Anil Kadam, Sharad Pawar & Dilip Bankar Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Sharad Pawar : `वस्तादा`च्या मनात काय? ज्याच्यासाठी सभा घेतली त्याचा अन् बंडखोराचाही साधा उल्लेखही केला नाही!

Sharad Pawar Criticism Dilip Bankar in Niphad: शरद पवार यांच्या निफाडच्या सभेत उमेदवार अनिल कदम यांचा उल्लेख टाळल्याने मतदारांमध्ये सुरू झाली चर्चा

Sampat Devgire

Niphad constituency 2024: शरद पवार यांनी काल पिंपळगाव बसवंत येथे विधानसभा निवडणूक प्रचारासाठी सभा घेतली. या सभेचे वैशिष्ट्य म्हणजे ही सभा ऐनवेळी ठरली होती. सभेत शरद पवार यांनी केलेल्या भाषणापेक्षा त्यांनी उल्लेख न केलेल्या नावावरून राजकारणाला नवी फोडणी मिळाली आहे.

निफाड मतदार संघातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार अनिल कदम यांच्यासाठी पिंपळगाव बसवंत येथे सभा झाली. शरद पवार यांनी या सभेला संबोधित केले. मात्र यावेळी पवार यांनी ज्या माजी आमदार अनिल कदम यांच्यासाठी सभा घेतली. माजी आमदार कदम यांनी सभेची जोरदार तयारी केली होती. मात्र पवार यांनी त्यांचा उल्लेख केलाच नाही. माजी आमदार कदम यांना मतदान करा, असे ते म्हणाले नाही.

विशेष म्हणजे या मतदारसंघात पवार यांना सोडून गेलेले बंडखोर विद्यमान आमदार दिलीप बनकर हे प्रतिस्पर्धी उमेदवार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार पक्षाने त्यांना उमेदवारी दिली आहे. या दिलीप बनकर यांचा समाचार ही त्यांनी घेतला नाही. एवढेच नव्हे तर, आमदार बनकर यांचाही अनुल्लेख केला. त्यामुळे सभा संपल्यावर या विषयाची अधिक चर्चा झाली.

माजी आमदार कदम हे निफाडचे माजी आमदार आहेत. ते शिवसेना ठाकरे पक्षाचे आहेत. मात्र गेले काही महिने ते राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते पवार यांच्या अधिक जवळ गेले होते. त्यांनी केलेला एकत्रित विमान प्रवास आणि भेटीगाठी यामुळे अनेकांना निवडणुकीआधी निफाड मतदार संघ नैसर्गिक राजकीय न्यायाने शरद पवार यांचा मानला जात होता. त्यामुळे श्री कदम हे शरद पवार पक्षाचे उमेदवारी घेतील, असे अंदाज बांधले जात होते.

माजी आमदार कदम यांनी शिवसेना उद्धव ठाकरे पक्षालाच पसंती देत उमेदवारी केली. त्यामुळे निफाड मतदार संघात सध्या शरद पवार यांच्या पक्षाचा उमेदवार नाही. तरीही त्यांनी सभा घेतली. ही सभा का घेतली असावी याचेही अनेकांना आश्चर्य वाटते. मात्र त्याहीपेक्षा अधिक आश्चर्य पिंपळगाव बसवंत येथे सभा घेतल्यावर श्री पवार यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार कदम आणि राष्ट्रवादीचे बंडखोर अर्थात गद्दार आमदार बनकर यापैकी कोणाचाही उल्लेख केला नाही.

मतदारांनी कोणाला मतदान करावे, असे आवाहनही त्यांनी केले नाही. पवार यांनी महिला आरक्षण महिलांची सुरक्षा, युवकांसाठी उपक्रम, महायुती सरकारचा गैरकारभार आणि महाविकास आघाडीचे पंचसूत्री यावर आपल्या भाषणात भर दिला. त्यामुळे एकंदरच श्री पवार यांची पिंपळगाव बसवंत येथील सभा मतदारांसाठी गोंधळात टाकणारी ठरली. त्यातून कदम विरोधकांना आयतेच कोलीत मिळाले. त्यामुळे माजी आमदार कदम यांच्यासाठी ती एक नवी डोकेदुखी ठरण्याची शक्यता नाकारता येत नाही.

-----

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT