲपद्वारे झालेल्या कोट्यवधी रुपयांच्या घोटाळ्याप्रकरणी आमदार विठ्ठल लंघे यांनी गंभीर आरोप केले होते. तसेच त्यांनी याप्रकरणी हा संपूर्ण घोटाळा राज्य यंत्रणांच्या कुवतीबाहेरचा असून याचा तपास सीबीआयकडे देण्यात यावा, अशी मागणी लावून धरली होती. या प्रकरणी गेल्या पावसाळी अधिवेशनातही काही महत्त्वाचे मुद्दे उपस्थित करण्यात आले होते. यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही देवस्थानातील कारभार सभागृहात उघड करत, सायबर क्राईमच्या उच्चस्तरावर तपास केला जाईल, असे स्पष्ट आश्वासनही दिले होते.
याबाबत आमदार विठ्ठल लंघे म्हणाले, "श्री शनैश्वर देवस्थानात सुमारे सहा महिन्यांपूर्वी ऑनलाइन ॲप, क्यूआर कोड आणि पावती पुस्तकांच्या माध्यमातून देश-विदेशातील भाविकांची कोट्यवधी रुपयांची लूट झाल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला. मात्र प्रत्यक्षात अहिल्यानगर सायबर क्राईम विभागानेच संपूर्ण तपास केल्याचे समोर आले होते. अधिवेशनाच्या तोंडावर घाईघाईने देवस्थानातील केवळ दोन कर्मचाऱ्यांना अटक करून एक कोटी रुपयांपर्यंत चोरी झाल्याचा निष्कर्ष काढण्यात आला होता. हा तपास अत्यंत असमाधानकारक व संशयास्पद असल्याचा गंभीर आरोप आमदार लंघे यांनी केला होता..
याबाबत आमदार लंघे यांनी "सात बनावट ॲप कार्यरत होते. प्रत्येक ॲपवर दोन लाखांहून अधिक सबस्क्रायबर होते. प्रत्येकी 1800 रुपयांची देणगी आकारली जात होती. केवळ एका ॲपमधून 36 कोटी रुपये जमा झाल्याची माहिती असताना, एकूण घोटाळा 500 कोटींच्या घरात गेल्याची चर्चा भाविकांमध्ये आहे असल्याचा हल्लाबोल केला होता.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.