Nilesh Lanke Sharad Pawar meeting Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Ahilyanagar DCC Bank Election : जिल्हा बँकेच्या बिनविरोध निवडणुकीला खासदार लंके यांचे आव्हान? शरद पवारांच्या भेटीने चर्चा

Sharad Pawar meets Nilesh Lanke amid efforts make Ahilyanagar District Bank election unopposed, sparking speculation over a possible third front : शरद पवार यांची सिल्व्हर ओकवर भेट घेतल्यानंतर नीलेश लंकेंनी तिसऱ्या पर्यायाचे संकेत दिले; बिनविरोध निवडणुकीच्या प्रयत्नांमध्ये आता काय घडणार?

Pradeep Pendhare

Ahilyanagar DCC Bank Election News : अहिल्यानगर जिल्हा बँकेच्या निवडणुकीत आतापर्यंतची सर्वात मोठी घडामोड समोर आली आहे. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार निवडणुकीच्यानिमित्ताने पडद्यासमोर आल्याने अहिल्यानगरच्या सहकार मोठी उलथापालथ होणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत.

खासदार नीलेश लंके यांनी जिल्हा बँकेच्या निवडणुकीत आपल्याबरोबर आपला 'वस्ताद' असल्याचे सांगून, लढाईसाठी दम भरला आहे. जिल्हा बँकेच्या निवडणुकीत तिसरा पर्याय उभा राहातो की, नीलेश लंके यांचे हे शक्तिप्रदर्शन पेल्यातील वादळ ठरते, याकडे आता लक्ष लागले आहे. परंतु या बैठकीत शरद पवार यांनी जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी नेमकी कोणती भूमिका घेतली आहे, हे अजून समोर आलेले नाही.

शरद पवार यांची भेट घेऊन खासदार नीलेश लंके यांनी जिल्हा बँकेच्या (DCC Bank) निवडणुकीत तिसरा पर्याय, आपण उभा करू शकतो, असा सूचक इशारा दिला आहे. नीलेश लंके यांच्या या भूमिकेवर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री बाळासाहेब थोरात कशापद्धतीने लक्ष घालतात, याकडे आता लक्ष लागले आहे.

अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शरद पवार यांची, खासदार नीलेश लंके (Nilesh Lanke) यांनी मुंबईत सिल्व्हर ओकवर भेट घेतली. एकनाथ शिंदे शिवसेनेचे माजी खासदार सदाशिव लोखंडे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष सीताराम काकडे, ॲड. संदीप वर्पे, बँकेचे माजी संचालक अमित भांगरे व दत्तात्रय पानसरे, केदारेश्वर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन ऋषिकेश ढाकणे, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष प्रताप पाटील शेळके, राष्ट्रवादी काँग्रेसचे राहाता तालुकाध्यक्ष सुधीर मस्के उपस्थित होते.

खासदार नीलेश लंके यांनी, शरद पवार यांची सदिच्छा भेट घेतल्याचे सांगताच, अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने सविस्तर चर्चा केल्याचे सूचकपणे सांगितले. जिल्ह्यातील सहकार क्षेत्रातील सद्यस्थिती, आगामी निवडणुकीची दिशा आणि पुढील रणनीती यासंदर्भात शरद पवार यांनी मार्गदर्शन केल्याचा दावा खासदार लंके यांनी केला. पण नेमकी काय भूमिका घेतली, हे स्पष्ट होत नाही.

अर्ज माघारीसाठी उरले दहा दिवस

दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा सहकारी बँकेची निवडणूक बिनविरोध व्हावी, यासाठी काँग्रेसचे थोरात अन् भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष तथा माजी खासदार सुजय विखे पाटील यांच्यासह सर्वपक्षीय नेत्यांची तयारी सुरू आहे. अर्ज माघारी घेण्यासाठी अवघे दहा दिवस उतरले आहेत. यातच खासदार नीलेश लंके यांनी शरद पवार यांची भेट घेत, आपल्याबरोबर असल्याचे सांगून, निवडणूक बिनविरोध करण्याच्या नेत्यांसमोर शक्तिप्रदर्शन केले आहे.

थोरातांची 'ती' बैठक पुन्हा चर्चेत

खासदार लंके यांचे हे शक्तिप्रदर्शन म्हणजे, जिल्हा बँकेच्या बिनविरोधाच्या चर्चेत गृहीत न धरण्याचा इशारा आहे का? अशी चर्चा रंगली आहे. बाळासाहेब थोरात यांनी जिल्हा बँकेच्या बिनविरोधासाठी संगमनेर येथे बोलवलेल्या बैठकीला खासदार लंके उपस्थितीत नव्हते. त्याचबरोबर भाजप विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे देखील बैठकीला नव्हते. त्यांनी निवडणुकीतून माघार घेतली असली, तरी कार्यकर्त्यांना बळ देणार असल्याचे सूचित केले आहे.

राम शिंदे कोणाबरोबर?

नीलेश लंकेंनी जिल्हा बँकेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने शरद पवार यांची भेट घेऊन केलेल्या शक्तिप्रदर्शनाला राम शिंदे यांचे देखील छुपे बळ मिळणार का? अशी देखील चर्चा आहे. अर्ज माघारी घेण्याच्या दहा दिवसात जिल्हा बँकेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने अनेक घडामोडी घडणार असल्याचे दिसते आहे.

विखेंची लहामटेंना साद

अजित पवार राष्ट्रवादीचे अकोल्याचे आमदार डाॅ. किरण लहामटे यांना, सहकाराच्या राजकारणात भाजपचे डाॅ. सुजय विखे पाटील साद घातली आहे. एका शब्दाला मान दिल्यास, दहा शब्दांचा मान राखला जाईल, असा शब्द आमदार लहामटेंना विखे पाटलांनी दिला आहे. यातून विखे पाटील यांनी जिल्हा बँकेची निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी पाऊले उचलण्यास सुरूवात केल्याचे दिसते आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT