Ganesh Gite 22.jpeg Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Sharad Pawar Vs BJP : येवला इफेक्ट! भाजपच्या गिरीश महाजनांना मोठा धक्का; गणेश गितेंच्या हाती शरद पवारांची 'तुतारी'

Ganesh Gite join NCPsP : -भाजपने नेते गिरीश महाजन यांचे जवळचे सहकारी, महापालिका स्थायी समितीचे सभापती गणेश गिते शरद पवारांच्या पक्षात प्रवेश केला आहे.

Sampat Devgire

BJP Vs NCPsP News : गेले आठवडाभर पक्षप्रवेशासाठी प्रतीक्षा करणाऱ्या भाजप नेते गणेश गिते यांनी शनिवारी (ता.26) राष्ट्रवादी काँग्रेसची तुतारी हाती घेतली. भाजपसाठी हा मोठा धक्का आहे. गिते यांच्या प्रवेशाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील सामाजिक समीकरणे पूर्ण झाली.

यंदाच्या निवडणुकीत अनेक राजकीय पक्षांतरे झाली. मात्र, एखाद्या पक्षात प्रवेश मिळावा म्हणून प्रदीर्घकाळ ताटकळत राहण्याचे हे मोठे उदाहरण आहे. नाशिक जिल्ह्यात येवला, नाशिक पूर्व आणि सिन्नर या तीन मतदारसंघाच्या त्रांगड्यात गिते यांचा प्रवेश अडकला होता.

गेल्या आठवड्यात सिन्नरचे उदय सांगळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला. त्याआधीच येवला येथील कुणाल दराडे यांना मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांच्या विरोधात उमेदवारी देण्याचे निश्चित झाले होते. भाजप नेते गणेश गीते हे देखील नाशिक पूर्व मतदारसंघातून इच्छुक होते.

गिते यांनी प्रवेशासाठी पाठपुरावा केला होता. मात्र एकाच वेळी पाच पैकी तीन मतदारसंघांमध्ये ओबीसी उमेदवार दिल्यास सामाजिक समीकरणे बिघडतील. अन्य समाज पक्षापासून दूर जाण्याची शक्यता होती. हा धोका ओळखून गणेश गिते यांचा प्रवेश पेंडिंग ठेवण्यात आला होता.

येवला मतदारसंघातून कुणाल दराडे यांची उमेदवारी जवळपास निश्चित होती. मात्र त्यांना मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्याकडून पाठिंबा घ्यावा, असे सूचित करण्यात आले होते. जरांगे पाटील यांनी शेवटपर्यंत पाठिंबा देण्याबाबत कोणताही निर्णय घेतला नाही.

त्यामुळे आता उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी सोमवारपासून दोन दिवस शिल्लक आहे. अशा स्थितीत जागावाटप आणि उमेदवारी अनिश्चित ठेवणे पक्षाला धोकादायक होते. या स्थितीत आता येवला मतदारसंघातून माणिकराव शिंदे यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने उमेदवारी दिली आहे. त्यामुळे कुणाल दराडे यांच्या नावावर जवळपास फुली मारण्यात आली आहे. त्यातून गणेश गीते यांचा प्रवेश निश्चित झाला.

गिते हे भाजपच्या नाशिक शहर कार्यकारिणीत चर्चेत असलेले नाव आहे. भाजपचे संकटमोचक गिरीश महाजन यांचे ते विश्वासू सहकारी आहेत. सलग दोन वेळा महाजन यांनी त्यांना स्थायी समितीचे सभापती म्हणून कारभार करण्याची संधी दिली होती. आता त्यांनी आपली वेगळी राजकीय वाट निवडली आहे.

या निमित्ताने ते महाविकास आघाडीचे उमेदवार असतील भारतीय जनता पक्षाने नाशिक पूर्व मतदारसंघातून विद्यमान आमदार राहुल ढिकले यांना उमेदवारी जाहीर केली आहे. श्री ढिकले यांचा मोठा संपर्क आहे. मतदारसंघावर त्यांची चांगली पकड आहे. ते प्रबळ उमेदवार मानले जातात. त्याच्या विरोधात उमेदवार देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष चाचपडत होता. आता त्यांना भाजपचा मोठा मोहरा गळाला लावण्यात यश आले आहे.

गिते यांनी शनिवारी (ता.26) प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला. यावेळी शरद पवार, खासदार सुप्रियाताई सुळे, खासदार अमोल कोल्हे, आमदार जितेंद्र आव्हाड, आमदार रोहित पवार, कोंडाजी मामा आव्हाड, गजानन शेलार, ज्येष्ठ नेते श्रीराम शेटे, खासदार भास्कर भगरे, बाळा निगळ हे उपस्थित होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT