Vikhe Patil Vs Balasaheb Thorat  Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Shirdi News: विखे, थोरात-कोल्हे युतीची एकमेकांविरोधात 'साखर पेरणी'!

Mangesh Mahale

प्रदीप पेंढारे

Nagar : राहाता तालुक्यातील शिर्डी विधानसभा मतदारसंघात श्री गणेश सहकारी कारखान्याच्या निमित्ताने विखे-थोरात-कोल्हे यांच्याकडून होत असलेली 'साखर पेरणी' राजकीय संघर्षाचा विषय ठरली आहे. यातून विखे-थोरात यांच्यात राजकीय संघर्ष वाढण्याची चिन्हे असली, तरी सर्वसामान्यांची दिवाळी मोफत साखरेमुळे गोड होणार आहे.

राज्याचे महसूल तथा नगर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखेंच्या शिर्डी मतदारसंघातच काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात-युवा नेते विवेक कोल्हे युतीने साखर पेरणीविरुद्ध मंत्री विखेंचे पुत्र खासदार सुजय विखे मैदानात उतरले आहेत. शिर्डी मतदारसंघांतील 70 हजार रेशनकार्डधारकांना दिवाळीसाठी मोफत पाच किलो साखर वाटणार असल्याची घोषणा खासदार विखेंनी केली आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

राहाता तालुक्यातील श्री गणेश सहकारी साखर कारखान्याची निवडणूक गेल्या वर्षी झाली. मंत्री विखेंविरुद्ध थोरात-कोल्हे युती पॅनेल निवडणुकीच्या रिंगणात होता. या निवडणुकीत कारखान्याच्या सत्ताधारी विखे गटाने अनुउत्पादकाची बंद केलेल्या साखरेचा मुद्दा चांगलाच गाजला होता. थोरात-कोल्हेंनी हाच मुद्दा हेरला आणि सत्ता आल्यास आम्ही साखर मोफत वाटू, असे सांगितले. पुढे सत्तापरिवर्तन झाले.

थोरात-कोल्हेंची साखर पेरणी कशासाठी?

श्री गणेश सहकारी साखर कारखान्याच्या बाॅयलर अग्निप्रदीपन नुकताच झाले. यावेळी आमदार बाळासाहेब थोरात आणि युवा नेते विवेक कोल्हे यांनी यानिमित्ताने 'गणेश'च्या सभासदांना दिवाळीसाठी प्रत्येकी दहा किलो साखर मोफत देणार असल्याचे जाहीर केले. गणेशचे सभासद नऊ हजाराच्या आसपास आहेत. परंतु संगमनेरचे आणि 'गणेश'चे साखर गोदाम रिकामे असताना आमदार थोरात-कोल्हेंची ही साखर पेरणी कशासाठी, चर्चेचा विषय ठरली. थोरातांच्या या घोषणेची दखल मंत्री विखेंनी घेतली नसेल, तर नवलच!

थोरात-कोल्हेंच्या साखर पेरणीविरुद्ध विखे मैदानात

मंत्री विखेंच्या राहाता तालुक्यातील शिर्डी विधानसभा मतदारसंघातील श्री गणेश कारखाना. थोरात-कोल्हे युतीने मंत्री विखें समर्थकांना याच कारखान्याच्या निवडणुकीत पराभवाची धुळ चारली. आणि आता याच कारखान्यातून मंत्री विखेंविरुद्ध साखर पेरणी! याची दखल मंत्री विखे घेणार नाहीत, असे होणारच नव्हते. आणि झालेही तसेच. मंत्री विखे यांचे पुत्र खासदार सुजय विखे हे आमदार थोरात-कोल्हेंच्या या साखर पेरणीविरुद्ध मैदानात उतरले.

'साखर घ्या, साखर'

शिर्डी मतदारसंघातील 70 हजार रेशनकार्डधारकांना दिवाळीसाठी मोफत पाच किलो साखर दिली जाणार असल्याची घोषणा खासदार विखेंनी केली. यासाठी तब्बल दीड कोटी रुपयांचा खर्च होणार आहे. खासदार विखे आणि थोरात-कोल्हे युतीच्या मोफत साखर वाटपाच्या घोषणांमुळे 'साखर घ्या, साखर', असे शिर्डी मतदारसंघात मिश्किलपणे बोललो जावू लागले आहे.

'गणेश'च्या सभासदांची दिवाळी डबल गोड

विखे-थोरात यांच्यातील राजकीय संघर्ष सर्वश्रुत आहे. राजकीय संघर्ष कुठपर्यंत ताणायचा हे दोघांनाही माहीत आहे. या राजकीय संघर्षातून दोघांचे राज्याच्या आणि देशातील राजकारणात स्थान आणखीच मजबूत झाले आहे. या दोघांच्या राजकीय संघर्षांतून त्यांच्या मतदारसंघातील सर्वसामान्यांना नेहमीच काहीतरी गोड मिळते. विकासकामे मार्गी लागतात. तशी दोघांमध्ये स्पर्धा असतेच! आता दोन्हीकडच्या राजकीय संघर्षाचा विचार केल्यास 15 किलो साखर मोफत मिळणार आहे. यातून शिर्डी मतदारसंघातील सर्वसामान्यांची आणि 'गणेश'च्या सभासदांची दिवाळी डबल गोड होणार आहे.

Edited By : Mangesh Mahale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT