नाशिक : (Nashik) राज्यात (Maharashtra) सत्तांतर घडविण्याच्या खेळातून अस्तित्वात आलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या शिवसेनेकडून (Shivsena) यापुढे प्रत्येक निवडणुकीत उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या शिवसेनेला शह देण्याचा प्रयत्न सुरू आहे. मुख्यमंत्री शिंदेंची शिवसेना आता बाजार समित्यांच्या निवडणुकीतही (elections) उतरण्याच्या तयारीत आहे. (Eknath Shinde group will contest APMC elections also)
जिल्हा मजूर संघाच्या अध्यक्ष-उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत याची प्रचीती आल्यानंतर आता मालेगाव बाजार समितीत पालकमंत्री दादा भुसे, नांदगाव व मनमाड बाजार समितीत आमदार सुहास कांदे, तर नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत खासदार हेमंत गोडसे सक्रिय सहभाग घेऊन पॅनल उतरविण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांची मुदत संपुष्टात येऊनही निवडणुका रखडलेल्या आहेत. त्याबाबत न्यायालयात सुनावणी सुरू असल्याने, निवडणुका नेमक्या कधी होतील, हे सांगता येत नाही. त्यामुळे स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते संभ्रमात आहेत. कोणतीही निवडणूक होत नसल्याने पदाधिकारी व कार्यकर्ते सैरभैर झाले होते.
बाजार समित्यांच्या बहुप्रतिक्षित निवडणुकांचा बिगुल वाजला आहे. साधारण प्रत्येक तालुक्यात असलेल्या बाजार समित्यांच्या निवडणुकांकडे ‘मिनी विधानसभा’ निवडणूक म्हणून बघितले जात आहे. बाजार समित्यांवर वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी तालुक्यातील आजी-माजी आमदारांची, नेत्यांची कसरत असते.
आतापर्यंत या निवडणुकीत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना सहभागी होत असे. राज्यात सत्तेत आल्यानंतर भाजपनेही रिंगणात उतरण्याचा प्रयत्न केला. मात्र, देवळा, चांदवड वगळता फारसे यश आले नाही. या प्रमुख पक्षांमध्ये लढाई असताना, आता शिंदेंची शिवसेनाही बाजार समिती निवडणूक रिंगणात उतरणार आहे. मालेगाव बाजार समिती निवडणुकीत पालकमंत्री भुसे यांचा दबदबा राहिला आहे.
पॅनल निर्मितीतही त्यांची भूमिका महत्त्वाची असते. त्यामुळे आता शिंदेंच्या शिवसेनेच्या माध्यमातून ते पॅनल उतरविणार हे निश्चित मानले जात आहे. नांदगाव बाजार समितीवरही आमदार कांदे यांचे एकहाती वर्चस्व आहे. त्यामुळे यंदाही कांदे यांच्याकडून पॅनल उभे केले जाणार असल्याचे बोलले जात आहे. तसेच, मनमाड बाजार समितीतही ते लक्ष घालण्याची शक्यता आहे.
खासदार हेमंत गोडसे यांनी मात्र नाशिक कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत आजवर लक्ष घातलेले नाही. परंतु, शिंदेंच्या शिवसेनेत गेल्यापासून त्यांच्या आकांक्षांना पालवी फुटू लागली आहे. त्यांनी साखर कारखाने चालवायला घेतल्यापासून त्यांची सहकारातही एन्ट्री झाली आहे. त्यामुळे नाशिक बाजार समितीतही गोडसे यांनी उतरावे, असा आग्रह पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून सुरू आहे. त्यादृष्टीने खासदार गोडसेही चाचपणी करत आहेत. या सर्वांचा एकत्रित परिणाम म्हणून जिल्ह्यातील सहकार क्षेत्रातील राजकीय समीकरणे बदलणार काय याची उत्सुकता आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.