Shiv Sena leader missing Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Shiv Sena Leader Missing : महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ ! शिवसेनेचा नेता अचानक बेपत्ता..शेवटचं ठिकाण CCTV मध्ये कैद

Shiv Sena leader missing : शिवसेनेचा (शिंदे गट) जळगाव जिल्ह्यातील नेता रहस्यमयरित्या बेपत्ता झाला आहे. एकनाथ शिंदे यांनी विधानसभा निवडणुकीवेळी या पदाधिकाऱ्यावर मोठी जबाबदारी सोपवली होती.

Ganesh Sonawane

Maharashtra Politics : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेचा जळगाव येथील एक पदाधिकारी रहस्यमयरित्या बेपत्ता झाल्याची माहिती समोर आली आहे. यासंदर्भात शहर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून या घटनेनं जळगाव शिवसेनेत खळबळ उडाली आहे.

संजय लोटन पाटील असे बेपत्ता झालेल्या शिवसेना पदाधिकाऱ्याचे नाव आहे. एकनाथ शिंदे यांनी विधानसभा निवडणुकीवेळी त्यांच्यावर पक्षाची महत्वाची जबाबदारी सोपवली होती. ते जळगाव ग्रामीण विधानसभा मतदारसंघाचे क्षेत्रप्रमुख आहेत. तसेच पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे ते निकटवर्तीय मानले जातात. जळगाव ग्रामीण विधानसभा क्षेत्रात त्यांचे मोठे नाव आहे. मात्र ते अचानक गायब झाल्याने त्यांचे कुटुंबीय आता चिंतेत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, संजय पाटील हे धरणगाव तालुक्यातील दोनगाव येथील रहिवासी असून ते सध्या धुळे येथे वास्तव्यास होते. गावाकडे जात असल्याचे सांगून काही दिवसांपूर्वी ते घरातून निघाले. मात्र ते नंतर घरी परतलेच नाही. दरम्यान ते सीसीटीव्ही फुटेजमध्ये शहरातील एका बँकेतून पैसे काढताना व त्यानंतर कोर्ट चौकाकडे जाताना दिसून आले आहेत. मात्र नंतर त्यांचा काहीही पत्ता लागलेला नाही.

तसेच त्यांचे दोन्ही मोबाईल फोन बंद असल्यामुळे त्यांच्याशी संपर्क होऊ शकलेला नाही. शेवटचे ते जळगाव रेल्वे स्थानकावर अयोध्येच्या रेल्वेत बसताना दिसल्याची माहिती मिळाली आहे. पाटील रहस्यमयरित्या बेपत्ता झाल्याने राजकीय आणि सामाजिक वर्तुळात खळबळ उडाली असून त्यांच्या कुटुंबीयांनी तातडीने पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. (Jalgaon News)

तक्रार नोंदवल्यानंतर या घटनेचा पोलिसांकडून तपास सुरु झाला आहे. मिळालेली सीसीटीव्ही फुटेज आणि इतर तांत्रिक माहितीच्या आधारे पोलिस त्यांचा कसून शोध घेत आहेत. पोलिसांनी रेल्वे स्थानकावरील सीसीटीव्ही फुटेज तपासले आहेत. त्यातील फुटेजनुसार संजय पाटील अयोध्येला जाणाऱ्या रेल्वेत बसल्याची शक्यता समोर आली आहे. मात्र, त्यानंतर त्यांचा काहीही पत्ता लागलेला नाही. दरम्यान त्यांचे असे अचानक बेपत्ता होण्यामागे काही राजकीय कटकारस्थान तर नाही ना अशीही शंका उपस्थित होऊ लागली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT