Navnath Darkunde, Eknath Shinde Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Eknath Shinde : मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला गर्दी जमविणं नगरसेवकाच्या अंगलट ; रेशन दुकानाचा परवाना रद्द ; नेमकं काय झालं ?

सरकारनामा ब्यूरों

Jalgaon News : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे “शासन आपल्या दारी’ हे महत्त्वाकांक्षी अभियान सध्या सुरु आहे. या अंतर्गत जळगाव येथे दोन दिवसापूर्वी कार्यक्रम राबविण्यात आला.

या कार्यक्रमाला गर्दी जमविण्यासाठी शिंदे गटाच्या नगरसेवकाने पसरवलेली अफवा त्यांच्या अंगलट आली. त्यामुळे त्यांना आपल्या रेशन दुकानाचा परवाना गमवावा लागला. जळगाव जिल्हाधिकाऱ्यांनी ही कठोर कारवाई करीत शिंदे गटाला दणका दिला आहे.

नवनाथ दारकुंडे असे या शिंदे गटाच्या नगरसेवकाचे नाव आहे. दोन दिवसापूर्वी जळगावात झालेल्या 'शासन आपल्या दारी' या कार्यक्रमासाठी गर्दी जमविण्यासाठी दारकुंडे यांनी व्हाट्सअप ग्रुपवर सर्व रेशन कार्डधारकांना हजर राहणे बंधनकारक असल्याचे सांगितले.

या कार्यक्रमाला गैरहजर राहिल्यास चार महिन्यांचे धान्य बंद करण्याचा इशारा दारकुंडे यांनी रेशनकार्डधारकांना दिला होता. याबाबतचे मेसेज त्यांनी कार्डधारकांना पाठविल्याचे तपासात आढळले आहे.

या प्रकाराची गंभीर नोंद जिल्हाधिकाऱ्यांनी घेतली. त्यामुळे स्वस्त धान्य दुकानदार असलेले जळगाव शहरातील शिंदे गटाचे नगरसेवक नवनाथ दारकुंडे यांचा धान्य दुकान परवाना रद्द करण्यात आला आहे.

शासन आपल्या दारी या कार्यक्रमाच्या नावाखाली व्हाट्सअप ग्रुप वर लाभार्थ्यांची दिशाभूल निर्माण करणारे हे मेसेज होते. याचबरोबर यापूर्वी स्वस्त धान्य दुकानदार लाभार्थ्यांना वेळेवर धान्य देत नसल्याच्या तक्रारी येत होत्या, अशी माहिती सुत्रांनी दिली.

निवडणुका समोर ठेवून सरकारकडून हे अभियान?

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या "शासन आपल्या दारी" या अभियानावर दोन महिन्यात १२५ कोटी रुपयांचा खर्च करण्यात येणार आहे. त्यासाठी राज्याच्या विकासासाठी वापरण्यात येणाऱ्या जिल्हा नियोजन विकास निधी तसेच आमदार निधीलाही कात्री लावण्यात आली आहे. २७ लाख नागरिकांना थेट लाभ देण्याच्या नावाखाली या अभियानात सरकारी योजनांसाठीची प्रमाणपत्रे वाटली जात आहेत. महापालिका, नगरपालिका, जिल्हा परिषदांच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून सरकारकडून हे अभियान राबवण्यात येत असल्याची टीका विरोधकांनी केली आहे.

(Edited By : Mangesh Mahale)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT