Bhaskar Bhagre MP : राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे कार्यकर्ता शिबीर व शेतकरी आक्रोश मोर्चा नुकताच नाशिकला झाला. शेतकरी आक्रोश मोर्चाच्या केंद्रस्थानी असलेल्या प्रश्नांपैकी कांदाप्रश्न हा एक महत्वाचा प्रश्न होता. त्यावरुन स्वत: शरद पवारांनी केंद्र सरकारला लक्ष्य केलं. केंद्र सरकारच्या कांदा निर्यातीच्या धोरणावर टिका करताना पवारांनी शेतकरी कर्जमाफीवरुन सरकारला इशाराही दिला. त्यापाठोपाठ आता शरद पवार यांच्या पक्षाचे दिंडोरी लोकसभा मतदारसंघाचे खासदार भास्कर भगरे यांनीही कांदाप्रश्नावरुन केंद्र सरकारवर टीका केली आहे.
कांदा प्रश्नावर राज्य शासनाची मंगळवारी मुंबईत बैठक झाली. त्यापार्श्वभूमीवर खासदार भगरेंनी पत्रकारपरिषदेत कांद्याप्रश्नी केंद्र सरकारच्या धरसोड वृत्तीवर प्रहार केला. ते म्हणाले, गेल्या ११ वर्षांत केंद्र सरकारने तब्बल ३१ वेळा कांदा निर्यातबंदी केली. केंद्र सरकारच्या धरसोड वृत्तीमुळे जगभरातील इतर देश भारतावर विश्वास ठेवत नाहीत. त्यामुळे जगभरात भारताची प्रतिमा घातकी व अविश्वासर्ह बनली आहे.
केंद्राने ठोस पावले उचलून निर्यातीला अनुदान देण्याऐवजी शेतकऱ्यांना थेट मदत करावी तेव्हाच ही परिस्थीती बदलेल. कांदा उत्पादकांना दिलासा देण्यासाठी गुजरातच्या धर्तीवर महाराष्ट्रातील कांदा उत्पादकांना एक हजार रुपयांचे अनुदान द्यावे, अशी मागणी यावेळी त्यांनी केली.
खासदार भगरे म्हणाले, गेल्या चार महिन्यांत उन्हाळ कांद्याचे भाव निम्म्याने कोसळले. यासंदर्भात मी केंद्र सरकारशी पत्रव्यवहार केला आहे. राज्य सरकारनेही केंद्राकडे निर्यात वाढविण्याची मागणी केली. मात्र, केंद्र सरकार यावर गंभीर दिसत नाही. कांद्याबाबतची सध्याची अवस्था पाहता शेतकरी आत्माहत्यांमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रात, विशेषतः नाशिक जिल्ह्यात सर्वाधिक कांदा उत्पादन होत असतानाही 'नाफेड' व 'एनसीसीएफ' यांनी योग्य ती खबरदारी घेतली नाही, असा आरोप खासदार भगरे यांनी यावेळी केला.
दरम्यान बंजारा समाजाच्या आरक्षण मागणीविषयी विचारले असता बंजारा समाजाच्या मागण्यांना माझा पाठिंबा असल्याचे खासदार भगरे म्हणाले. मी आदिवासी बांधवांचे नेतृत्व करतो. भारतीय संविधानाने सर्वांना हक्क दिले आहेत. मात्र, आदिवासींच्या आरक्षणाला धक्का न लावता बंजारा समाजाला आरक्षण द्यावे असे ते म्हणाले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.