Jalgaon Politics : अजित पवार यांच्या राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपूर्वीच जळगाव जिल्ह्यात शरद पवार यांच्या राष्ट्रवादीच्या अनेक दिग्गज नेत्यांना गळाला लावत प्रक्षात प्रवेश दिले. त्यामुळे निश्चितच जळगावात अजित पवारांची ताकद वाढली. आता स्थानिक निवडणुकांच्या तोंडावर पुन्हा शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का सहन करावा लागत आहे. जिल्ह्यातील शरद पवारांचा खंदा समर्थकच अजित पवारांच्या गोटात सामील होणार आहे.
शरदचंद्र पवार यांचे निष्ठावंत समर्थक तथा विधानसभेचे माजी अध्यक्ष अरुणभाई गुजराथी आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह आज मंगळवार (दि. ११) अजित पवारांच्या राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात प्रवेश करत आहेत. मुंबईत महिला बालकल्याण कार्यालयासमोरील हॉलमध्ये अजित पवारांच्या उपस्थितीच हा प्रवेश सोहळा होणार आहे.
अरुणभाई गुजराथी यांनी शरद पवारांचा पक्ष सोडताना दुःख होत असल्याचं म्हटलं आहे. ते म्हणाले, चार महिन्यापूर्वीच मी शरद पवारांची भेट घेऊन निवृत्त व्हायचे असल्याचे सांगून चर्चा केली. माझे कार्यकर्ते सतत सत्तेत जायचे, असा आग्रह करत होते. 'हुकूमत के साथ चलो' अशी त्यांची इच्छा होती. परंतु मी त्यांचे फारसे मनावर घेतले नाही. परंतु याचा परिणाम असा झाला, की काही कार्यकर्ते मला सोडून इतर पक्षांमध्ये गेले.
एका बाजुला कार्यकर्त्यांमध्ये माझा जीव आहे. त्यांना वाऱ्यावर सोडणे मला चुकीचे वाटते. तर दुसऱ्या बाजूला शरद पवार यांनी चाळीस वर्षांत मला फार मोठे केले, माझा सन्मान केला, ते माझे दैवत आहेत. मला मोठी संधी दिली. एका बाजूला शरद पवार साहेब आहेत, तर दुसऱ्या बाजूला कार्यकर्ते आहेत. दोघांमध्ये माझे ‘सँडविच’ झाले. शेवटी कार्यकर्त्यांसोबत जाण्याचा निर्णय घेतला.
अजित पवार यांच्या सोबत जाण्यात माझा कोणताही राजकीय स्वार्थ नाही. पद किंवा समितीवर नियुक्ती मिळेल, असा हेतू नाही. हा निर्णय राजकीय नसून व्यवहाराने घेतलेला निर्णय आहे. परिस्थितीनुसार घेतलेला निर्णय आहे. कार्यकर्त्यांच्या हिताच्या दृष्टीने घेतलेला निर्णय असल्याचे गुजराथी यांनी सांगितले.
कोण कोण करणार प्रवेश ?
अरुणभाई गुजराथी यांच्यासह तालुक्यातील दिग्गजांचा एक मोठा गट अजित पवारांच्या राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश करणार असून त्यासाठी काल रात्रीच चोपडा येथून चार लक्झरी बस भरून पदाधिकारी मुंबईकडे रवाना झाले.
यामध्ये अरुणभाई गुजराथी यांच्यासह चोपडा पीपल्स बँकेचे चेअरमन चंद्रहास गुजराथी, ‘चोसाका’चे माजी चेअरमन ॲड. घनःश्याम पाटील, उद्योगपती सुनील जैन, हितेंद्र देशमुख, नंदकिशोर पाटील, शहराध्यक्ष समाधान माळी, शहराध्यक्ष श्याम परदेशी, शशी देवरे, शशिकांत पाटील, नेमीचंद जैन यांच्यासह शेकडो समर्थक राष्ट्रवादीत प्रवेश करत आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.