Fake voting allegation Shirdi : राहाता तालुक्यातील शिर्डी नगरपरिषद निवडणुकीत बोगस मतदानाच्या प्रकारानं खळबळ उडाली. महिला मतदार शोभा सुनील शिंदे यांचं मतदान दुसरचं कुणीतरी करून गेल्याचं समोर आलं. या महिला मतदाराची तक्रारीची कुणीच दखल घेत नव्हतं. गेल्या निवडणुकीत देखील, असंच बोगस मतदान झाल्याचा दावा महिलेनं केला.
परंतु याच मतदान केंद्रावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना पक्षाचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे मतदानासाठी आल्यावर महिलेबाबत झालेल्या बोगस मतदानाची दखल घेतली. खासदार वाकचौरे यांनी थेट निवडणूक निर्णय अधिकाऱ्याशी संपर्क करत तक्रार करत सुनावलं. यानंतर प्रशासनानं 'प्रदत्त मत' (Tender Vote) या तरतुदीचा वापर करून महिला मतदार शोभा शिंदे यांचं मतदान करून घेतलं, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी माणिक आहेर यांनी दिली.
शिर्डी (Shirdi) नगरपरिषद निवडणुकीत एका मतदान केंद्रावर एका महिला मतदाराच्या नावानं दुसराच व्यक्ती मतदान करून गेल्याचा प्रकार घडला. शोभा सुनील शिंदे या महिला मतदारांबरोबर, हा प्रकार घडला. याबाबत त्यांनी निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार केली. निवडणूक अधिकाऱ्यांनी शोभा शिंदे यांनाच तुमची ओळख पटवून द्या, असं सुनावलं. यानंतर मतदान केंद्रावरील प्रतिनिधींकडे महिला ओळख सांगत असताना, तशी कागदपत्र दाखवली. याचवेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना पक्षाचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे तिथं मतदानासाठी आले.
शिवसेनेचे (Shivsena) खासदार वाकचौरे यांच्या हा प्रकार लक्षात आल्यावर त्यांनी अधिकाऱ्यांना थेट मोबाईलवर संपर्क साधत सुनावलं. संबंधित अधिकाऱ्यांना खासदार वाकचौरे यांना देखील त्या महिलेला ओळख पटवून देण्यासाठी सांगितलं आहे, असं सांगितलं. यावर सोबत सर्व ओळख पटवून देणारी कागदपत्र असताना, आणखी किती ओळख पटवून द्यायची, असं खासदार वाकचौरे यांनी सुनावलं.
दरम्यान, या मतदार महिला शोभा शिंदे यांनी यापूर्वी देखील माझं असंच कुणीतरी मतदान करून गेल्याचा दावा केला. तसंच मतदानाच्या अदल्या दिवशी फोन करून तुमचं मतदान झालं आहे, तुम्ही मतदानाला जाऊ नका, असा मोबाईलवर संपर्क केला असल्याचा दावा शोभा शिंदे यांनी केला. त्यामुळे बोगस मतदानाबाबत आणखीच शंका उपस्थित झाली. शोभा शिंदे यांना मतदान झालं आहे, मतदानाला जाऊ नका, अशा आलेल्या फोनची चौकशीची मागणी केंद्रावरील मतदान प्रतिनिधींनी केली.
यानंतर निवडणूक प्रशासनाने मतदार शोभा शिंदे यांच्याबरोबर झालेल्या प्रकाराची दखल घेत संबंधित मूळ मतदार महिलेस नियमानुसार मतदानाचा हक्क मिळवून दिला. 'प्रदत्त मत' (Tender Vote) या तरतुदीचा वापर करून शोभा शिंदे यांचं मतदान करून घेतल्याचं निवडणूक निर्णय अधिकारी माणिक आहेर यांनी सांगितलं.
याविषयी अधिकृत खुलासा करताना निवडणूक निर्णय अधिकारी माणिक आहेर यांनी सांगितले की, "सदर प्रकरणात मूळ मतदाराऐवजी दुसऱ्याच मतदाराने मतदान केल्याचे स्पष्ट झालं आहे. अशा परिस्थितीत निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार आणि कायदेशीर तरतुदीनुसार, मूळ मतदार शोभा शिंदे यांना 'प्रदत्त मतपत्रिका' (Tender Ballot Paper) देण्यात आली. या प्रक्रियेद्वारे त्यांचे 'प्रदत्त मतदान' कायदेशीररित्या करून घेण्यात आले आहे." निवडणूक प्रक्रियेत कोणत्याही वैध मतदाराचा हक्क बाधित होऊ नये, यासाठी प्रशासन खबरदारी घेत असल्याचेही प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
दरम्यान, शोभा शिंदे यांच्या नावाने बोगस मतदान करून गेल्याचं काय होणार, यावर प्रश्न मतदान केंद्रावरील प्रतिनिधींनी उपस्थित केले आहेत. तसंच शोभा शिंदे यांना मतदानाला जाऊ नका, तुमचं मतदान झालं आहे, असे करण्यात आलेल्या फोनची चौकशीची मागणी होत आहे. याशिवाय शोभा शिंदे यांच्या नावाने बोगस मतदान होत असताना, केंद्रावरील अधिकाऱ्यांच्या लक्षात कसं आलं नाही, अशा प्रश्नांची चर्चा होत आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.